जागा नावावर करायची म्हणजे काय ? - ॲड. रोहित एरंडे ©
सर, माझी स्वतःची जागा मला माझ्या एकुलत्या एक मुलाच्या नावावर करायची आहे म्हणून मी सोसायटी चेअरमनला तसा अर्ज दिला तर त्याने मला कोर्टातून इंडेक्स-२ आणायला सांगितला आहे. तर मी कोणत्या कोर्टातून आणि कश्या प्रकारे इंडेक्स-२ आणू , ? एक वाचक, पुणे. ऍड. रोहित एरंडे .© तुमचा प्रश्न वाचून कायद्याचे अज्ञान किती खोलवर रुजले आहे ह्याची परत एकदा अनुभूती आली. जागा नावावर करणे ह्या बाबतीत खूप गैरसमज दिसून येतात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा प्रॉपर्टी कार्डला किंवा टॅक्स पावती /लाईट बिल येथे नाव लावायचा अर्ज दिला किंवा तुम्हाला वाटते तसे सोसायटीमध्ये अर्ज दिला कि जागा आपल्या नावावर / मालकीची झाली. वस्तुस्थिती उलट आहे. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क कसा मिळतो, ह्याची थोडक्यात माहिती आधी सांगतो, त्यातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र या...