"मुलांना, आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित घरामध्ये आई-वडिलांच्या मर्जीवरच राहता येते" - ऍड. रोहित एरंडे ©
"मुलांना, आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित घरामध्ये आई-वडिलांच्या मर्जीवरच राहता येते" ऍड. रोहित एरंडे © वायु वेगाने पसरणे ह्याच्या साठी आता "सोशल मीडिया" वेगाने पसरणे असा शब्द आता प्रचलित झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण कायदेशीर ज्ञान, आरोग्य विषयक माहिती ह्या बद्दलच्या उलट्या-सुलट्या बातम्या इतक्या वेगाने पसरतात आणि लोकांचाहि त्यावर विश्वास ठेवतात आणि मग नंतर पस्तावण्याची पाळी येते. एवढे लिहिण्याचे कारण हेच कि मध्यंतरी, आई वडिलांची स्वकष्टार्जित मिळकत आणि मुलांचा हक्क ह्या विषयी अश्याच उलट-सुलट बातम्या वाचण्यात आल्या. तसेच वर्तमानपत्रांमध्ये देखील मुलांनी "आई-वडिलांना घराबाहेर काढले" असेही वाचण्यात येते. ह्या विषयीचा कायदा खरेतर खूप पूर्वीपासून पक्का झाला आहे. मा. मुंबई हायकोर्टाने २३ वर्षांपूर्वीच कॉनरॅड डायस विरुद्ध जोसेफ डायस (१९९६ (२) महा. law जर्नल , पान क्र . २०८) ह्या याचिकेवर ( मा.न्या. सि .एस. वैद्यनाथन) महत्वपुर्र्ण निकाल दिला आहे. बेंगलोरला नोकरीनिमत्त राहत असणाऱ्या वडिलांनी...