सभासदाला वर्गणीची सक्ती करता येणार नाही - ऍड. रोहित एरंडे ©

माझा प्रश्न असा आहे की, सोसायटीत उत्सव साजरे करण्यासाठी फंड जमा होतो तर  विकासकामांसाठी फंड जमा का होत नाही. म्हणून मी त्यांना उत्सव वर्गणी व भंडारा वर्गणी देण्यास मनाई केली. अश्या वर्गण्या देणे अथवा न देणे  हा  सर्वस्वी  माझा अधिकार आहे.  पण काही दाखले किंवा NOC मागायला गेल्यास उत्सव वर्गणी भरल्याशिवाय देत नाही. अश्या प्रकारची अडवणूक करण्यास सोसायटी पदाधिकाऱ्यांना अधिकार आहे का? मी सेवाशुल्क वेळेवर भरत असून देखील मला दाखले किंवा NOC केवळ  उत्सव वर्गणी भरत नसल्याने देण्यात येत नाही. याबद्दल कायदा काय सांगतो ?

श्री. देवानंद खिलारी, नवी मुंबई

कायद्याचे एक तत्व, विशेषतः सोसायट्यांच्या वादांबाबत  कायम लक्षात ठेवावे कि  "एखादी गोष्ट कायद्याने ज्या पद्धतीने करण्यास सांगितली आहे, ती त्याच पद्धतीने करावी अन्यथा अजिबात करू नये". हाऊसिंग सोसायट्या कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या प्रमाणात सभासदांकडून पैसे (चार्जेस)  आकारू शकतात ह्याचे तपशीलवार वर्णन आदर्श उपविधी विभाग  क्र. IX मध्ये उपविधी क्र. ६५ ते ७१ मध्ये दिलेले आहे.ह्यांची विभागणी संस्थेचा खर्च आणि वेगवेगळे निधी (फंड ) उभारणे  अशी केली जाते.  सोसायटीने वेगवेगळे निधी उभारणे निधीचा उपयोगी गुंतवणूक कशी करावी ह्याचीहि सविस्तर माहिती उपविधी ७ ते १५ मध्ये केल्याचे दिसून येईल.   उपविधी क्र. ६५ मध्ये सदस्यांकडून संस्थेचा खर्च आणि निधी उभारण्यासाठी सदस्यांकडून कोणत्या बाबींचा समावेश होतो ह्याची यादी दिली आहे. मात्र अश्या कुठल्याही उपविधींमध्ये कायदा-कर्त्यांनी धार्मिक -सांस्कृतिक कार्यक्रमासांठी वर्गणी -शुल्क घेता येईल असे स्पष्टपणे नमूद केलेले आढळून येत नाही. त्यामुळे अश्या प्रकारच्या वर्गण्या देण्यासाठी सोसायटीला सभासदांवर सक्ती करता येणार नाही आणि अशी वर्गणी दिली नाही म्हणून कुठलीही NOC  अडवणे कायद्यात बसत नाही आणि सबब तुम्ही अश्या वर्तनाविरुद्ध तसेच विकासकामे होत नसतील तर   मे. सोसायटी रजिस्ट्रार ह्यांच्याकडे लेखी तक्रार करू शकता. ह्या सर्व प्रकारामध्ये अशी  "सक्ती" आणि "अडवणूक" ह्या दोन गोष्टी सहकार तत्वाच्या आणि कायद्याच्या विरुध्द आहेत. 


परंतु  उपविधी '६५ (क्यू) - कोणतेही अन्य आकार' आणि ६६ (म) - संस्थेचे उपविधी ,नियम ह्यांस बाधा न येईल अश्या पद्धतीने  सर्वसदस्य मंडळाने सर्वसाधारण सभेत मान्य  केलेल्या इतर खर्चाच्या  बाबी"  आणि ६७(१६) - "कोणतेही अन्य आकार" ह्या तरतुदी अस्पष्ट आणि संदिग्ध आहेत. त्याचप्रमाणे सोसायटीचे उद्दिष्ट काय असावीत ह्याबद्दलचे उपविधी ५ (ड ) मधील उपकलम (ड ) - मध्ये ' स्वतःच्या जबाबदारीवर किंवा अन्य सोसायटीच्या सहाह्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्क्रम आयोजित करणे आणि त्यासाठी तरतूद करणे' अशी तरतूद केली आहे. मात्र त्यासाठी राखीव निधीचा वापर कसा करावा ह्यासाठी उपविधी क्र. १४८ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे ५(ड) मधील उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वसाधारण सभा निश्चित करेल इतकी रक्कम सामाइक कल्याण निधीच्या खाती वर्ग करता येईल.  

ह्याचबरोबर जे पैसे सोसायटी घेणार आहे ते उद्दिष्टांच्या विपरीत असेल तर इन्कम टॅक्स कायद्याचीही अडचण येऊ शकते. 

वरील तरतुदींचा लाभ घेण्यासाठी तुमच्या सोसायटीचे सदरील उद्दिष्ट आहे का हेही लक्षात घ्यावे लागेल आणि तसे उद्दिष्टय असेल तर सोसायटीला उपविधी क्र. १४८ (३) अन्वये सामाइक कल्याण निधी निर्माण करून सर्वसाधारण सभा ठरवेल तेवढी रक्कम वितरीत करता येईल.  उत्सवांसाठी   वर्गणी ऐच्छिक असू शकते. मात्र ह्यासाठी  आपल्या केस सारखी सभासदांची वैयत्तिक अडवणूक करता येणार नाही. 

ऍड. रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©