"आई-वडिलांपासून स्वत्रंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे हा नवऱ्याचा मानसिक छळच " (मग बायकोचा नाही ?) मा. सर्वोच्च न्यायालय.. adv. Rohit Erande


"आई-वडिलांपासून स्वत्रंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे हा नवऱ्याचा मानसिक छळच " - मा. सर्वोच्च न्यायालय..
(मग बायकोचा नाही ?) Adv. रोहित एरंडे.

लग्नानंतर स्वतःचा संसार थाटून वेगळे राहणे हे आता काही नवीन नाही किंबहुना लग्न ठरविताना विवाह मंडळामधील फॉर्म मध्ये तसा रकाना  देखील असतो. समजून उमजून वेगळे राहणे आणि जबरदस्तीने, काहीतरी धमकी देऊन वेगळे राहण्यास भाग पाडणे ह्या मात्र २ वेगळ्या  गोष्टी आहेत. बऱ्याचदा वेगळे राहण्याचा हट्ट हे डिव्होर्स घेण्यामागचे एक कारण सध्या दिसून येते. असेच एक प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आणि "नवऱ्याला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे ही  छळवणूक " असा निकाल मा. न्यायाधीशांनी अलीकडेच दिला आहे.  ह्या निकालाची साधक-बाधक चर्चा ह्या लेखाच्या निमित्ताने आपण बघुयात.

"लग्नानंतर स्वतंत्र संसार थाटणे हे अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. विशेष करून जेव्हा मुलाचे आई-वडील हे पूर्णपणे त्याच्या वरच सर्वार्थाने अवलंबून असतात अश्या केस मध्ये तर बायकोने नवऱ्याला त्याच्या आई-वडिलांपासून स्वत्रंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे, हा नवऱ्याचा मानसिक छळच आहे. ज्या आई-वडिलांनी आपल्याला वाढवले, स्वतः च्या पायावर उभे केले, त्यांची वृद्धापकाळआत काळजी घेणे हे प्रत्येक मुलाचे कर्त्यवच आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणे लग्न झाल्यावर वेगळे राहण्याची आपल्याकडे पद्धत नाही. उलट  पक्षी लग्न झालयावर सासरच्यांबरोबर एकरूप होऊन त्यांच्या बरोबरच रहाणे हे आपल्याकडे भागेल मिळते. कुठलेही सबळ कारण असल्याशिवाय पत्नी तिच्या नवऱ्याला आई-वडिलांपासून स्वतंत्र राहण्यास भहग पडू शकत नाही"

तब्बल २० वर्ष चाललेल्या डिव्होर्स  केस चा निकाल अँपेलंट-नवऱ्याच्या बाजूने देताना मा. सर्वोच्च न्यायालयाने वरील शब्दांत आपले मात व्यक्त केले आहे. (नरेंद्र वि. मीना, सिविल अपील क्र .  ३२५३./२००८,  ). अर्थात या निकालावर बरेच टीकेचे स्वर देखील ऐकू येऊ लागले आहेत. सर्व प्रथम  आपण केस ची पार्श्वभूमी थोडक्यात समजावून घेऊ .

१९९२ साली अँपेलंट चे लग्न रिस्पॉन्डन्ट  बरोबर होते  व लग्नानंतर १ वर्षात त्यांना 'रंजिता' नावाची मुलगी देखील होते. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच  बायकोचे   विचित्र वागणे सुरु होते.  सतत संशय घेणे, नवऱ्यावर विवाह -बाहय संबंध असण्याचे आरोप ठेवणे , आई-वडिलांपासून वेगळं राहण्याचा सतत तगादा लावणे, आत्महत्त्या करण्याची  सतत धमकी देणे असे प्रकार पत्नी करू लागली .  नवऱ्याचे म्हणणे असे होते की बायकोला काहीतरी  करून वेगळा संसार थाटायचयाच होता, मात्र माझे वृद्ध आई वडील हे पूर्णपणे माझ्यावरच अवलंबवून आहेत आणि त्यांना सोडून वेगळा संसार करणे  शक्य होणार नाही, असे नवऱ्याचे स्पष्टीकरण बायकोला अजिबात मान्य नव्हते. तर बायकोच्या मते आई-वडिलांपेक्षा नवऱ्याने आपल्याकडे देखील  लक्ष द्यावे. अँपेलंट चे म्हणणे होते कि त्याची बायको अत्यंत  संशयी सभावाची असल्याने  घरातल्या कामवाल्या बाई बरोबर त्याचे  संबंध असल्याचे बेलगाम आरोप ती करत असे. सतत आत्महत्त्या करण्याच्या धमक्याही ती देत असत  आणि  एके दिवशी तिने बाथरूम मध्ये कोंडून घेऊन अंगावर रॉकेल ओतून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारानंतर अँपेलंट  बंगलोर येथील फॅमिली कोर्टा मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल करतो आणि तो मंजूरही होतो. त्याविरुद्ध  बायको कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करते. उच्च न्यालयाने डिव्होर्सचा हुकूम रद्दबातल करताना असे नमूद केले की नवऱ्याने त्याच्या  आई-वडिलांपेक्षा पत्नीसाठी स्वतःचे उत्पन्न  खर्च करावे ही  पत्नीची मागणी काही गैर नाही. त्याचप्रमाणे 'पतीचे विवाह बाह्य संबंध आहेत' हा पत्नीचा आरोप देखील उच्च नायालयाने मान्य केला .

ह्या निकालाविरुद्ध पतीने दाखल केलेलं  अपील मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने वरील मत नोंदविले. मा. सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले कि सारख्या आत्महत्येच्या धमक्या देणे, ही पतीची मानसिक छळवणूकच आहे, कारण अश्या प्रकारामुळे  पतीचे मानसिक खच्चीकरण होऊन त्याच्या नोकरी-धंद्यावर तर ह्याचा परिणाम होतोच, पण त्याचबरोबर त्याचे जगणे देखील मुश्किल  होते. विवाह-बाह्य संबंधाचे  आरोप पत्नीला सिद्धच करता आले नाहीत,  कारण ज्या कमल नावाच्या मोलकर्णीबरोबर संबंध  आहेत असा पत्नीचा आरोप होता, त्या नावाची मोलकरीणच नसल्याचे सिद्द्ध झाले त्यामुळे विवाह बाह्य संबंधायांचे  खोटे आरोप करणे ही देखील पतीची मानसिक छळवणूकच आहे असे न्यायालयाने नमूद केले.

मा. न्यायालयाने नमूद केले की  आई-वडील स्वतः वर अवलंबून असलेल्या  कुठल्याही हिंदू नवऱ्यास  / मुलास त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहणे सहनच होऊ शकत नाही. हिंदू धर्मामध्ये वृद्ध आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे आद्य  कर्तव्य आहे आणि जी पत्नी तिच्या पतीस  ह्या समाज मान्य कर्तव्या पासून परावृत्त करू बघते , अश्या पत्नीस तितकीच सबळ कारणे असल्याशिवाय असे करता येणार नाही आणि ह्या केस मध्ये तर अशी कुठलीही कारणे पत्नीने सिद्ध केलेली नाहीत व वेगळ्या घरात कुठल्याही "सबळ" कारणाशिवाय राहण्याची मागणी करणे हि देखील नवऱ्याची छळवणूकच होते, असे पुढे नमूद केले आहे.

विशेष म्हणजे हा निकाल लागला तेव्हा "छोटी रंजिता" हि  तेव्हा २० वर्षांची झाली होती आणि आयटी कंपनी मध्ये नोकरी करत होती. १९९५ साला पासून "स्वतंत्र" राहत होती आणि तिच्यात देखील बराच फरक पडला असेल . एवढ्या २० वर्षांनंतर नवरा-बायकोला परत  एकत्र आणणे गैरलागू ठरेल असे न्यायालयाने शेवटी नमूद केले आणि डिवोर्स चा हुकूमनामा पारित केला. ह्या सर्व प्रकारामध्ये मुलांना त्यांची  काहीहि चूक नसताना भोगावे लागते. त्यामुळे जर का नवरा-बायकोचे पटत नसेल तर मूल होऊ देण्या आधी अवश्य विचार करावा आणि मूल झाल्यानंतर तुमचे इगो मुलासाठी तरी बाजूला ठेवायचे  प्रयत्न करावेत.

नाण्याची दुसरी बाजू :

१. निकाल बंधनकारक, पण...
मा. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वांवर बंधनकारक असतात, मग ते पटो अथवा न पटो. सारखी आत्महत्येची धमकी देणे, चारित्र्यावर खोटे संशय घेणे, ह्या गोष्टी अर्थातच कोणालाही मान्य होणार नाहीत. मात्र  सर्वोच्च न्यायालयाने "वेगळा संसार करणे" ह्या बाबीवर केलेले भाष्य हे टिकेचे धनी होऊ शकते आणि ह्या निकालावर इंटरनेट वर बरीच टीका देखील झाली आहे.  सारख्या ठिकाणी घर विकत घेणे हे अवघड वाटत असले तरी अशक्य नाही. अगदी विकत नाही, पण भाड्याने घर घेण्याकडे सध्या जास्त कल वाढत चालला आहे. तसेच एकतर   आजच्या काळात लग्नानंतर पती-पत्नीने वेगळे राहणे हि गोष्ट आता काही "टॅबू " राहिलेली नाही. वेगळे राहणारे प्रत्येक जोडप हे काही पत्नीचे सासू-सासर्यांशी पटत नाही म्हणून वेगळ राहत नाही. कित्येक वेळा घर लहान असते म्हणून लग्नानंतर पती-पत्नी वेगळे राहतात.  हल्ली गृह कर्ज देखील सहज उपलब्ध होते आणि त्यामुळे आधीच्या पिढीला घर घेताना जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या नवीन पिढीला येत नाहीत. तसेच वेगळे राहणारे जोडपे व विशेषकरून पत्नी हि तिच्या सासू-सासऱ्यांची काळजी घेत नाही असाही  अर्थ काढणे  चुकीचे ठरेल. मुलांच्या संसारात आई-वडिलांचा होणार अनावश्यक हस्तक्षेप हे डिवोर्स चे प्रमुख कारण आढळून येते. अश्या परिस्तिथीमध्ये पत्नीने वेगळे राहण्याची मागणी केली तर त्यात काही गैर नाही, असे परखड मत  काही मुलींनी व्यक्त  केले  आहे. कारण मुलींना तसेच मुलांना त्यांचा संसार टिकवायचा असतो. डिवोर्स हा कायम  सर्वात शेवटचा पर्याय असतो. २ स्वतंत्र संसार केले म्हणून आई-वडील आणि मुलगा-सुनेच्या नात्यामध्ये  वितुष्ट येतेच असं कोणतेही  गृहीतक देखील नाही आणि वेगळे राहून देखील एकमेकांना अडीअडचणीच्या काळात सांभाळून घेणारी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूस दिसतील.


 २. मग, बायको तिच्या आई-वडिलांपासून दूर राहते, ही तिची छळवणूक नाही का ?

अत्यंत आदरपूर्वक असे नमूद करावेसे वाटतें की न्यायालयाला अभिप्रेत असलेला हिंदू समाज आत बदलत चालला आहे आणि बदलत्या काळा  प्रमाणे खरे तर न्यायालयाचे निकाल बदलत असतात. "मोरॅलिटि" ची व्याख्या हि स्थळ, काळ परत्वे नेहमीच बदलत असते.  वेगळा संसार करण्यासाठी जर प्रत्येक वेळेला तथाकथित सामाजिक चालीरिती सांभाळाव्या लागणार असतील तर मात्र अवघढ आहे.
बायकोच पत्नीचं तिचे घर -आई-वडील  सोडून नवऱ्याकडे राहण्यास जाते, मग याच लॉजिक ने विचार केला तर  छळवणूक कोणाची होते ? असा उपरोधिक सवाल देखील सोशल मिडीयावर विचारला गेला आणि यात फक्त स्त्रियाच नाही  तर पुरुष देखील पुढे  आहेत.  आपण असेहि  बघितले असेल  की काही केसेस मध्ये आई-वडीलच  समजवून घेऊन त्यांचा वेगळा संसार नीट लावून देतात आणि  वेगळे  राहून "हम भी  खुश और तुम भी खुश" असा  प्रॅक्टिकल अँप्रोच ठेवतात.  इथे राहणारे जाऊ देत, सध्या मुले परदेशामध्ये आणि आई-वडील इकडे असे चित्र सरार्स बघायला मिळते, अश्या वेळी कोण कोणाची छळवणूक करते ? शेवटी एक लक्षात घ्यावे की सुख दुःखांच्या वेळी माणसेच मदतीला येतात, मग तुम्ही वेगळे राहा किंवा एकत्र. ह्या सर्व वाडांचे मूळ हे टोकदार झालेले इगो आणि तुटत चाललेला संवाद हे आहे असे जाणवते.
आई-वडिलांची तसेच सासू-सासऱ्यांची  काळजी घेणे हे प्रत्येक मुला - मुलींचे देखील कर्त्यव्य आहे यात काही वादच नाही, पण केवळ  वेगळा संसार केल्यामुळे ह्या कर्तव्यास बाधा  येते असे समजणे पूर्णपणे गैरलागू आहे.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक केसची पार्श्वभूमी वेगळी असते, ह्या केसमध्ये देखील सतत आत्महत्येच्या धमक्या देणे हे एक प्रमुख कारण आणि त्या मुळे वरील निकाल आपल्या केस ला लागू होतो किंवा नाही हे त्या  प्रत्येकाच्या केसच्या  पार्श्वभूमीवरच ठरेल.


ऍड.  रोहित एरंडे
पुणे.   ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©