"सासू-सासरे" कुटुंबाच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे त्यांना ना-वापर शुल्क द्यावे लागेल. - ऍड. रोहित एरंडे
आमच्या बिल्डिंगचे रिडेव्हलपमेन्ट चालू असल्याने मी आणि माझे यजमान आमच्या जावयांच्या फ्लॅट मध्ये रितसर भाडे करार करून राहत आहोत. मुलगी आणि जावई कामानिमीत्त परगावी असतात. परंतु जावयाचा फ्लॅट असून सुध्दा सोसायटी आमच्याकडून ना वापर शुल्क (नॉन ऑक्युपेशन चार्जेस) मागत आहे, तसे सोसायटी आकारू शकते काय? - एक वाचक, पुणे . प्रत्येक सभासदाला मेंटेनन्स हा द्यावाच लागतो, पण "ना-वापर" शुल्क हे द्यायचे कि नाही हे जागेचा वापर कोणती व्यक्ती करते यावर अवलंबून आहे', ह्या सोप्या सूत्रात आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल. ना-वापर शुल्क कधी आणि किती घेता येते ? एखाद्या सभासदाने स्वतः जागा न वापरता त्याने ती जागा तिऱ्हाईत व्यक्तीस भाड्याने दिली असेल, तर अश्या सभासदास Non Occupancy Charges म्हणजेच ना-वापर शुल्क द्यावे लागते. पण नुसती जागा कुलूप बंद ठेवली असेल तर त्या सभासदाकडून ना वापर शुल्क घेता येणार नाही, पण सभासदाला मेंटेनन्स मात्र द्यावाच लागेल. महाराष्ट्र सरकारने सहकार कायद्याच...