एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? - ऍड. रोहित एरंडे ©
एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ?
नमस्कार. आमच्या सोसायटीमध्ये आमच्यासारखे २० एक सभासद असे आहेत ज्यांनी २ फ्लॅट एकत्र केले आहेत. बिल्डरनेच तसे करून दिले आहेत. मात्र करारनामे वेगळे आहेत. पण असे दोन फ्लॅट घेऊन एकत्र करून त्यात एकच कुटुंब रहात असेल कमिटीचे म्हणणे आहे कि मेंटेनन्स २ फ्लॅटचाच घ्यावा लागेल आणि त्यासाठी ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत. तर तर सोसायटीने मेंटनन्स एकाच फ्लॅटचा घ्यावा कि दोनचा, याबाबत जनरल बॉडीने एकच मेंटेनन्स घ्यायचा ठरविला तर ? कमिटीचे म्हणणे बरोबर आहे का आणि त्यांना कायदेशीर सल्ला घेता येईल का ?
एक वाचक. पुणे
सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वादांचे मूळ कारण हे बहुतेक वेळा आर्थिक विषयाशी संबंधित असते. आपण एकात एक अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्याचे उत्तर थोडक्यात द्यायचे प्रयत्न करतो. आपल्यासारखे प्रश्न अनेक ठिकाणी दिसून येतात. बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही कि कायदा आपल्याला आवडेल असा असतोच असे नाही. बिल्डर कडून फ्लॅट घेताना जेव्हा २ स्वतंत्र करार केले याचाच अर्थ ते मंजूर नकाशावरती २ वेगळे फ्लॅट्स म्हणून दाखविले आहेत आणि त्यामुळे अश्या फ्लॅटचे लाईट मीटर , प्रॉपर्टी टॅक्स हे देखील स्वतंत्र असणार आहेत. त्याचप्रमाणे सोसायटीची नोंद करताना युनिट्स प्रमाणे सभासदत्वाची संख्या ठरते. त्यामुळे दोन फ्लॅट एकत्र केले तरी मेंटेनन्स २ फ्लॅटचाच द्यावा लागेल..
सोसायटीमध्ये देखभाल खर्च (मेंटेनन्स) सर्वांना समान पद्धतीने आकारला जायला पाहिजे असा कायदा असला तरी देखभाल खर्चात कशाचा समावेश होतो आणि कुठले खर्च फ्लॅटच्या क्षेत्रफळाप्रमाणेच आकारले जातात, आय तरतूदी आदर्श उपविधी क्र. ६५ ते ६८ मध्ये दिलेल्या आहेत.
आपल्यासारखाच अनेक वेळा लोकांचा सोयीकरिता शेजारील फ्लॅट घेण्याचा किंवा त्याच इमारतीमधील दुसरा फ्लॅट विकत घेण्याकडे कल दिसून येतो. एकाच इमारतीमध्ये एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे फ्लॅट असले तरी प्रत्येक फ्लॅटचा स्वतंत्र मेंटेनन्स देणे क्रमप्राप्त आहे. परंतु जेव्हा दोन स्वतंत्र फ्लॅट एकत्र केले जातात, तेव्हा वापरायला एकच फ्लॅट होत असला तरी कायदेशीररित्या आणि कागदोपत्री ते अजूनही २ स्वतंत्र युनिट्स असतात. त्यामुळे बिल्डरकडून असे २ फ्लॅट घेतानाच प्लॅन मध्ये बदल करून एक करून घ्यावेत.
जनरल बॉडी जरी सोसायटी सर्वोच्च असली तरी, कायद्यापेक्षा सर्वोच्च असू शकत नाही आणि समजा जनरल बॉडीने या केसमध्ये एकच मेंटेनन्स घ्यावा असा ठराव केला तरी तो कायद्याच्या विरुध्द असेल हे लक्षात घ्यावे.
यावर मार्ग काय ?
२ फ्लॅट एकत्र केलेल्या सभासदांना मेंटेनन्सचा खर्च जास्त असणार यात शंका नाही, परंतु भावनीक होऊन कायद्यात मार्ग निघत नाही. त्यासाठी अश्या एकत्रीकरणासाठी बिल्डर कडून बिल्डिंग प्लॅन फेरबदल (रिव्हाईज) करून या एकत्रीकरणाला महानगरपालिकेकडून परवानगी घ्यावी लागेल आणि त्यासाठी सोसायटीने पूर्व लेखी परवानगी द्यावी लागेल, यासाठी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन जनरल बॉडीचा ठराव आणल्यास उत्तम. अजून एक, यासाठी लागणारा संबंधित सभासदांनी विभागून घ्यायचा किंवा कसे हेही जनरल बॉडीमध्येच ठरविल्यास पुढे वाद होत नाहीत. सोसायटीमध्ये एक सभासद - एक युनिट -एक मत अशी रचना केलेली आढळते. त्यामुळे असे एकत्रीकरण झाल्यावर तांत्रिकदृष्ट्या सोसायटीच्या सभासदत्वामध्ये, भागभांडवलामध्ये देखील घट होईल आणि त्यासाठी सोसायटी रजिस्ट्रारकडे प्रकरण दाखल करावे लागेल. एक लक्षात घ्यावे कि मंजूर नकाशाच्या विपरीत बांधकाम करता येत नाही.
शेवटचा मुद्दा,तुमची मॅनेजिंग कमिटी जे सांगत आहे ते बरोबर आहे आणि कमिटीलाच काय, तर प्रत्येकाला कायदेशीर सल्ला घेण्याचा हक्क आहे आणि तो कायद्यालाही हिरावून घेता येत नाही असो. सर्व वाचकांना दिवाळीच्या अनेकोत्तम शुभेच्छा. आपले नवीन वर्ष उत्तम आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि कोर्ट-कचेरी मुक्त असे जावो.
ऍड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment