"मृत्यूपत्राने मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित समजली जाते " - ॲड. रोहित एरंडे. ©
"मृत्यूपत्राने मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित समजली जाते " मला माझ्या वडिलांकडून मृत्युपत्राने एक फ्लॅट मिळाला आहे. माझ्या हयातीमध्ये या फ्लॅटमध्ये माझ्या बायकोचा आणि मुलांचा हक्क येतो का ? तसेच सोसायटी मध्ये वडिलांच्या संपूर्ण मृत्युपत्राची प्रत देणे गरजेचे आहे का ? का फक्त त्या फ्लॅटचा उल्लेख असलेले मृत्युपत्रामधील पान दिले तरी चालेल, कारण इतर मजकुराशी सोसायटीचा संबंध येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, पुणे. मृत्युपत्राइतकी भिती, गैरसमज इतर कोणत्याही कायदेशीर दस्ताबद्दल दिसून येत नाहीत. आधी हे लक्षात घ्यावे कि एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये नोंदणीकृत - खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या दस्ताने तबदील केला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने तबदील होऊ शकतो. मृत्यूपत्राप्रमाणे मालकी हक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक...