दया याचिका : आता तरी कायद्यात बदल व्हावा.. : ऍड. रोहित एरंडे. ©
आता तरी कायद्यात बदल व्हावा.. दया याचिका : आता तरी कायद्यात बदल व्हावा. ऍड. रोहित एरंडे. © अखेर "निर्भया" बलात्कार प्रकरणातील नराधमांना तब्ब्ल ७ वर्षांनी फाशी झाली आणि निर्भयाला उशीराने, पण न्याय मिळाला असे म्हणता येईल. परंतु कायद्यातील त्रुटींचा कसा उपयोग (दुरुपयोग ?) करता येतो, ह्याचे हि केस उत्तम उदाहरण आहे. १६ डिसेंबर २०१२ रोजी फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर ६ नराधमांनी रात्री धावत्या बस मध्ये पाशवी बलात्कार केला. पाशवी हा शब्द सुद्धा कमीच पडेल एवढे अत्याचार तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर केले गेले आणि तिला तिच्या मित्रासह जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टरांनी सुद्धा इतकी भीषण केस पाहिलेली नव्हती. पुढे पिडीत मुलीला सिंगापूरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आणि तितेच तिने २९ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. तिचेच पुढे "निर्भयी असे नामकरण करण्यात आले. कोर्टात देखील केस लवकर उभी राहिली आणि सप्टेंबर -२०१३ मध्ये सर्व दोषींना कोर्टाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली. ...