"कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन, नोकर ह्यांना वापरायला दिलेल्या जागेत कुठलाही हक्क प्राप्त होत नाही" - मा. सर्वोच्च न्यायालय. ऍड. रोहित एरंडे ©

 "कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन, नोकर ह्यांना वापरायला दिलेल्या जागेत कुठलाही हक्क प्राप्त होत नाही" - मा. सर्वोच्च न्यायालय. 

 ऍड.  रोहित एरंडे ©


एका अतिशय महत्वाच्या निकालाची थोडक्यात माहिती आपण ह्या लेखाच्या निमित्ताने करून घेऊ या. दुसऱ्याला मदत करणे हि आपली संस्कृती पूर्वापार चालत आलेली आहे.  आपल्या जागेचा सांभाळ करण्यासाठी केअर -टेकर , वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी जागा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. जेणेकरून त्यांनाहि डोक्यावर छप्पर मिळते आणि मालकांचीही  सोय होते. तसेच काही वेळा आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना राहण्याच्या जागेची निकड असताना प्रेमापोटी /आपुलकीने आपण राहण्यासाठी जागा देतो. परंतु अश्या केलेल्या उपकाराची फेड जेव्हा अपकाराने केली जाते, तेव्हा नाईलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागते ह्याचे हि केस म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

हिमालया व्हींट्रेड प्रा.लि. विरुद्ध मोहमद्द झाहीद (सिव्हिल अपील क्र.५७७९/२०२१) या याचिकेवर मा. न्या. अजय रस्तोगी आणि मा. न्या. अभय ओका ह्यांच्या खंडपीठाने "कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन, नोकर ह्यांना वापरायला दिलेल्या जागेत कुठलाही हक्क प्राप्त होत नाही" अश्या स्पष्ट शब्दात मागील महिन्यात निकाल दिला आहे. 

ह्या केसची थोडक्यात हकीकत अशी. याचिकाकर्त्या कंपनीने दावा मिळकत रीतसर खरेदी केली होती. ह्या जागेत  मोहमद्द झाहीद ह्याला आधीच्या मालकाने केवळ नोकर म्हणून जागेची देखभाल करण्यास ठेवले होते. परंतु जेव्हा कंपनीतर्फे  जागेचा ताबा मागितला गेला  तेव्हा त्याने  त्यास  नकार दिला   आणि उलटा मीच आता ऍडव्हर्स पझेशनने मालक  झालो  आहे आणि कंपनीला जागेवर कुठलाही हक्क नाही आणि कंपनीने बळजबरीने  ताबा घेऊ   नये म्हणून दावा ठोकला. त्या दाव्यात कंपनीने वादीला असा  दावा करण्याचा कुठलाही हक्क नाही म्हणून दावा (प्लेन्ट ) रद्द करावा म्हणून अर्ज केला. मात्र कनिष्ठ न्यायालय हा अर्ज फेटाळून लावते आणि तोच हुकूम  उच्च न्यायालयात देखील कायम ठेवला जातो, म्हणून कंपनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागते. तिथे मात्र वरील शब्दांमध्ये फटकारून मा. सर्वोच्च न्यायालय प्लेन्टच रद्दबातल ठरवते आणि वादी - मोहमद्द झाहीद ह्याने ३ महिन्यांत निर्वेध आणि प्रत्यक्ष ताबा मालकाला -कंपनीला द्यावा असा आदेश दिला.  ह्या आधी २०१२ साली  मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने 'मारिया फर्नांडिस विरुद्ध इरॅसमो सिक्वेरीआ' ह्या केसमध्ये खरेतर हा कायदा पक्का करून स्पष्ट शब्दांत घरमालकांच्या बाजूने निकाल दिला आणि खोटी  केस केली म्हणून केअर-टेकरला रु.  ५०,०००/- चा दंड देखील केला.  ह्या केसमध्ये कोर्टाने नमूद केले आहे कि 

१) पैसे न देता म्हणजेच ज्यांना आपुलकीने / मेहेरबानीने, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये 'ग्रॅच्युचिअस लायसेन्सी' असे म्हणतात, त्यांना राहण्यासाठी /वापरण्याकरिता  जागा दिली आहे  अश्या लोकांना सदरील  जागेमध्ये, त्या व्यक्ती कितीही वर्षे राहत असल्या, तरी कोणताही हक्क /अधिकार प्रप्त होत नाही. कारण अश्या व्यक्तींकडे जरी जागेचा ताबा असला तरी तो ताबा जागामालकाच्या वतीनेच  असतो.  

२) अश्या केअर टेकर, वॉचमन, नोकर किंवा प्रेमापोटी दिलेली  जागा वापरणारे  व्यक्ती  ह्यांचा ताबा वाचविणे हे कोर्टांसाठी योग्य (जस्टिफाईड) होणार नाही. 

३) केवळ ज्या व्यक्तीकडे योग्य आणि कायदेशीर भाडेकरार, लीज डिड किंवा  लिव्ह लायसेन्स असेल अश्या व्यक्तींनाच कोर्टाकडे ताब्यासाठी दाद मागता येईल. 

४) जर का अश्या व्यक्तींनी कोर्ट त्यांचा कथित ताबा वाचावा  म्हणून दावा केला, तर अश्या व्यक्तींनी दाव्याचा निकाल लागेपर्यंत  'चालू बाजार भावाप्रमाणे' ठराविक रक्कम दरमहा कोर्टात भरावी. हि रक्कम  दावा विरुद्ध गेला तर परत भरेन ह्या अटीवर  घरमालक काढून घेऊ शकतो. मात्र अशी रक्कम भरण्यास कुचराई केली तर कोर्ट जागेचा ताबा मालकाला देण्याचा हुकूम करू शकते तसेच दावा देखील रद्द होऊ शकतो असेही कोर्टाने पुढे नमूद केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयापर्यंत  दावे लढणे  हे बऱ्यापैकी खर्चिक प्रकरण  असून देखील  ह्या दोन्ही  केसमध्ये 'केअर-टेकर' शेवटपर्यंत भांडले ह्यावरूनच जागेचे मोल आपल्या लक्षात येईल. अश्या केअर-टेकर, नोकर , भाडेकरू ह्यांनी कायम लक्षात ठेवावे कि "एकदा भाडेकरू कि आयुष्यभर भाडेकरू' असे होत नाही. कधीतरी मूळ मालकाला जागेचा ताबा द्यावाच लागतोकेवळ लाईट बिलावर किंवा  मतदार यादीत नाव आहे ह्यावरून जागेचा वैध  ताबा आहे हे सिद्ध होत नाही, असे कोर्टांचे निकाल आहेत. अर्थात प्रत्येक केसच्या फॅक्टस देखील बघणे गरजेचे आहे. मालकांनी देखील  अश्या लोकांना जागा वापरण्यास देण्याआधी रीतसर लेखी करार तज्ज्ञ वकीलांकडून करून घेणे हितकारक राहील. 

धन्यवाद ,  🙏

 ऍड.  रोहित एरंडे ©

पुणे

Comments

  1. What is the share of daughter in father's property after his death
    Please reply

    ReplyDelete
    Replies
    1. In self acquired property of father, his legal heirs get equal share including daughter, if the father dies intestate.

      Delete
  2. आजीच्या नावे जमीन होती तिच्या निधना नंतर वडील व चुलते व आत्त्या चे नाव लागले वरील सर्व जण आत्ता हयात नाहीत 7/12वर आत्ता या सर्वांचं मुले आणि मुलींची नावे आहेत वाटप कसे करता येईल

    ReplyDelete
  3. मुलींना त्यांचा हक्क मिळवण्या साठी काय करावे लागेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©