बालक, कायदा व न्याय... - ऍड. रोहित एरंडे ©
बालक, कायदा व न्याय... ऍड. रोहित एरंडे © बेकायदा वाहतूक असो, बेकायदा बांधकामे असोत, मागील आठवड्यातील बेकायदा प्लेक्स प्रकरण असो का नुकतेच घडलेले भरधाव आलिशान कारच्या धडकेचे प्रकरण असो, आपल्याकडे एखाद-दुसरा बळी गेल्याशिवाय प्रशासन देवतेला जाग येत नाही की काय असा प्रश्न खेदाने पडतो. पुण्यातील या प्रकरणामध्ये एका धनदांडग्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत नंबर प्लेट नसलेली आलिशान गाडी चालवून दोन लोकांचा जीव घेतला. एका वाक्यात किती कायद्यांचे उल्लंघन केले ते दिसून येते. परंतु एवढा मोठा गुन्हा होउनसुद्धा आरोपीला लगेच जामीन मिळाला कारण पोलिसांनी लावलेली जामीनपात्र गुन्ह्याची कलमे. या सर्व प्रकरणामुळे परत एकदा "ड्रिंक अँड ड्राइव्ह " किंवा "हिट अँड रन " हे विषय परत एकदा ऐरणीवर आले आहेत आणि जनमत चांगलेच भडकले आहे. परंतु जनमत कितीही तीक्ष्ण असले तरी कोर्टामधील केसेस या भावनेवर न चालता कायद्यावर चालतात. त्यामुळे या संदर्भातील कायदा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हा लेख प्रसिध्द होईपर्यंत बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला असेल...