सोसायटीमध्ये देखभाल खर्च सर्वांना समानच असतो आणि सोसायटीचे उपविधी, ठराव, कमिटी हे कायद्यापेक्षा मोठे नसतात. ऍड. रोहित एरंडे ©

 नमस्कार, आमच्या सोसायटीमध्ये १, २,३ बी.एच.के. असे वेगवेगळे फ्लॅट्स आहेत. आमचा फ्लॅट ३ बी.एच.के आहे  आणि आमच्याकडून फ्लॅटच्या एरिया प्रमाणे मेंटेनन्स घेतला जातो. ज्याचा फ्लॅट मोठा त्याने जास्त खर्च सोसायचा, असे आम्हाला सांगितले जाते आणि काही विचारले कि सोसायटीने ठराव केला आहे असे उत्तर दिले जाते. तरी ह्या बाबतीत कायदा काय आहे हे कृपया सांगावे ?

एक वाचक, पुणे. 

सोसायटीमध्ये देखभाल खर्च सर्वांना समानच  असतो. 

आपला प्रश्न बघून असे म्हणावेसे वाटते कि  एकतर लोकांना कायद्याची माहिती नाही किंवा माहिती असून तो न पाळण्याचा बिनधास्तपणा आला आहे. ह्या विषयावरचा कायदा खरेतर आता पक्का झाला आहे, तरीही अजूनही असे प्रकार घडत असतील तर दुर्दैवी आहे. 

देखभाल खर्च (मेंटेनन्स)  किती आकारावा हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नक्कीच आहे. मात्र तो देखभाल खर्च सर्वांना सामान असावा हे  कायदा सांगतो.  निवासी असो वा  व्यावसायिक, पहिल्या मजल्यावर राहताय  का  शेवटच्या मजल्यावर, फ्लॅट छोटा आहे का मोठा , त्यानुसार मेंटेनन्स ठरत नाही.  तसेच, मी पहिली मजल्यावर राहतो आणि मी लिफ्ट वापरत नाही म्हणून मी कमी देखभाल खर्च देणार, असे कायद्याला  अभिप्रेत नाही. देखभाल खर्चाबाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचे दोन महत्वाचे निकाल आपण थोडक्यात अभ्यासू. व्हिनस सोसायटी विरुद्ध जे.वाय. देतवानी, ह्या केस मध्ये (2004 (5) Mh.L.J. 197 = 2003(3) ALL M.R. 570)मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे कि 'फ्लॅटच्या एरिया (क्षेत्रफळ)  प्रमाणे देखभाल खर्चाची आकारणी करणे चुकीचे आहे,  कारण मोठा फ्लॅट असणाऱ्यांना छोट्या फ्लॅट धारकांपेक्षा काही वेगळ्या सोयी सुविधा मिळत नाहीत आणि सर्व सोयीसुविधा सगळे जण सारख्याच वापरतात त्यामुळे असे एरिया प्रमाणे  वर्गीकरण करून  देखभाल खर्चाची आकारणी करणारा ठराव हा बेकायदेशीर असल्याचे' न्यायालायने पुढे नमूद केले. तसेच,   सुनंदा रांगणेकर विरुद्ध राहुल अपार्टमेंट सोसायटी (२००६) १ Mh .L .J ७३४ ह्या निकालात देखील मुंबई उच्च न्यायालायने 'निवासी आणि व्यावसायिक सदनिकांमध्ये भेद करता येणार नाही असे नमूद करून दुकानदारांकडून जादा दराने घेत असणारा देखभाल खर्च रद्द ठरविला'. त्यामुळे तुमच्या सोसायटीमध्ये देखभा खर्च सर्वांना समानच आकारला गेला पाहिजे अन्यथा तुम्हाला सोसायटीविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे भाग आहे. सोसायटीमध्ये सिंकिंग फंड,  सोसायटी इमारतीचा  दुरुस्तीचा खर्च इ. फ्लॅटच्या एरियाप्रमाणे आकारले जातात. तर प्रॉपर्टी टॅक्स देखील फ्लॅटचा  एरिया आणि रहिवासी /व्यावसायिक वापर ह्याप्रमाणे महानगर पालिकांकडून आकारला जातो.  . कुठले खर्च समान आणि कुठले एरियाप्रमाणे आकारले जाऊ शकतात  ह्यासाठी आदर्श उपविधींमध्ये तरतूद केलेली आहे. फक्त अपार्टमेंट असोशिएशन मध्ये देखभाल खर्ची, हे फ्लॅटच्या एरियाप्रमाणे आकारले जातात. 

सोसायटीचे  उपविधी, ठराव किंवा कमिटी  हे  कायद्यापेक्षा मोठे  नसतात. :

जादा  मेंटेनन्स, जादा  ट्रान्सफर फी किंवा ना वापर शुल्क आकारण्यासाठी सोसायट्यांच्या एक समान बचाव  दिसून येतो की   "आमच्या उपविधींमध्ये ह्याबाबत  तरतुदी आहेत आणि उपविधी   उपनिबंधकांनी मान्य केले आहेत किंवा जनरल बॉडीने बहुमताने  तसा  ठराव पास केला आहे.". अर्थात असे  बेगडी बचाव कोर्टात टिकत  नाहीत  कारण उपनियम / ठराव किंवा सोसायटी कमिटी हे कधीही कायद्यापेक्षा मोठे असू शकत नाहीत असे अनेक निकालांमधून आज पर्यंत स्पष्ट झाले आहे.त्यामुळे बहुमताच्या जोरावर कायद्यावर  मात करता येत नाही   आणि कायद्याचे अज्ञान हा कधीही बचाव होत नाही, हे लक्षात  ठेवावे. 

ऍड. रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©