कॉमन टेरेस बंदही करता येत नाही आणि विकताही यत नाही. ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटीमध्ये जी कॉमन टेरेस (गच्ची) आहे, ती वापरायची नाही असा फतवा आमच्या मॅनेजिंग कमिटीने काढला आहे. तसेच आमच्या सोसायटीमध्ये एका कुटुंबाला अनुवांशिक व्हिटॅमिन डी कमतरता आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सकाळच्या उन्हात बसायला सांगितले आहे, जे गच्चीवरच मुबलक प्रमाणात मिळू शकते आणि ह्याचा इतर कोणालाही काही त्रास होत नाही, त्यांनाही कमिटी विरोध करत आहे. तर मॅनेजिंग कमिटी असा निर्णय घेऊ शकते का ? काही सभासद, पुणे. उत्तर : कॉमन (सामायिक) टेरेस वापरण्यावर निर्बंध हा अनेक ठिकाणचा ज्वलंत प्रश्न दिसून येतो. मॅनेजिंग कमिटी असो व जनरल बॉडी, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि मॅनेजिंग कमिटीला किंवा जनरल बॉडीला बहुमताच्या जोरावर कायद्याच्या विरुध्द जाऊन ठरवा देखील पारित करता येत नाहीत. "जी टेरेस कोणत्याही सभासदाच्या विशेष /एक्सक्लुजिव्ह ताब्यात नसेल" अशी व्याख्या आदर्श उपविधींमध्ये कलम ३ (xxi ) मध्ये ओपन किंवा कॉमन टेरेसची केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सभासद देखभाल दुरुस्तीचा खर्चही देत असतो ज्यामध्ये कॉमन टेरेसच्या दुरुस्तीचाही अंतर्भाव होतो...