सशस्त्र चंदन चोरीचा जीवघेणा थरार.. ॲड. रोहित एरंडे ©
सशस्त्र चंदन चोरीचा जीवघेणा थरार...... काही दिवस आपल्या आयुष्यात "कायमचे' लक्षात राहण्यासारखे येतात आणि असा दिवस जर आपल्या जीवावर बेतलेला असेल आणि आपण किती हतबल आहोत याची जाणीव करून देणारा असेल तर तो तर कायमचाच लक्षात राहतो.. असा दिवस आमच्या आयुष्यात १० ऑगस्ट २०२४ रोजी येणार आहे, याची आम्हाला स्वप्नात सुध्दा कल्पना नव्हती. आमच्या भारती निवास कॉलनी, प्रभात रोड , पुणे येथील घरात घरात सुमारे ७० वर्षे जुने असे चंदनाचे झाड होते (अत्यंत दुःखाने आता "होते" असे लिहावे लागत आहे).. सुमारे १८ वर्षांपूर्वी झाड कापण्याचा २ वेळा प्रयत्न झाला होता, परंतु शीलाताईंनी तो परतवून लावला होता आणि म्हणून त्या झाडाला मजबूत (!!) असा ६ फुटी उंच चौथरा बांधून घेतला होता आणि त्यावर ५ फुट लोखंडी ग्रील करून घेतले होते आणि त्यामुळे आम्ही निश्चिन्त होतो. असो. १० ऑगस्टला पहाटे सुमारे ३.१५-३०. चे दरम्यान मी आणि बायको अनघा असे एकदम दचकून जागे झालो कारण बोअर-वेल खणताना जसा प्रचंड आवाज होतो तसा एकदम ऐकू यायला लागला किंवा कोणी तर मोठी बाईक जोरात "रेज " करताना कसा आव...