मिटींगला हजर राहिले नाही म्हणून दंड करण्याचा अधिकार सोसायटीला नाही.' .ऍड. रोहित एरंडे ©

'मिटींगला हजर राहिले नाही म्हणून दंड  करण्याचा अधिकार सोसायटीला नाही.' 


नमस्कार. माझा एका सोसायटीमध्ये  फ्लॅट आहे, पण  मी तिथे राहत नाही. मला सोसायटीच्या मिटिंगची नोटीसही मिळत नाही.   आमच्या सोसायटीमध्ये मॅनेजिंग कमिटीने  नुकतेच एक सर्क्युलर काढून असे सूचित केले आहे कि जे सभासद सोसायटी मिटींगला हजर राहणार नाहीत त्यांना रु. १,०००/- इतका दंड प्रत्येक मिटिंग मागे करण्यात येईल. असे करणे कायदेशीर आहे का ?

— एक वाचक

सोसायटीमध्ये  मॅनेजिंग कमिटीचा  कारभार हा एक वादाचा विषय असतो.  बऱ्याच सोसायट्यांमध्ये 'थँकलेस जॉब' समजल्या जाणाऱ्या मॅनेजिंग कमिटी मध्ये काम करण्यास कोणी तयार नसते त्यामुळे जे काम करतात त्यांचा खाक्या चालण्याची शक्यता असतेच. आपल्या केसमध्ये सर्वांनी मीटिंगला उपसस्थित राहून सोसायटीच्या मिटिंगमध्ये उपस्थित राहावे असा चांगला हेतू  मॅनेजिंग कमिटीचा आहे असे गृहीत धरले तरी त्यांनी निवडलेला मार्ग नक्कीच कायदेशीर नाही आणि सोसायटी कायद्यामध्ये किंवा उपनियमांमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही ज्यायोगे मिटिंगला हजर राहिला नाही म्हणून सभासदाला दंड करता येईल. इतकेच काय तर मिटींगला उपस्थित राहणे ह्याची सुध्दा सक्ती करता येत नाही. पण त्याच बरोबर हेही तितकेच खरे आहे कि बरेच सभासद तिथे राहून सुद्धा मिटींगला उपस्थित राहत नाहीत आणि नेहमीचीच काही मंडळी उपस्थित राहतात. एकमेकांना सहकार्य करणे हा सहकारी सोसायटयांचे मूळ गाभा आहे. आपण जर मिटींगला उपस्थित राहिलो नाही तर मग नंतर सभेमध्ये जे काही निर्णय एकमताने /बहुमताने घेतले जातील, ते आहेत  तसे मान्य करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.  अर्थात सोसायटीने मिटिंग बोलाविण्याची कायदेशीर पद्धत  वापरली नाही किंवा  काही ठिकाणी 'हळूच' मिटिंग उरकली जात असेल तर अश्या बेकायदेशीर मिटिंगमधील ठराव देखील बेकायदेशीरच ठरतात. पण एक सभासद म्हणून मिटींगला हजर राहणे हे 'मँडेटरी' नसले तरी आपलेही कर्तव्य आहे. आपल्याला जर मिटींगला उपस्थित राहणे शक्य नसेल तर आपल्या  कुटुंबातील  सदस्याला नियमाप्रमाणे विहित प्रक्रिया पूर्ण करून सहयोगी सभासद (associate member ) बनवून हे अधिकार त्याला देऊ शकतात. 


तुम्ही दुसरीकडे राहत असलात तरी सध्याच्या व्हॅट्सऍप आणि स्मार्ट फोनच्या जमान्यात मिटिंगची नोटीस वगैरे मिळणे हे आता इंग्रजी  मध्ये म्हणतात तसे  'वन क्लिक अवे' असे राहिलेले आहे. सबब आपला  पत्ता, फोननंबर, ई-मेल अशी   अद्यतनित (अपडेटेड) माहिती सोसायटी ऑफिस मध्ये देऊन त्याची पोच घ्यावी जरी सोसायटीच्या दृष्टीने सदरील फ्लॅटवर  नोटीस पाठविणे एवढेच काम असले तरी तुम्ही एकदा पत्रव्यवहाराचा पत्ता / फोन/ ई-मेल कळविले कि   सोसायटीचे  काम सोपे होईल.


ऍड. रोहित एरंडे ©

Comments

  1. दंडाचा मार्ग अयोग्य असला तरी असा ठराव झालेला असल्याकारणाने त्याविरुद्ध सहकार न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे. सभादांनी एकतर बेकायदा ठराव मान्य करावेत किंवा कोर्टात जावे असा उपक्रम सोसायटींमधून सर्रास राबवला जातो. ठराव कोणत्या कायदा, नियम व उपविधी व घटनेतील तरतुदीनुसार वैध आहे ह्याचे स्पष्टीकरण देण्याचे बंधन समितीवर असणे आवश्यक आहे. स्पष्टीकरण देता आले नाही तर सोसायटीपातळीवरच असे ठराव रद्द होण्याचा कायदा असावा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©