हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्त : ऍड. रोहित एरंडे. ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्त :

ऍड. रोहित एरंडे. ©


मागील लेखात आपण बक्षीस पत्राबद्दल माहिती घेतली. ह्या लेखाद्वारे आपण मालमत्तेमधील हक्क तबदील करण्याच्या दस्तांमधील "हक्कसोड पत्र" किंवा ज्याला इंग्रजीमध्ये "रिलीज डीड" म्हणतात या एका महत्वपूर्ण दस्ताची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

ह्या दस्ताच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की हक्क सोडण्यासाठी मिळकतीमध्ये हक्क असणे अभिप्रेत आहे. जेव्हा २ किंवा अधिक व्यक्तींना एकाच मिळकतीमध्ये हक्क असतो आणि त्यामधील कुठल्याही एका सहमालकाला त्याचा/तिचा हिस्सा हा अन्य सहमालकाच्या लाभामध्ये सोडून द्यायचा असेल, तेव्हा हक्क सोड पत्र दस्त बऱ्याच वेळा केला जातो.


हक्कसोड पत्र आणि स्टँम्प ड्युटी :

हक्कसोड पत्र नोंदणीकृत असणे कायद्याने आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित मिळकतीमधील आपला हिस्सा स्वतःच्या भावाच्या किंवा बहिणीच्या किंवा मुलगा/मुलगी ह्यांच्या लाभात किंवा जेव्हा मुलगा/मुलगी मयत असतील तर त्यांच्या मुला मुलींच्या म्हणजेच नातवंडांच्या लाभात किंवा स्वतःच्या आई किंवा वडिलांच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या लाभात , पण कुठल्याही प्रकारचा मोबदला न स्वीकारता सोडून द्यायचा असेल, तर फक्त २०० रुपयांच्या स्टँम्प ड्युटी वर हक्क सोड पत्र नोंदणीकृत करता येते. अजूनतरी सरकारने ह्यामध्ये काही बदल केलेला नाही. ह्या नाममात्र स्टँम्प-ड्युटीसाठी वडिलोपार्जित मिळकत आणि आणि हक्क सोडण्यासाठी कुठलाही मोबदला घेतलेला नाही, ह्या दोन महत्वाच्या अटींची एकाचवेळी पूर्तता होणे आवश्यक आहे. इतर सर्व प्रकारच्या हक्क सोड पत्रासाठी मात्र खरेदीखतासारखीच संपूर्ण स्टँम्प-ड्युटी भरावी लागते.


 वडीलोपार्जित मिळकत आणि स्वतंत्र/स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे काय ह्याचा आपल्याकडे बऱ्याचवेळा गोंधळ दिसून येतो. वडिलोपार्जित मिळकत हि संकल्पनाच हळूहळू संपत चालली आहे, हे मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केले आहे. मात्र एखाद्या व्यक्तीची स्वतंत्र/स्वकष्टार्जित मिळकत हि कायम स्वतंत्रच राहते आणि तिच्या पुढच्या पिढीकडे ती मिळकत वडिलोपार्जित म्हणून जात नाही, असे निकाल १९८६-८७ सालापासून मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. बरेच वेळा मिळकत स्वतंत्र का वडिलोपार्जित अणि स्टॅम्पड्युटी ह्यावरून वाद-विवाद होतात. अश्यावेळी बक्षीस-पत्राचा तुलनेने कमी स्टॅम्प-ड्युटी लागू होणारा किंवा कुठलीच स्टॅम्पड्युटी न लागणार मृत्यूपत्रासारखा दस्त करणे श्रेयस्कर असते.


हक्क-सोड पत्राचा उपयोग :

हक्क-सोड पत्र नोंदणीकृत करून दिल्यावर दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील हक्क कायमचा संपुष्टात येतो आणि लिहून -घेणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील मालकी हिस्सा त्या प्रमाणात वाढतो. मात्र एकदा हक्कसोड पत्र नोंदविल्यावर ते अपवादात्मक परिस्थतीमध्ये म्हणजेच फसवणूक करून घेतल्याचे किंवा जोर-जबरदस्ती करून घेतल्याचे, विहित मुदतीमध्ये कोर्टात दावा लावून असे आरोप सिद्ध झाल्यासच रद्द होऊ शकते. हक्कसोड पत्राला बरेचवेळा बहीण-भावाचा दस्त असे समजले जाते. कारण बहुतांशी वेळा बहिणींचा वडीलोपार्जित मिळकतींमधील हक्क भावांच्या लाभात सोडण्यासाठी ह्या दस्ताचा वापर केला जातो. हा दस्त करण्यामागे देखील दस्त करणाऱ्या पक्षकारांची परस्परांबद्दलची आपुलकी अभिप्रेत असते. मात्र कधी कधी हक्क-सोड पत्रामागे , बहिणींचे लग्न झाले आहे मग त्यांनी आता हक्क सोडला पाहिजे अशी "सोड-हक्क" भावना असल्याचेही दिसून येते असो. सकाळ मनीच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

ऍड. रोहित एरंडे

पुणे. ©



Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©