सोसायटी आणि पार्किंग नियमावली : ऍड. रोहित एरंडे. ©
आमच्या सोसायटीमध्ये पार्किंग वरून खूप वाद विवाद होतात. सामायिक पार्किंग मध्ये तर काही सभासदांच्या प्रत्येकी २-३ गाड्या असतात आणि ते काढतच नाहीत. तर पार्किंग साठी काही योजना करता येते का किंवा पैसे वगैरे सोसायटीला घेता येतात का ? त्रस्त सभासद - पुणे, " आमच्या सोसायटी मध्ये आम्ही 'अतिथी देवो भव' ही संस्कृती जपतो... परंतु आमचेकडे पार्किंग कमी असल्याने, ह्या देवांनी त्यांची पुष्पक विमाने सोसायटी बाहेर लावावीत" असा विनोद व्हॉट्सॲप वर मध्यंतरी वाचला. यातील विनोदाचा भाग सोडला तरी पार्किंग समस्या हा सोसायटीमध्ये जिव्हाळ्याचा विषय असतो. ह्या बद्दलची थोडक्यात कायदेशीर माहिती आपण बघूया. सोसायटी बायलॉज (उपविधी) क्र. ७८-८४ पार्किंग प्रमाणे पार्किंग बद्दलचे नियम, पार्किंग फिज इत्यादी ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहेत, त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊ. उपविधी ७८ - वाहने उभी करण्यासाठी जनरल बॉडीमध्ये नियम करता येतील आणि ते नियम सर्वांवर बंधनकारक असतील. पार्किंगची जागा अलॉट करताना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" ह्या तत्वाचा अ...