" ऍलोपॅथी आणि पारंपरिक उपचार पध्दतीमध्ये भेद नको " इन्शुरन्स कंपनीला उच्च न्यायालयाचा टोला ! - ऍड. रोहित एरंडे ©
"ऍलोपॅथी आणि पारंपरिक उपचार पध्दतीमध्ये भेद नको " इन्शुरन्स कंपनीला उच्च न्यायालयाचा टोला ! ऍलोपॅथी उपचार पध्दती चांगली कि पारंपरिक म्हणजेच आयुष उपचार पद्धती चांगली हा वाद कायम चालू असतो. आयुर्वेद, योगा आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी या सर्व उपचार पद्धतींना एकत्रितपणे आयुष म्हणून ओळखले जाते. सुमारे ३६०० कोटी रुपये वार्षिक बजेट असलेले आयुष मंत्रालय २०१४ मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा सुरु केले. मात्र केवळ आयुष पध्दतीने उपचार घेतले म्हणून मर्यादित रकमेचा इन्शुरन्स क्लेम द्यावा का ऍलोपॅथी उपचाराला दिले जातात तसा जास्तीत-जास्त क्लेम द्यावा ? असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला होता. (संदर्भ : के. कृष्णा विरुध्द स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि इतर, याचिका क्र. १८१३०/१३१ ऑफ २०२१). त्यावर न्या. एन. आनंद व्यंकटेश ह्यांच्या खंडपीठाने 'इन्शुरन्स कंपनीला क्लेमचे पैसे देताना ऍलोपॅथी आणि पारंपरिक उपचार पध्दतीमध्ये भेद करता येणार नाही' असा निकाल नुकताच रोजी दिला आहे. त्याची थोडक्यात माहिती घेऊ या. स्वतः वकील ...