गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच. :- ऍड. रोहित एरंडे ©
*गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच...*
ऍड. रोहित एरंडे ©
आपली स्वतःची गाडी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक नवीन गाडी घेऊन सुरुवात करतात किंवा काही लोक सेकंड हॅन्ड गाडी घेतात. तर काही लोक नवीन गाडी घेताना आपली जुनी गाडी विकतात. ह्या सर्व प्रकारात केवळ गाडीचे पैसे दिले-घेतले म्हणजे प्रश्न संपत नाही, तर गाडीची मालकी कायद्याने तबदील म्हणजेच ट्रान्सफर होणे किती महत्वाचे आहे हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने अलीकडेच "नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार आणि इतर, (अपील क्र . १४२७/२०१८)" या याचिकेवर दिलेल्या निकालावरून स्पष्ट होईल.
*ह्या केसची पार्श्वभूमी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे आणि आपल्यापैकी अनेकांची ह्याच प्रकारची चित्तरकथा असू शकते.* कोणा एका विजय कुमार ह्यांच्या मालकीची मारुती-८०० गाडी ते २००७ मध्ये एका व्यक्तीला विकतात आणि अश्या प्रकारे ३-४ वेळा ती गाडी विकली जाऊन सरते शेवटी ती पिटीशनर - नवीन कुमार हे २००९ साली विकत घेतात. मे-२००९ च्या सुमारास गाडी मागे घेताना अपघात होऊन जाईदेवी आणि नितीन ह्या चुलती-पुतण्यांना अपघात होतो , ज्या मध्ये जाई-देवी ह्या गंभीर जखमी होतात , तर नितीनचा जागेवरच मृत्यू होतो. कालांतराने नुकसान भरपाईसाठी २ वेगळ्या याचिका दाखल होतात. ह्या याचिकांमध्ये अपघाताची जबाबदार कोणाची असा प्रश्न मोटोर अपघात प्राधिकरणापुढे उपस्थित होतो. त्यातच गाडीचा इन्शुरन्स संपलेला असतो. मोटर वाहन कायद्याच्या कलम २(३०) प्रमाणे ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेले असते, तीच व्यक्ती गाडीची मालक समजली जाते. ह्याला अपवाद म्हणजे ती व्यक्ती अज्ञान असेल तर किंवा हायर-पर्चेस कराराने गाडी घेतली असेल तर अनुक्रमे त्या व्यक्तीचा पालक आणि ज्याच्या ताब्यात गाडी असेल ती व्यक्ती मालक समजली जाते.
*ह्या केस मध्ये ४-५ वेळा गाडी विकली गेली असली तरी अजूनही आर. टी. ओ. च्या रेकॉर्ड रजिस्टर मध्ये मालक म्हणून विजय कुमार ह्यांचेच नाव असते.* सबब गाडी जरी ४-५ वेळा विकली गेली असली तरी अद्यापही विजय कुमार ह्यांचेच नाव मालक म्हणून रजिस्टरला असल्यामुळे त्यांनीच नुकसान भरपाई द्यावी असा निकाल मोटर अपघात प्राधिकरण देते. ह्या निकालाविरुद्ध विजय कुमार पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात. ही याचिका मान्य करताना उच्च न्यायालय मा. सर्वोच न्यायालयाच्या काही निकालांचा आधार घेऊन निकाल देते की जरी आर टी ओ मधील रजिस्टर मध्ये मालकाचे नाव बद्दल नसले तरी, सदरील गाडीची मालकि -४ वेळा बदलून शेवटी ती पेटिशनर ह्यांना विकल्याचे पुरावे आहेत, सबब मूळ मालकाला केवळ रजिस्टर मधील नाव बदलेले नाही, म्हणून जबाबदार धरता येणार नाही, उलट शेवटचा मालक म्हणून नवीन कुमार ह्यांनाच जबाबदार धरले पाहिजे.
शेवटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचते. आपल्या १४ पानी निकालपत्रात सर्वोच्च न्यायालायने एकंदरीतच ह्या प्रश्नाच्या विविध पैलूंचा आणि पूर्वीच्या विविध निकालांचा उहापोह केला आहे. *मा. सर्वोच्च न्यायालायने मोटर अपघात प्राधिकरणाचा निकाल कायम करताना असे प्रतिपादन केले की जरी पैसे दिल्यानंतर आणि गाडीचा ताबा दिल्यानंतर मालकी हक्क बदलत असला तरी, मोटर वाहन कायद्यामधील "मालक" ह्या व्याख्येप्रमाणे रजिस्टर ला ज्या व्यक्तीचे नाव असेल, तीच व्यक्ती मालक म्हणून समजली जाईल आणि ह्यात बदल करता येणार नाही.*
*नुकसान भरपाई मागणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळणे सोपे जावे आणि रजिस्टरला नोंद न झालेल्या वेगवेगळ्या तथाकथीत गाडीमालकांचा शोध घेत त्याला फिरावे लागू नये, हा हेतू ह्या तरतुदीमागे आहे, असेही सर्वोच्च न्यायालायने शेवटी नमूद केले.*
*मात्र स्थावर मिळकतींबाबत बाबतीत एकदा का खरेदी खत , बक्षीस पत्र इ . ची रजिस्टर्ड नोंदणी झाली कि मालकी हक्क लिहून घेणाऱ्याच्या नावे तबदील होतो आणि प्रॉपर्टी कार्डला किंवा ७/१२ ला ह्या व्यवहारांची नोंद झाली नाही तरी मालकी हक्क बदलत नाही.*
ह्या निकालाचे महत्व आता लक्षात आले असेल. *"कोणाच्या खांदयावर कोणाचे ओझे" असे वाटले तरी ज्यांनी ज्यांनी गाडी विकली असेल त्यांनी त्वरीत त्यांचे नाव आर टी ओ रजिस्टरला बदलेले आहे की नाही ह्याचा पाठपुरावा करा.* त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे गाडीचा इन्शुरन्स चालू आहे कि नाही ह्यावर लक्ष ठेवा आणि इन्शुरन्सचे हप्ते वेळेवर भरा . आपल्याला निकाल आवडलाय की नाही ह्याला काही महत्व नाही आणि रेकॉर्ड नीट करून घेणे ह्याला पर्याय नाही.
धन्यवाद.. काळजी घ्या. GOD IS GREAT 🙏
ऍड .रोहित एरंडे .
पुणे. ©
FOR ACADEMIC KNOWLEDGE....IT IS NICE JUDGMENT
ReplyDelete