कॉमन टेरेस बंदही करता येत नाही आणि विकताही यत नाही. ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या सोसायटीमध्ये जी कॉमन टेरेस (गच्ची) आहे, ती वापरायची नाही असा फतवा आमच्या मॅनेजिंग कमिटीने काढला आहे. तसेच आमच्या सोसायटीमध्ये एका कुटुंबाला   अनुवांशिक व्हिटॅमिन डी कमतरता आहे आणि  डॉक्टरांनी त्यांना सकाळच्या उन्हात बसायला सांगितले आहे, जे गच्चीवरच  मुबलक प्रमाणात मिळू शकते आणि ह्याचा इतर कोणालाही काही त्रास होत नाही, त्यांनाही कमिटी विरोध करत आहे.  तर  मॅनेजिंग कमिटी असा निर्णय घेऊ शकते का ?


काही सभासद, पुणे.

उत्तर : कॉमन (सामायिक) टेरेस वापरण्यावर निर्बंध हा अनेक ठिकाणचा ज्वलंत प्रश्न दिसून येतो. मॅनेजिंग कमिटी असो व जनरल बॉडी, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि  मॅनेजिंग कमिटीला किंवा जनरल बॉडीला बहुमताच्या जोरावर  कायद्याच्या विरुध्द जाऊन ठरवा देखील पारित करता येत नाहीत. "जी टेरेस कोणत्याही सभासदाच्या विशेष /एक्सक्लुजिव्ह ताब्यात नसेल" अशी व्याख्या  आदर्श उपविधींमध्ये कलम ३ (xxi ) मध्ये ओपन किंवा  कॉमन टेरेसची केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सभासद देखभाल दुरुस्तीचा खर्चही देत असतो ज्यामध्ये कॉमन टेरेसच्या दुरुस्तीचाही अंतर्भाव होतोच. त्यामुळे ओपन टेरेस  सर्वांच्या  वापराकरिता असल्यामुळे ती बंद करून ठेवण्याचा अधिकार मॅनेजिंग कमिटीला नाही. अश्याच प्रकारे अडवणूक करणाऱ्या एका सभासदाला मुंबई उच्च न्यायालयाने   चांगलाच दणका दिला होता.  कॉमन टेरेस वर जाण्यासाठीचा रस्ता रेलिंग लावून अडवून ठेवल्याबद्दल आणि कॉमन टेरेस बिल्डरने विकली आहे असे असे खोटे सांगितल्याबद्दल याचिकाकर्त्याला  तब्बल ५०,०००/- रुपयांचा दंड देखील केला  होता आणि आग लागणे इ. आपत्कालीन परिस्थितीमध्ये  सभासदांना बाहेर पडण्यासाठी तसेच अग्निशामन दलाला  कॉमन टेरेस वर जाता येणे   गरजेचे असते असेही कोर्टाने नमूद केले होते.  (संदर्भ  : तसनीम  लोखंडवाला उर्फ धारीवाला विरुद्ध अमतुल्ला सी सोसायटी, २०१३-१४)

आता रेरा कायद्याच्या कलम २ (एन) मध्ये सामाईक (कॉमन) एरिया आणि फॅसिलिटीज कोणत्या ठेवायला लागतील ह्याची स्पष्ट यादीच दिली आहे, त्यामध्ये कॉमन टेरेसचाहि अंतर्भाव आहे.

कॉमन टेरेस विकताही येत नाही  :

ह्याच अनुषंगाने  मा. मुंबई उच्च न्यायालयाचा "श्रीमती. रामगौरी विराणी विरुद्ध ओमवाळकेश्वर त्रिवेणी को.ऑप. सो. (२००० {२} बॉम्बे केसेस रिपोर्टर,  पान  क्र . ६८७) हा निकाल महत्वाचा आहे.  "मोफा कायद्याप्रमाणे फ्लॅटच्या व्याख्येमध्ये टेरसचा अंतर्भाव होत नाही त्यामुळे बिल्डरला कॉमन टेरेस कोणा एकाला किंवा संयुक्तपणे विकता येत नाही, तसेच कार्पेट एरियामध्ये  देखील कॉमन टेरेसचा अंतर्भाव करता येत नाही". आणि "सामाईक गच्ची हि नावाप्रमाणेच सामाईक वापरासाठी असली पाहिजे, सबब केवळ बिल्डरने रजिस्टर्ड कराराने अशी गच्ची विकली असली तरी असा करारच मूलतः बेकायदेशीर असल्यामुळे तो सोसायटीवर बंधनकारक नाही" असे स्पष्टपणे मुंबई उच्च न्यायालायने नमूद केले.  
मात्र एक लक्षात  घ्यावे कि  'टेरेस -फ्लॅट' मध्ये  फ्लॅटला लागून असलेले छोटेसे टेरेस हे   फ्लॅट  मालकाच्या  स्वतंत्र मालकीची  असतात. अपार्टमेंट  बाबतीत  डीड ऑफ डिक्लरेशनमध्ये नमूद केले असल्यास केल्याप्रमाणे  सामाईक सोयी सुविधा वापरण्याचा  प्रत्येक अपार्टमेंट मालकाचा अधिकार हा कमी जास्त असू शकतो.  

जर का डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तर त्याप्रमाणे, इतरांना त्रास न होता,  वर्तन करण्याचा अधिकार संबंधित सभासदाला आहे. मॅनेजिंग कमिटी  हा काटेरी मुकुट असलेला थॅंकलेस जॉब असतो त्यामुळे अजून कटकटी वाढविण्यापेक्षा  कमिटीने  कायद्याने वागणेच हितावह आहे. फार तर सुरक्षितेतच्या दृष्टीने  गच्चीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवीता येतील किंवा बायोमेट्रिक लॉक बसवता आले किंवा कसे ह्याचाही विचार करावा.. तसेच सभासदांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे.   

गच्ची हा विषय निघाला की मला पु. ल. देशपांडे ह्यांनी अजरामर केलेला "गच्चीसह झालीच पाहिजे" हा बटाट्याची चाळ ह्या पुस्तकातील लेख आठवतो. पण एवढे फुलके प्रसंग प्रत्यक्षात घडत नाहीत..



ऍड. रोहित एरंडे. ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©