झाड एकाचे, फांद्या दुसरीकडे मग फळांवर हक्क कोणाचा ? ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटीमध्ये आंब्याची काही मोठी झाडे आहेत. मात्र त्यांच्या फांद्या शेजारच्या सोसायटीमध्ये गेल्या आहेत. आता बऱ्याचवर्षांनी आंब्याच्या मौसमात या झाडांना चांगले आंबे आले आहेत आणि हे आंबे कोणी घ्यायचे यावरून वाद-विवाद दोन्ही सोसायट्यांच्या सभासदांमध्ये सुरु झाले आहेत. आमचे म्हणणे आहे की झाड आमचे असल्यामुळे आंबे आम्हीच घेणार, तर शेजारची सभासद म्हणतात फांद्या आमच्या भागात आल्यामुळे, त्याचा कचरा आम्ही साफ करतो त्यामुळे आम्हीच आंबे घेणार. या बाबतीत काही कायदा आहे असे ऐकले , तर कृपया मार्गर्दर्शन करावे. सोसायटी पदाधिकारी, पुणे. हा प्रश्न वाचून अनेकांना लहानपणी दुसऱ्याच्या झाडावरील पाडलेले आंबे, चिंचा यांची आठवण झाली असेल. पण कायदेशीर तरतुदींकडे वळण्यापूर्वी सोसायटीबाबत एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते की (सोसायटीमधील) बहुतांशी वाद हे इगो मधून आणि "हमसे आया ना गया - तुमसे बुलाया ना गया" सारख्या विचारसरणीतून - संवादाच्या अभावातून होतात. "तुटे वाद, संवाद तो हितकारी" म्हणजेच सुसंवाद केल्यास वाद टाळता येतात हे रामद...