जागा नावावर करणे म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे .©

जागा नावावर करणे म्हणजे काय ?


आमचा एक फ्लॅट आहे. तो मला माझ्या मुलाच्या नावावर करायचा आहे आणि त्याचे नाव  इंडेक्स २  वरती आणि प्रॉपर्टी कार्ड वर लावून घ्यायचे आहे . तर त्यासाठी काय प्रक्रिया अवलंबावी लागेल  ?


एक वाचक, पुणे. 


अनेकांना नेहमी पडणारा प्रश्न आपण विचारलात या बद्दल आपले अभिनंदन.    या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज खूप आहेत आणि ते या प्रश्नाच्या निमित्ताने दार व्हायला मदत होईल अशी आशा व्यक्त करतो.   एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो.  तरी या विषय बद्दलची कायदेशीर माहिती थोडक्यात घेऊ. 


इंडेक्स-२ म्हणजे काय ? 


रजिस्ट्रेशन कायदा १९०८ च्या कलम ५५ अन्वये विविध प्रकारचे इंडेक्स (सूची) तयार केले जातात.  त्यापैकी  इंडेक्स-२ म्हणजे  वरीलप्रमाणे  एखादा दस्त नोंदविला गेल्यावर  त्याचा गोषवारा किंवा  कायदेशीर  प्रमाणपत्रासारखी सूची  म्हणून   सब-रजिस्ट्रार ह्यांच्याकडून जारी केला जातो. इंडेक्स-२ हे एक महत्वाचे "पब्लिक रेकॉर्ड" असून  मालकी हक्काचा पुरावा म्हणून वापरला जातो मात्र असा     इंडेक्स-२ हा काही बाजारात विकत  मिळत नाही किंवा कुठल्याही कोर्टात किंवा दुसऱ्या सरकारी विभागामध्ये अर्ज करूनही  मिळत नाही. त्यासाठी वरील पैकी कुठलातरी दस्त नोंदविला जाणे  गरजेचे असते. आपल्या केसमध्ये तुम्हाला जागा मुलाच्या नावावर म्हणजेच मालकी हक्काने तुमच्या हयातीमध्ये करायची असल्यास बक्षीसपत्र किंवा खरेदीखत असे  दोन पर्याय आहेत, ज्यांची  कायद्याप्रमाणे नोंदणी झाल्यावर  त्यांचा आपोआप  इंडेक्स-२ तयार होईल आणि तुमच्या इच्छेप्रमाणे मुलाच्या नावावर जागा होईल !.    .   


 त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने  तबदील होऊ शकतो.  .  मृत्यूपत्राप्रमाणे मालकी हक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक्ती (टेस्टेटर) मयत झाल्यावरच   प्राप्त होतो आणि मृत्यूपत्र नोंदविणे अनिवार्य नसले तरी ते नोंदविणे श्रेयस्कर आणि असे मृत्युपत्र नोंदविल्यावर त्याचा 'इंडेक्स-३' मिळतो. 



७/१२ किंवा  प्रॉपर्टी कार्ड उतारे हे मालकी हक्काचे पुरावे समजले जात नाहीत. 


आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळू  या. गावचा नमुना ७, ७अ आणि १२ यांचा एकत्रितरित्या "७/१२" चा उतारा बनतो. गाव नमुना ७ हे हक्क अधिकार पत्रक आहे तर १२ हे पीक-पहाणी पत्रक आहे. तर ७ अ हा नमुना कुळ -वहिवाटीची माहिती देतो. तर शहरी भागांमध्ये बिगर शेत-जमिनीवरील मालमत्तेची नोंदणी हि प्रॉपर्टी कार्डवर होते.  या दोन्ही उताऱ्यांवर  कुठेही "मालक" असा शब्द देखील लिहिलेला आढळून येणार नाही. अश्या उताऱ्यांसंदर्भात  मा. सर्वोच्च न्यायालायने तसेच मा. मुंबई उच्च न्यायालायने वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की या उताऱ्यांचे महसुली इ.  कामाकरिता अन्य उपयोग आहेतच, पण या उताऱ्यामधील नोंदी ह्या महसुली  म्हणजेच रेव्हेन्यू रेकॉर्ड मधील असल्यामुळे या  नोंदींमुळे  कुणाचाही मालकी हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही किंवा कोणालाही मालकी हक्क प्रदान  केला जात नाही.   




वर नमूद केल्याप्रमाणे दस्त नोंदणी झाल्यानंतर मालकी हक्क तबदील झाल्याची  फक्त नोंद ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डला होते, जे तुम्ही करू शकता.  पण  काही कारणास्तव ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डला अशी  नोंद करावयाची राहिली म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे चिंता करण्याचे काहीही कारण नाही.  कारण दस्त नोंदणी झाल्यावर मालकी हक्क तबदील झालेला असेलच,  त्याप्रमाणे नोंद होणे हा केवळ एक उपचार राहिलेला असतो. 


या विषयामुळे अजून एक आवर्जून सांगावेसे वाटते कि महानगरपालिका  टॅक्स पावती, वीज-बिल, फोन-बिल  हे देखील मालकी हक्काचे पुरावे म्हणून कायद्याने गणले जात नाहीत, फार तर रहिवास दाखला म्हणून वापरले जाऊ शकतात. 






ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©