वक्फ बिल काय आहे ? - ऍड . रोहित एरंडे
वक्फ बिल काय आहे ? वक्फ बोर्डांच्या कामकाजात अधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शीता सुनिश्चित करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने १९९५ च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक मांडले आणि अपेक्षेप्रमाणे त्याला भरपूर विरोध झाला आणि सध्या प्रस्तावित कायदा संसदेच्या संयुक्त समितीकडे पुनर्विलोकनसाठी गेला आहे. याचबरोबर नागरिकांकडून सुध्दा हरकती /मते मागविली आहेत. मात्र या संदर्भात उलट-सुलट माहितीने सोशल मिडिया भरून गेला आहे आणि लोकांचा डेटा -पॅक खर्ची पडला आहे. तरी प्रस्तावित बदल आणि त्याअनुषंगाने या विषयाचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.. खरे तर हा काय किंवा कुठलाही कायदा करण्याआधी लोकांची मते मागवली जात नाहीत आणि मागवली तरी ती मते बंधनकारक नाहीत.. 'अल्ला' आणि 'इस्लाम धर्माच्या' नावावर धर्मादाय हेतूने कायमस्वरूपी लेखी /तोंडी कराराने दान केलेली स्थावर -जंगम संपत्ती म्हणजे वक्फ होय. या कारणासाठी पूर्वापार एखाद्या मिळकतीचा वापर होत असेल तर अशी मिळकत सुद्धा वक्फ मिळकत समजली जाते, मग असा वापर थांबला तरी मिळकत वक्फच समजली जाते. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर वक्फ म...