७/१२, प्रॉपर्टी कार्ड, लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्स बिल, ह्यांनी मालकी हक्क ठरत नाही. ॲड. रोहित एरंडे ©
७/१२, प्रॉपर्टी कार्ड, लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्स बिल, ह्यांनी मालकी हक्क ठरत नाही. ॲड. रोहित एरंडे © ह्या लेखाच्या अनुषंगाने प्रॉपर्टी कार्ड किंवा ७/१२ ह्याबद्दल जनमानसात जे काही गैरसमज आहेत ते दूर व्हायला मदत होईल अशी आशा करतो. "मला माझ्या मुलाच्या 'नावावर' जागा करायची आहे" , "माझ्या बरोबर माझ्या बायकोचेही 'नाव' प्रॉपर्टीवर लावायचे आहे", यांसारखे प्रश्न अनेकवेळा वकीली व्यवसायात आम्हाला विचारले जातात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा प्रॉपर्टी कार्डला किंवा टॅक्स पावती /लाईट बिल येथे नाव लावायचा अर्ज दिला कि जागा आपल्या नावावर / मालकीची झाली. वस्तूथिती मात्र उलटी आहे कारण ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, लाईट बिल, टॅक्स पावती ह्यांनी मालकी हक्क ठरत नाही. ह्या कुठल्याही पावत्या /उताऱ्यांवर "मालकी हक्क" असा शब्द देखील नसतो हे आपल्या लक्षात येईल. खरेदी खत, बक्षीस पत्र, हक्क सोडपत्र ह्यांच्या इंडेक्स -II ला मालकी हक्काचा पुरावा म्हणता येईल . गावचा नमुना ७, ७अ आणि १२ यांचा एकत्रितरित्...