सोसायटी कमिटी किती पैसे खर्च करू शकते ? रेफ्युज फ्लॅटचे काय करायचे ?ऍड. रोहित एरंडे

 सोसायटी कमिटीवर पैसे खर्च करण्यावर मर्यादा आहेत का ?


प्रश्न :  आम्ही आमच्या सोसोयटीचा महिने-महा  मेन्टेनन्स करत आहे. पण एखादा मोठा खर्च करण्याची वेळ आली तर तो खर्च सोसायटीला करता येतो का ? उदा. रंगकाम करणे , ड्रेनेज लाईन  बदलणे, सोलर टाकी दुरस्ती करणे,  नविन वॉटर पंप खरेदी करणे,  वॉटर प्रुफींग असे मोठे खर्च जे लाखो रुपयांच्या घरात जाऊ शकतात ते अधिकार कमिटीला आहेत का ? 

एक कमिटी मेंबर , पुणे  

उत्तर : असे प्रश्न कायमच सोसायटीमध्ये उपस्थित होतात. आदर्श  उपविधी  क्र. १५७ अन्वये मॅनेजिंग कमिटीला रिपेअर्स आणि मेंटेनन्स (Repairs  and  maintenance ) पोटी वार्षिक एकदा ह्याप्रमाणे खालील  मर्यादेमध्ये, जनरल बॉडीची मान्यता न घेता,  खर्च करता येतात. 

१-२५ सभासद असतील तर रु. २५,०००/-

२६ ते ५० सभासद असतील तर रु. ५०,०००/- आणि ५१ आणि त्यापेक्षा अधिक सभासद असतील तर रु. १,००,०००/-

ह्यापेक्षा जात रकमेचे कुठलेही खर्च असतील तर त्याला जनरल बॉडीची (general  body  meeting ) पूर्व मान्यता असणे गरजेचे आहे. तसेच मॅनेजिंग कमिटी कुठले आणि किती मर्यादेपर्यंतचे खर्च टेंडर न काढताही करू शकेल आणि कुठ्ल्या कामासाठी टेंडर काढणे गरजेचे आहे , हेसुद्धा  जनरल बॉडीने मिटिंगमध्ये ठरविणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या  सोसायटीमध्ये अशी मिटिंग होऊन खर्चाची मर्यादा ठरली नसेल, तर अशी जनरल बॉडी मिटिंग बोलाऊन करून घेणे क्रमप्राप्त आहे. यासाठी कमिटीला व्यवस्थित अभ्यास करून आणि सभासदांना विश्वासात घेऊन करावे लागणारे काम आणि खर्च ह्याची नीट माहिती दिल्यास पुढील आरोप प्रत्यारोप टाळता येतात. 


रेफ्युज फ्लॅटचे काय करायचे ?


प्रश्न :  बिल्डरने अद्याप रेफ्युजी फ्लॅटचा ताबा आमच्या सोसायटीस दिलेला नाही आणि बिल्डरने  रेफ्युजी फ्लॅट लोखंडी दार लावून बंद ठेवला आहे.  रेफ्युजी फ्लॅट असे बंदीस्त ठेवता येत नाहीत अश्या स्वरुपाचा नियम आहे. तरी हे नियम पाळण्याची जबाबदारी सोसायटीची आहे की बिल्डरची ? रेफ्युजी फ्लॅटस बाबत काय नियमावली आहे ?

एक सभासद, पुणे 

उत्तर : सर्वप्रथम  रेफ्युजी फ्लॅट म्हणजे काय हे थोडक्यात  समजावून घेऊ, कारण बरेच वाचकांना ह्याची कल्पना नसू शकते.  उंच बिल्डिंगमध्ये जर दुर्दैवाने आग लागल्यासारखे आपत्कालीन  प्रसंग निर्माण झाले तर सर्व रहिवाश्यांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी एखाद्या सुरक्षित ठिकाणाची  गरज असते. ह्या दृष्टीने भारतामध्ये सुमारे २००५ मध्ये प्रकाशित झालेल्या  नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये ' रेफ्युज एरिया' हि संकल्पना सर्वप्रथम  मांडली गेल्याचे दिसून येते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर रेफ्युज एरिया म्हणजे अश्या उंच इमारतींमध्ये ठराविक मजल्यानंतर   पूर्णपणे मोकळी ठेवलेली जागा, ज्याचा  उपयोग आग लागणे इ.  आपत्कालीन काळात रहिवाश्यांच्या सुटकेसाठी  केला जाऊ शकतो. नॅशनल बिल्डिंग कोड प्रमाणे असे  आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी जे मार्ग आहेत ते कायमच मोकळे आणि अतिक्रमण मुक्त ठेवले पाहिजेत हे तत्व दिसून येते. २०२० मध्ये जी एकत्रित  बांधकाम नियमावली म्हणजेच  यूनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स प्रसिद्ध झाले त्यामध्ये देखील रेफ्युज एरिया बद्दल स्पष्ट तरतुदी आहेत. त्याप्रमाणे  ह्याची कमीतकमी  एक बाजू "ओपन टू  एअर" असावी आणि गरजेपुरता (रेलिंग) कठडा असावा.  ह्या एरियाचे दार सुद्धा किती तास आगीपासून सरंक्षण देऊ शकेल अश्या प्रकारचे असावे , ह्याचे देखील  नियम आहेत. त्यामुळे ती जागा  बंदिस्त करून ठेवता येत नाही आणि तुम्ही म्हणत आहत तसे लोखंडी दार देखील आदर्श नियमावलीच्या विरुद्ध आहे असे वाटते.  यासाठी तुम्ही बिल्डरला लेखी कळवून लगेच ती जागा ताब्यात घ्या कारण उद्या दुर्दैवाने काही आग इ. घटना घडली तर मोठी अडचण निर्माण होईल. गरज पडल्यास तुम्ही पुणे महानगरपालिकेला सुद्धा ह्या पत्राची प्रत पाठवू शकता. 


ऍड. रोहित एरंडे 

Comments

  1. काही ठिकाणी 5 वर्ष AGM होत नाही.
    तसेच अध्यक्ष,खजिनदार,उपाध्यक्ष यांच्यात बेबनाव असल्यामुळे सोसायटी मेन्टेन होत नाही. अशा परिस्थितीत फ्लॅट धारक काय करू शकतो. तक्रारी कुठे नोंदवायची? कॉर्पोरेशन मध्ये काही department He ka

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©