हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर. : ऍड. रोहित एरंडे. ©
हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर....
ऍड रोहित एरंडे. ©
पश्चिम बंगालमधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ७५ वर्षीय असाध्य रोगाने जर्जर असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी २ निवासी डॉक्टरांना इतकी बेदम मारहाण केली की त्यांच्या कवटीला तडे गेले आणि त्यांची परिस्थिती आजही गंभीर आहे. ह्या प्रसंगामुळे तेथील डॉक्टर संपावर गेले आणि डॉक्टर विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु झाला. त्यातच "पोलीस देखील ड्युटीवर असताना मरतात, पण ते संप करत नाहीत, मग डॉक्टरांनी संप करण्याचे काय कारण ?" असे बेजबाबदार विधान करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांनांच जबाबदार धरल्यामुळे परिस्थिती चिघळत गेला. अखेर कलकत्ता उच्च न्यायालायने देखील राज्य सरकारचे कान टोचले आणि अखेर सरकार थोडे नमले आणि संप मागे घेतला गेला. परंतु अश्या घटना भारतभर घडत आहेत आणि डॉक्टर-पेशंट हे नटे अजून दुष्टचक्रात गुरफटत चालले आहे. हे प्रारणे एवढे भयानक आहेत, की माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी देखील एका समारंभात ह्याबद्दल चिंता व्यक्त करता नमूद केले कि असे प्रकार चालत राहिल्यास डॉक्टर औषधाला देखील मिळणार नाही.
डॉक्टर देव नसेल तर दानवही नाही.
एका गोष्टीत दुमत नसावे की इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा.परिस्थती खरंच गंभीर झाली आहे कि
"सेव्ह द सेव्हिअर" असे म्हणायची वेळ आली आहे. जर आता हल्ल्यांचे गैर प्रकार वेळीच रोखले नाहीत , तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते सर्व समाजालाच भोगावे लागतील.
वैद्यक शास्त्र हे एक अपूर्ण शास्त्र
वैद्यक शास्त्र हे एक अपूर्ण शास्त्र म्हणून ओळखले जाते. अजब गुंतागुंतीचे यंत्र समजल्या जाणाऱ्या आपल्या शरीराची पूर्ण ओळख अजूनही झालेली नाही, हे अनेक डॉक्टर देखील मान्य करतात. 'व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात, त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष डॉक्टरांना देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही डॉक्टरला आपला पेशंट मरावा असे वाटत नाही. त्यामुळे ह्या "अपूर्णतेची"कल्पना आपल्या सगळ्यांना असणे आवश्यक आहे.
बेफिकिर आपण, दोष डॉक्टरांना ?
"औषध न घे असोन वेथा | पथ्य न करी सर्वथा | न मिळे आलिया पदार्था | तो येक मूर्ख" असे रामदासस्वामींनी दासबोधात सांगून ठेवलं आहे...
एकीकडे बेफाम पणे गाडी चालवायची, किंवा डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले तरी खूप प्यायची आणि मग किडन्या - लिव्हर निकामी झाली कि त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे किंवा रिपोर्ट मध्ये शुगर कमी दिसावी म्हणून फक्त 2 दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर कमी होत नाही म्हणून ओरडायचे, इंटरनेट वरून माहिती घेऊन स्वतःचे स्वतःच उपचार करायचे आणि ह्या सर्व प्रकारात गुण आला नाही, आजार बरा झाला नाही म्हणून दोष डॉक्टरांवर थापायचा आणि शेवटी डॉक्टरांनाच मारायचे, असे काहीसे प्रकार घडत असल्याचे दिसून येतात. . एरुग्णाने
ग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही किंवा दुसरीकडे उपचार नीट होऊ शकतील असा सल्ला दिला तर यात डॉक्टरांची चूक कशी असू शकेल, याचा विचार न करता एकदम जाऊन डॉक्टरांना बेदम मारायचे, हॉस्पिटलची मोडतोड करायची, यातून काहीच साध्य होत नाही. उलट डॉक्टरांना रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी कमी होते. हे रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे. आता कित्येक डॉक्टर मंडळी त्यांच्या मुलांना ह्या व्यवसायात येण्यापासून रोखत आहेत आणि हे खचितच चांगले लक्षण नाही.
डॉक्टरांना कायदयाचा धाक ..
अर्थात अप-प्रवृत्ती ह्याही व्यवसायात आहेतच की. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला दिलेली आहे; डॉक्टरांचे परवाने रद्द केले आहेत ; तर त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाता ऐवजी डाव्याच हाताचे ऑपेरेशन केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, ऑपरेशन नंतर पोटात कापसाचा गोळा विसरणे अशा प्रकरणांत डॉक्टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा देखील केलेल्या आहेत. कोर्ट-केसेसचा भितीमुळे तर सध्या डॉक्टर कोणताही धोका पत्करत नाहीत आणि स्वतः निदान करणे शक्य असले तरी आधी टेस्ट करण्यास सांगतात. एकीकडे होणारे हल्ले आणि दुसरीकडे कोर्ट केसेसची भीती असे इतर कुठल्याही प्रोफेशनलच्या बाबतीत आढळून येत नसेल. ह्याचे कारण म्हणजे जर का डॉक्टरांवर हल्ला झाला तर त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया हि संपावर जाण्याची असते. परंतु "संप करणे" हा कायदेशीर अधिकार नसल्याचे वेळोवेळी मा. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांनी सांगितल्यामुळे तो ही मार्ग बंद होतो. ह्या मुळे आता हॉस्पटिल मध्ये बाऊन्सर्स ठेवणे सुरु झाले आहे.
डॉक्टरंना हल्ल्यापासून कायद्याचे कवच, पण कागदावरच ?
इंडियन पिनल कोड मधील नेहमीच्याच तरतुदींबरोबरच महाराष्ट्रा सारख्या काही राज्यांनी डॉक्टरांवरील होणाऱ्या हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी विशेष कायदे पारित केले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील निष्काळजीपणापोटी डॉक्टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही असे म्हटले आहे, की "जर प्रत्येकवेळी असे गुन्हे दाखल व्हायला लागले तर डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता करणे अवघड होऊन बसेल व अशाने समाजाचेच प्रचंड नुकसान होईल". हे विधान डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतदेखील तंतोतंत लागू पडेल. असेच प्रकार सुरु राहिले तर लोकांना त्यांच्या लाडक्या इंटरनेट वरच औषधांसाठी अवलम्बुन राहावे लागेल.
महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यक्ती आणि संस्था, हिंसा आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा २०१० अन्वये डॉक्टर, मेडिकलचे विदयार्थी, हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ , मदतनीस ह्या सर्वांना हल्ल्यांपासून रक्षण दिले आहे. रु. ५०,०००/- दंड आणि/अथवा ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ह्या कायद्यान्वये आरोपींना होऊ शकते, त्याच प्रमाणे हॉस्पिटल मालमत्तेचे, मशिनरी ह्यांचे नुकसान झाल्यास त्यांच्या किंमतीच्या दुप्पट किंमती एवढी नुकसान भरपाई देखील आरोपींकडून वसूल करता येईल. मात्र कायद्याची नीट अंमलबजावणी झाल्यास अश्या गैर प्रकारांना आळा बसू शकेल. या साठी सर्व समावेशक केंद्रीय कायदा करणे खूप गरजेचे झाले आहे.
पेशंटला भेटायला येणारे 'व्हिजिटर्स' च्या संख्येवर नियंत्रण
डॉक्टर-पेशंट ह्यांचे दुष्ट चक्रात अडकलेले नाते संबंध सुधारणे गरजेचे आहात. ह्यासाठी "संवाद" वाढणे गरजेचे आहे. पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना डॉक्टरांचे २ सहानुभूतीचे शब्द हवे असतात. ह्याकडे डॉक्टरांनी देखील लक्ष द्यावे. पेशंटला भेटायला येणारे 'व्हिजिटर्स' च्या संख्येवर नियंत्रण हा एक महत्वाचा उपाय आहे. मा. मुंबई उच्च न्यायालायने देखील २०१७ मध्ये मार्ड डॉक्टरांच्या याचिकेवर निर्णय देताना पेशंटला भेटायला येणाऱ्या "व्हिजिटर्स" ची संख्या एकावेळी २ एव्हडीच ठेवावी असा निकाल दिला आहे. बरेच वेळा लोकांच्या हे लक्षात येत नाही कि आपण पेशंटला भेटायला गेल्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो तसेच आजूबाजूच्या पेशंटला देखील आपल्या वागण्या-बोलण्याचा त्रास होऊ शकतो. सबब अगदी गरज असेल तरच हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटायला जावे, एक "टिक मार्क" म्हणून अजिबात जाऊ नये..
एकंदरीतच सध्या समाजामधील सहनशीलता संपत चालली आहे. खचाखच गर्दीत गाडीचा थोडासा जरी धक्का लागला तरी लोक प्रचंड हमरीतुमरीवर येतात. कायदा हातात घेऊन डॉक्टरांवर काय किंवा कोणावरही हल्ला करणे हे प्रगत समाजाचे खचीतच लक्षण नाही. "कमीत कमी कायदे आणि कमीत कमी हॉस्पिटल्स" हे प्रगत समाजाचे लक्षण समजले जाते. त्याकडे जाण्याचा प्रयत्न आपण करू या.
ऍड . रोहित एरंडे.
पुणे©
Comments
Post a Comment