मृत्युपत्राबद्दल थोडक्यात, पण महत्वाचे . ॲड. रोहित एरंडे ©
मृत्युपत्राबद्दल थोडक्यात, पण महत्वाचे . ॲड. रोहित एरंडे © " जिवासवे जन्मे मृत्यु जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत " गदिमांनी अतिशय सोप्या आणि भावपूर्ण शब्दांत आपल्याला मृत्यु निश्चित असतो, परंतु त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते हे सांगितले आहे. आपले आयुष्य एवढे अनिश्चित असताना आपल्या माघारी आपल्या कष्टाने मिळविलेल्या मिळकतीचे विभाजन आपल्या वारसांमध्ये सुकर आणि विना तंटा व्हावे म्हणून मृत्यूपत्रासारखा दुसरा सोपा आणि सोयीस्कर दस्त नाही. मात्र या विषयाबाबत आपल्याकडे, भिती , गैरसमज यांचे इथे घट्ट मिश्रण झाले आहे कि या महत्वाच्या विषयावर कितीही वेळा लिहिले तरी ते कमीच आहे असे जाणवते. या विषयाचा आवाका खूप मोठा आहे, तरी महत्वाच्या मुद्द्यांची थोडक्यात माहिती घेवू. मिळकतीमध्ये मालकी हक्क कसा मिळतो ? या विषयाकडे वळण्यापूर्वी एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा आपल्या हयातीमध्ये हवा असेल तर खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच दिला -घेतला जाऊ शकतो. तर एख...