एटीएम फ्रॉड - बँकेला राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा दणका : ॲड. रोहित एरंडे ©
एटीएम फ्रॉड - बँकेला राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा दणका : ॲड. रोहित एरंडे © सोयी तितक्या गैरसोयी असे म्हणतात. त्याचे प्रत्यंतर ऑनलाईन व्यवहार करताना येतात. लोकांचा वेळ वाचावा म्हणून एटीएम सारख्या सोयी करण्यात आल्या किंवा अनेक व्यवहार घर बसल्या करता येत असले तरी त्यातील फसवणुकीचे धोकेही तितकेच वाढलेले आहेत आणि याला कोण केव्हा कसे बळी पडेल हे सांगता येत नाही. अशीच वेळ जोधपूर येथील पेन्शनर श्री. गोविंद लाल शर्मा यांच्यावर यायची होती हे त्यांच्या गावीही नव्हते. दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ रोजी स्टेट बँक जोधपूर येथील शाखेतील पेन्शन खात्यातून ४ फेब्रुवारी २०१९ ते १२ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये एटीएम कार्ड वापरून रोज रु. ४०,०००/- असे एकूण रु. ३,६०,०००/- काढल्याचा एसएमएस श्री. गोविंद शर्मा यांना आला. हा मेसेज बघून शर्माजींनी आधी त्यांचे एटीएम कार्ड आहे का हे तपासले तर ते त्यांच्याजवळच सुरक्षित असल्याचे बघून ते अधिकच चकित झाले. त्यांनी लगेच दुसऱ्यादिवशी बँकेमध्ये जाऊन शाखा व्यवस्थापकाकडे अनाध...