मृत्यूपत्र करणे का हिताचे ?

मृत्यूपत्र  करणे का  हिताचे ?

Adv. रोहित एरंडे

"मृत्यूस  न  ये चुकवितां | कांहीं  केल्या " असे समर्थ रामदास स्वामींनी मृत्यूचे वर्णन केले आहे. मात्र  मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ  ही  सर्वात अनिश्चित असते. ह्या एका वाक्यामुळेच मृत्यूपत्राचे  महत्व विशद होते. 
 खरेदी खत, बक्षीस पत्र, हक्क सोड पत्र ह्यांसारख्या मिळकत ट्रान्सफर करता येणाऱ्या दस्तानपेक्षा तुलनेने करावयास सोपे आणि कमी खर्चीक असलेल्या मृत्यूपत्राबद्दल आपल्याकडे  गैरसमजच  जास्त दिसून येतात. इतकेच काय तर त्याबद्दल विषय काढणे म्हणजे जणू काही मृत्यूलाच निमंत्रण दिले आहे असे समजले जाते.   अश्या मृत्यूपत्राबद्दलची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ 


मृत्यूपत्र कोण करू शकते ?
मृत्यूपत्राबद्दलच्या तरतुदी ह्या भारतीय वारसा कायदा १९२५ मध्ये समाविष्ट केल्या आहेत.  कोणतीही सज्ञान आणि जिचे मानसिक संतुलन ढळलेले नाही अशी कोणतीही व्यक्ती तिच्या स्व-कष्टार्जित (self -acquired ), स्थावर (immovable ) आणि जंगम (movable ) मिळकतींसंदर्भात मृत्यूपत्र करू शकते. त्याचबरोबर हिंदू वारसा कायदा कलम ३० प्रमाणे वडिलोपार्जित मिळकतीमधील स्वतः चा अविभक्त हिस्सादेखील मृत्यूपत्राने देता येतो.मुस्लिम धर्मीय वगळता   मृत्यूपत्र हे लेखीच असावे लागते, तोंडी नाही.  

मृत्यूपत्र कसे असावे ?
मृत्यूपत्र करण्याआधी आपल्या सर्व  मिळकतींची यादी करणे हे काम थोडे वेळखाऊ असते, हे तुमच्या लक्षात येईल.  मृत्यूपत्राची भाषा  सोपी आणि सुटसुटीत असावी. मिळकतीचे वर्णन स्पष्ट असावे आणि कुठल्या लाभार्थीना कुठली मिळकत मिळणार हे देखील स्पष्ट लिहावे. उदा . २ सोन्याचे हार जर सुनेला - मुलीला  द्यायचे असतील तर त्या दोन्ही हारांच्या वजनासह त्यांचे वर्णन करावे , जेणेकरून १ पदरी कोणी घायचा आणि २ पदरी कोणी घायचा ह्यावरून वाद व्हायला नको. त्याच प्रमाणे बँका, शेअर्स, इन्शुरन्स, बँक-लौकर ह्यांचे नंबरसहित वर्णन करावे. मात्र मृत्यूपत्राचा विशेष असा नमुना कायद्याने दिलेला नाही. 


दोन साक्षीदार असणे अनिवार्य :
मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. अर्थात २ साक्षीदारांनी एकाचवेळी सही केली पाहिजे असे काही नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हे माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही. 

डॉक्टर सर्टिफिकेट :
मृत्यूपत्राच्या शेवटी मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अश्या आशयाचे डॉक्टर चे सर्टिफिकेट आपण बघितले असेल. मात्र असे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे चांगले. 

स्टँम्प , नोंदणी (Registration ). :
साध्या कागदावर देखील मृत्यूपत्र लिहिता येते. मृत्यूपत्रास कोणताही स्टॅम्प  लागत नाही. त्यामुळे खरेदी खत, बक्षीस पत्र  इ. दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र तुलनेने खूपच कमी खर्चाचा दस्त आहे. तसेच मृत्युपत्राची नोंदणी करणेही  कायद्याने बंधनकारक नाही. मात्र नोंदणी कायदा, १९०८ मध्ये मृत्यूपत्राबद्दल काही विशेष तरतुदी आहेत. उदा. मृत्यपत्र हे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील  नोंदवता येते. त्याच प्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याचे मृत्यूपत्र हे नोंदणी अधिकाराच्या ताब्यात सिलबंद लखोट्यामध्ये देखील कस्टडी सारखे ठेवता येते आणि संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्या तर्फे माहितगार इसमास असे मृत्यूपत्र अर्ज करून मागे घेता येते. 

शेवटचे मृत्युपत्रच ग्राह्य धरले जाते :
मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते. बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूपत्रामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे असते. मृत्यूपत्र ना बदलता पुरवणी-मृत्यूपत्र (codicil ) देखील करता येते आणि त्यास मृत्यूपत्राच्याच सर्व कायदेशीर तरतुदी लागू होतात. 

मृत्यूपत्र कधी करावे ?
बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे कि खूप म्हातारे झाल्याशिवाय मृत्यूपत्र करायचीच गरज नाही; किंवा मृत्यूपत्र केले म्हणजे आपला मृत्यूचं जवळ आला असे अनेकांना वाटते. मात्र मृत्यूची वेळच अनिश्चित असल्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच मृत्यूपत्र करणे इष्ट आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात तर ते लवकरात लवकर करावे. कुठल्या दिवशी मृत्यूपत्र करावे असाही प्रश्न लोकांना पडतो आणि त्या बद्दल काही  कायद्यात तरतूद नाही. शक्यतो असा दिवस उदा.  जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस अश्या विशेष दिवशी मृत्यूपत्र करणे लक्षत राहू शकते. 

मृत्युपत्राची अंमलबजावणी :
मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करता एक किंवा अधिक व्यवस्थापक म्हणजेच executors नेमता येतात. मात्र असे करणे कायद्याने बंधनकारक नाही. व्यवस्थापक म्हणजेच executors नसल्यास कोर्टामधून "लेटर्स  ऑफ ऍडमिन्सट्रेशन " मिळवता येते. 

प्रोबेट (Probate )
आपल्यापैकी अनेकांनी प्रोबेट हा शब्द ऐकला असेल.कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट  देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे आणि एकदा का प्रोबेट मिळाले की ते सर्वांवर  बंधनकारक असते. मात्र मृत्युपत्राचे प्रोबेट घेणे हे फक्त मुंबई, चेन्नई  आणि कोलकोता ह्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्येच गरजेचे आहे. इतर ठिकाणी अजिबात नाही. ह्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. उदा. पुण्यात मृत्यूपत्र केले असल्यास आणि मिळकत देखील पुण्यात असल्यास प्रोबेट ची गरज नाही असे मुंबई उच्च  न्यायालायने  श्री. भगवानजी राठोड विरुद्ध सुरजमल मेहता (AIR  २००३ बॉम . ३८७) ह्या निकालात नमूद केले आहे. सबब ज्या ठिकाणी प्रोबेट कायद्यानेच लागत नाही तिथे त्याची सक्ती करणे चुकीचे आहे. उदा. बँक . ह्या साठी बँक अधिकारी संबंधित लोकांकडून फार तर बंध  पत्रे  घेऊ शकतात. जेणेकरून पूढे काही वाद उदभवल्यास बँकांची काही जबाबदारी राहणार नाही. 

मृत्यूपत्र नॉमिनीवर बंधनकारक :
नॉमिनी हा केवळ एक विश्वस्त असतो. सोसायटी, शेअर्स, विमा अश्या ठिकाणी नॉमिनेशन करावे लागते. मात्र नॉमनी व्यक्तीस काही मालकी हक्क मिळत नाही. ती एक तात्पुरती सोय असते. जेणेकरून मृत व्यक्तीच्या मिळकतीसंदर्भात पत्रव्यवहार इ. करता यावा. नॉमिनेशन हा काही वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालायने अनेक निकालांमधून स्पष्ट केले आहे. 

मृत्यूपत्राचा अंमल :
मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला कि,मृत्यूपत्र बोलायला लागते असे म्हणतात. थोडक्यात मृत्युपत्राची अंमलबजावणी ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच होते. आपल्या हयातीत मिळकत तबदील करण्यासाठी खरेदी खत, हक्क सोड पत्र , बक्षीस पत्र के पर्याय असतातच. वारसा हक्काने  ज्या मिळकती अन्यथा मिळू शकतात त्या हक्काला बगल देणे हे मृत्युपत्राची उद्दिष्ट असते. सबब मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेला सगळ्यांनी मान द्यावा. 
अर्थात याला अपवाद म्हणजे जर का मृत्यूपत्र संशयास्पद परिस्थितीमध्ये केल्याचे पुरावे असल्यास त्यास कोर्टात आव्हान देता येईल. 

 त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्वकष्टार्जित मिळकतींसंदर्भात आपल्या जोडीरामध्ये, मुलं-मुलींमध्ये वाद होऊ नयेत म्हणून आपल्या हयातीतीच मृत्यूपत्र करणे हिताचे  असते. मात्र यासाठी इंटरनेटवरील अर्धवट माहितीच्या हळकुंडाने पिवळे होण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या मृत्युपत्राची नक्कल करण्यापेक्षा ह्या कामी जाणकार वकीलांचा सल्ला घेणे हे पुढील वाद टाळण्यासाठी नक्कीच गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे. 

Adv .  रोहित एरंडे 

Comments

  1. सर मला माझ्या वडिलांना मृत्यूपत्र द्वारे मला संपत्ती हस्तांतरण करायची आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©