स्वतः चे घर असले म्हणून गोंगाट करून दुसऱ्यांना त्रास देण्याचा अधिकार सभासदाला नाही . - ऍड. रोहित एरंडे ©
सर नमस्कार, आमच्या शेजारच्या फ्लॅट मधील रहिवासी दिवसाच्या कुठल्याही वेळी खूप मोठ्या आवाजात गाणी लावतात. ह्या प्रकाराचा त्रास आमच्या बिल्डिंगमधल्या अनेकांना होतो, परंतु संबंधित सभासद राजकिय पार्श्वभूमीचे असल्यामुळे कोणी उघडपणे तक्रार करायला धजावत नाही. आवाज कमी करा असे सांगितले तर 'आमचे घर आहे आम्ही काहीही करू' असे म्हणून आम्हालाच दमदाटी करतात. तरी ह्याबाबत मार्गदर्शन करावे. त्रस्त सभासद, मुंबई. आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, हे नागरिकशास्त्रामधील मूलभूत तत्व आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे नागरिकशास्त्राचे महत्व हे १०-१५ मार्कांपुरतेच सिमीत झाल्यामुळे असे प्रकार सर्रास घडतात कि काय असे खेदाने नमूद करावेसे वाटते. आपल्याला होणारा त्रास हा नक्कीच गंभीर असून कायदेशीरदृष्ट्या तो ध्वनिप्रदूषण म्हणून गणला जाऊ शकतो आणि एकंदरीतच ध्वनिप्रदूषणाच्या , ज्याचा आपल्या रोजच्या जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो , त्याच्या कायदेशीर तरतुदींबद्दल आपल्याकडे अज्ञान दिसून येते आणि कायद्याचे अज्ञान हा कधीही बचाव होऊ शकत नाही. सर्वप्...