सोसायटीच्या सामाईक जागेवरील सभासदांचे अतिक्रमण कारवाईस पात्र: ॲड. रोहित एरंडे. ©
सर, आमच्या सोसायटी मध्ये काही सभासदांनी फ्लॅट बाहेरील मोकळी जागा (कॉरिडॉर) ग्रील लावून बंदिस्त केली आहे, तर काही लोकांनी कुंड्या ठेवून जागा अडवली आहे. तसेच काही सभासदांनी त्यांच्या खिडकीच्या बाहेर शेड /ऑनिंग उभारल्यामुळे वरच्या फ्लॅट धारकांचा "View " ला अडथळा होत आहे. अश्या प्रकारांमध्ये काय कारवाई करता येईल ? कमिटी सभासद , पुणे. उत्तर : आपल्याला जेवढी जागा करारनाम्याने मिळाली आहे तेवढीच जागा वापरण्याचा अधिकार सभासदाला असतो. मोकळा पॅसेजला ग्रील लावणे आणि झाडाची जागा वापरणे असे प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि कायद्याच्या भाषेत ह्याला अतिक्रमण (एन्क्रोचमेंट) असे म्हणता येईल. या संदर्भात आदर्श उपविधी १६९ (अ) मध्ये स्पष्ट तरतुदी केल्याचे आढळून येईल. ह्या तरतुदीप्रमाणे जिना, पायऱ्या, लँडिंग एरिया, सामायिक पार्किंग स्पेस, कॉरिडॉर आणि अश्या प्रकारच्या इतर सर्व मोकळ्या /सामायिक जागा ह्या सर्व सभासदांच्या वापराकरिता असतात आणि त्यामुळे कोणत्याही एका सभासदाला त्यावर हक्क सांगता येणार नाही आणि कोणताही सभासद हा अश्या जागा स्वतःच्या वापराकरिता बळकावू शकत नाही. ह्या सर्व जागांचा उपयो...