हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हि जीवनावश्यक नसून कॉस्मेटिक सर्जरी आहे आणि म्हणून त्यास सर्व्हिस टॅक्स लागू होतो. ऍड. रोहित एरंडे.©

 हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हि जीवनावश्यक नसून कॉस्मेटिक सर्जरी आहे आणि म्हणून त्यास सर्व्हिस टॅक्स लागू होतो.

ऍड. रोहित एरंडे.©

पु. ल. देशपांडे म्हणतात तसे " माणसाच्या डोक्यावरचे केस गेलेले असले तरी चालेल, पण माणूस ही गेलेली केस नसावी"

कायद्याचा अभ्यास करताना  काही 'इंटरेस्टिंग' निकाल अवचित समोर येतात आणि त्याची माहिती असणे गरजेचे ठरते अश्याच एका 'केस आणि त्यावरील कर ' केसची माहिती घेऊ.

स्त्री असो वा पुरुष, सौंदर्य खुलवण्यात डोईवरील केसांचा वाटा फारच महत्वाचा. मात्र कधीकधी एकूण व्यक्तिमत्त्व आकर्षक असूनही एखाद्याचा ‘केसाने गळा कापलेला असतो’. त्यामुळे केस 'काळे" करण्यापासून "टोप (विग)" घालण्यापर्यंत अनेक प्रकार अवलंबिले जातात. ह्यातील गमतीचा भाग सोडला तर आता तंत्रज्ञान पुढे गेले आणि आता टोप (विग) घालण्यापेक्षा हेअर रिप्लेसमेंट, हेअर रिस्टोरेशन आणि सध्याची सर्वात लोकप्रिय म्हणजे केसांचे प्रत्यारोपण ज्याला इंग्रजीमध्ये हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात त्यापद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र असे हे हेअर ट्रान्सप्लांट कायद्याच्या ऐरणीवर वेगळ्याच प्रकारे आले. यासाठी हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय हे अगदी थोडक्यात समजावून घेऊ. या प्रक्रियेमध्ये प्लास्टिक सर्जन किंवा त्वचाविज्ञान सर्जन पेशंटच्या डोक्यावर ज्या भागात केसांची घनता जास्त आहे म्हणजेच जास्त करून डोक्याच्या मागच्या बाजूच्या किंवा डोक्याच्या कडेच्या बाजूच्या भागातून केसांचे फॉलिकल्स (बीज) घेऊन जिथे कमी केस आहेत किंवा जिथे टक्कल आहे त्या जागी या केसांचे प्रत्यारोपण म्हणजेच ट्रान्सप्लांट करतात .

तर अशी हि शस्त्रक्रिया हि "सौंदर्य खुलवणारी (कॉस्मेटिक) आहे का नाही आणि त्यावर सर्व्हिस टॅक्स आकारता येईल का नाही ? असा प्रश्न केंद्रीय सीमाशुल्क, अबकारी आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणापुढे डॉ. संजीव वासा, अहमदाबाद विरुद्ध सेवा कर विभाग या याचिकेच्या निमित्ताने नुकताच उपस्थित झाला. प्रकरण आहे २०११ मधील अहमदाबाद येथील प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. संजीव वासा ह्यांना हेअर ट्रान्सप्लांट पोटी मिळालेले रु. ८२,४७,१२७/- . एवढ्या रकमेचे उत्पन्न हे टॅक्स करपात्र का धरू नये आणि सदरील डॉक्टरांनी निषेध नोंदवून (अंडर प्रोटेस्ट) म्हणून भरलेली रु. ८,४९,४५४/- एवढी रक्कम त्यांच्या बाकीच्या टॅक्स दायित्वातून वळती का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस डॉक्टरांवर बजावली जाते. त्या विरुद्धचे अपीलही फेटाळले जाते.

डॉक्टरांतर्फ़े असा युक्तिवाद केला जातो कि हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हि कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी ह्यामध्ये मोडत नसल्यामुळे करपात्र होऊ शकत नाही तर उलटपक्षी करपात्र शस्त्रक्रियांसाठी अपवाद केलेल्या उदा. जीवावर बेतलेला गंभीर आजार किंवा शरीरशास्त्राची पुनर्रचना करणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचा अंतर्भाव होतो आणि म्हणून त्या करपात्र होत नाहीत. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने हात /पाय,/डोळा गमावल्यावर दिसेल तशीच एखादी व्यक्ती टक्कल पडल्यावर कुरूप दिसते. तसेच, पुरुषांमध्ये आढळणाऱ्या अँड्रोजेन ह्या हार्मोन्समधील विकृतीमुळे टक्कल पडते हे आता वैद्यकीय शास्त्रामध्ये सिध्द झाले आहे आणि त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करून हि विकृती दूर करून अश्या व्यक्तीला "नॉर्मल" बनविण्याचे आणि त्याचा आत्मविशास वाढविण्याचे काम केले जाते आणि म्हणून हि जीवनावश्यक शस्त्रक्रिया असल्यामुळे करपात्र होऊ शकत नाही, असा युक्तिवाद डॉक्टरांतर्फे केला जातो. 

अर्थात, टॅक्स विभागातर्फ़े ह्या अपिलाचे आणि युक्तिवादाचे जोरदार खंडन केले जाते. हेअर ट्रान्सप्लांट हि कॉस्मेटिक शस्त्रक्रियाच आहे आणि कुठल्याही प्रकारे ह्याची तुलना हि जीवनावश्यक किंवा अवयव पुनर्रोपण शस्त्रक्रियेशी केली जाऊ शकत नाही आणि सबब कर सवलत अश्या कॉस्मेटिक सर्जरीला देता येणार नाही, असा युक्तिवाद टॅक्स विभागातर्फे केला जातो. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अपिलीय न्यायाधिकारणाने डॉक्टरांचे अपील फेटाळून लावताना निकाल दिला कि हेअर ट्रान्सप्लांट हि काही अवयव पुनर्रोपण किंवा गंभीर आजार ह्या प्रकारात मोडत नाही, तर व्यक्तीचे बाह्य सौंदर्य खुलविण्यासाठीच हि शस्त्रक्रिया केली जाते आणि केस गळालेली प्रत्येक व्यक्ती अशी शस्त्रक्रिया करून घेत नाही तर ज्यांच्या खिशाला परवडते किंवा ज्या व्यक्ती स्वतःच्या रूपाबद्दल अधिक जागरूक असतात अश्या मोजक्या व्यक्तीच ह्याच्या वाटेला जातात. त्याचप्रमाणे ज्या हॉस्पिटल मध्ये अश्या शस्त्रकिया केल्या जातात तिथे देखील हि आजार बरा करणारा नाही तर बाह्य सौंदर्य खुलविणारी शस्त्रक्रिया अशीच जाहिरात केली जाते असेहि निकालात पुढे नमूद केले. तसे कॉंजिनायटल ऍट्रिशिया सारख्या अपवादात्मक आजरांमध्ये जन्मापासूनच एखाद्या व्यक्तीला केस येत नाहीत, तसे काही हे प्रकरण नाही असेही पुढे न्यायाधिकरणाने नमूद केले.

   "खल्वाटो निर्धनः क्वचित" म्हणजेच टक्कल असलेली व्यक्ती हि क्वचितच निर्धन असते, हे सुभाषित आठवले. त्यामुळे विचार करा.

 वैधानिक चेतावणी : हा निकाल वाचून आपल्या जबाबदारीवर डोक्यावरून हात फिरवावा. 

ऍड. रोहित एरंडे


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©