लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मिळकतीमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©
लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मिळकतीमधील हक्क : मी आणि माझी मैत्रीण लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये गेले १-२ वर्षे माझ्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत आहोत. आता आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाण्यासंबंधी बोलणी चालू आहेत. तर या जुन्या किंवा नवीन मिळणाऱ्या फ्लॅट मध्ये तिला मालकी हक्क राहील काय ? एक वाचक, पुणे. आपला प्रश्न हा असाधारण - युनिक असा आहे. रिडेव्हलपमेंट करताना किती वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप हा प्रकार आता आपल्याकडे काही नवीन नाही आणि एखादी गोष्ट कोणाला अनैतिक वाटली तरी ती बेकायदेशीर असलेच असेही नाही. दोन सज्ञान भिन्नलिंगी पण अविवाहित व्यक्तींनी लग्नासारखे एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशन असे व्याख्या हा विषय माहिती नसणाऱ्यांसाठी करता येईल. आता सध्याचा फ्लॅट तुमच्या नावावर असल्यामुळे जो नवीन फ्लॅट रिडेव्हलपमेंट नंतर मिळेल तो सुध्दा तुम्हा एकट्याच्याच नावावर होईल. हा खूप महत्वाचा प्रश्न अनेक वाचकांना पडतो. बऱ्याच जणांना असे वाटत असते कि नवीन फ्लॅटवर मुला-मुलीचे किंवा वैवाहिक जोडीदाराचे नाव घ...