चेक न वटल्याची नोटीस दिल्यानंतरही चेक परत बँकेत भरता येतो !
चेक न वटल्याची नोटीस दिल्यानंतरही चेक परत बँकेत भरता येतो !
चेक न वटल्यामुळे म्हणजेच "बाउन्स" झाल्यामुळे एकदा नोटीस दिल्यावर परत दुसऱ्यांदा तेच चेक बँकेत भरता येतील का, असा प्रश्न मा. मुंबई उच्च न्यायालयापुढे नुकताच उपस्तिथ झाला. (धीमंत मेहता विरुद्ध रामदिल रिसॉर्ट्स प्रा.ली , २०१७ (१) महाराष्ट्र Law जनरल , पान क्र ५८२) ची थोडक्यात माहिती घेण्या आधी, आपण ह्या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी समजून घेऊ. निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स ऍक्ट च्या कलम १३८ अन्वये चेक न वटल्यास फौजदारी फिर्याद दाखल करता येते. ह्या तरतुदी प्रमाणे चेक वरील तारखे पासून ३ महिन्यांच्या आत चेक बँकेत भरावा लागतो. चेक न वटल्याचे बँकेने कळवल्यापासून ३० दिवसांच्या आता आरोपीला लेखी डिमांड नोटीस पाठवणे गरजेचे असते. अशी नोटीस आरोपीस मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत जर का आरोपीने पैसे परत नाही केले तर, १६व्या दिवसापासून पुढच्या ३० दिवसांच्या आत फिर्याद दाखल करावी लागते. आता संयुक्तिक कारण दिल्यास फिर्याद दाखल करण्यास झालेला उशीर देखील कोर्टाला माफ करता येतो.
ह्या केस मध्ये एकूण ९ लाख रुपयांचे पण वेग वेगळे असे ५ चेक आरोपीने फिर्यादीस दिले होते. त्यातले ३ चेक "बाउन्स" झाल्यामुळे फिर्यादीने सदरील कायदेशीर नोटीस आरोपीस दिली. मात्र आरोपीने ते तीनही चेक बँकेत परत भरण्यास फिर्यादीस सांगितले पण ते तीनही चेक परत बाउन्स झाले. त्यामुळे फिर्यादीने आरोपीस दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आणि त्या दुसऱ्या नोटीस च्या आधारे फिर्याद दाखल केली. मात्र कनिष्ठ कोर्टाने पहिल्या नोटीस पासूनचेच लिमिटेशन पकडून सदरची फिर्याद मुदतबाह्य असल्याचा निकाल देऊन फेटाळून लावली आणि ह्या साठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सदानंदन भद्रन विरुद्ध माधवन सुनील कुमार ह्या १९९८ सालच्या निकालाचा आधार घेतला, ज्या मध्ये असे नमूद केले होते कि , कलम १३८ ची नोटीस देण्याच्या आधी चेक कितीही वेळा भरता येईल, मात्र एकदा का नोटीस दिली कि मग मात्र चेक भरता येणार नाही.
मात्र वरील निकाल सर्वोच्च न्यायालयाच्याच पूर्ण पीठाने एम.एस.आर. लेदर विरुद्ध एस. पलानीअप्पम (२०१३) या केस मध्ये ओव्हररुल केल्याचे उच्च न्यायालायने नमूद केले. एम.एस.आर. लेदर च्या निकालात असे नमूद केले आहे कि कलम १३८ मध्ये अशी कुठलीही तरतूद नाही कि ज्यायोगे एकदा नोटीस दिली की परत चेक बॅंकेत भरताच येणार नाही. त्यामुळे एकदा नोटीस दिल्यावर परत कितीही वेळा चेक भरता येईल आणि बाकीच्या निकषांची पूर्तता केल्यावर फिर्याद देखील दाखल करता येईल. सर्वोच्च न्यायालायने पुढे असे हि नमूद केले कि सदानंदन भद्रन च्या निकालामुळे आरोपींचाच फायदा झालेला दिसतो. नोटीस देऊनही फिर्याद न दाखल करण्यामागे फिर्यादींच्या काही अडचणी असू शकतात उदा. आरोपी पैसे परत करण्याचे आश्वासन देतो, इतर काही व्यावसायिक अडचणी किंवा न्यायालयीन विलंबाची भीती, उलट ज्या आरोपींना खरंच पैसे देण्याची इच्छा असेल, ते दुसरी नोटीस मिळाल्यानंतर देऊ शकतात आणि पर्यायाने ह्याचे रूपांतर १३८ चे खटले कमी प्रमाणात दाखल होतील.
सध्या नोटा बंदीमुळे चेक चा वापर कैक पटींनी वाढला आहे, त्या दृष्टीनेही हा निकाल मह्त्वाचा आहे
Adv. रोहित एरंडे
पुणे ©
Comments
Post a Comment