"सभासदांचे तारतम्य' हा रिडेव्हलपमेंटचा गाभा. ॲड. रोहित एरंडे ©
"सभासदांचे तारतम्य' हा रिडेव्हलपमेंटचा गाभा. : ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या २० सभासदांच्या सोसायटी मध्येहि रिडेव्हलपमेंटचे वारे व्हायला लागले आहे. कारण आजूबाजूच्या सोसायट्यांचे काम सुरूही झाले आहे. आमची बिल्डिंग २५ वर्षे जुनी आहे. मात्र आमच्याकडे २ गट पडले आहेत. एका गटाला वाटते कि ७ मजल्याच्या वर बिल्डिंग होऊ नये भले जास्त वाढीव जागा नाही मिळाली तरी चालेल , तर दुसऱ्या गटाला वाटते कि पूर्ण FSI वापरून फ्लॅटला फ्लॅट मिळणार असेल तर कितीही मजली बिल्डिंग झाली तरी बेहतर, त्यातच काही सभासदांच्या मते प्रॉपर्टी कार्डवर नाव लावणे, सभासदांची अंतर्गत वाद सोडवणे हे बिल्डरनीच करायला हवे आहे आणि सोयी-सुविधांची मागणी तर संपतच नाही. तर यातून कसा मार्ग काढावा ?
काही सभासद, पुणे.
पुण्यासारख्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे वारे, काय मी तर वादळच म्हणेन, जोरात व्हायला लागले आहेत ह्यात काही शंका नाही. एक कायदेशीर तत्व लक्षात घ्यावे, एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते आणि एखादी गोष्ट करता येते ह्या फरक आहे. उदा. लग्नाचे वय झाल्यावरच लग्न करता येते ह्याचा अर्थ लग्न करायलाच पाहिजे असे कायदा सांगत नाही. त्याचप्रमाणे अमुक इतकी वर्षे झाल्यावर रिडेव्हलपमेंट करावेच किंवा करू नये असाही काही कायदा नाही. त्यामुळे केवळ आजूबाजूला रिडेव्हलपमेंट होतेय म्हणून तुम्हीही ते केलेच पाहिजे हि विचारसरणीच चुकीची वाटते.
रिडेव्हलपमेंट करणे चांगले का वाईट ह्याचे १+१ =२ असे गणिती उत्तर देता येणार नाही. रिडेव्हलपमेंट हा दूरगामी आणि कायमस्वरूपी परिणाम करणारा निर्णय असतो, त्यामुळे आपल्या बिल्डिंगची परिस्थिती, जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्या प्रमाणात मिळणारा फायदा इ. गोष्टी विचारात घेऊन सरकारच्या नियमावलीस अधीन राहून सभासदांनी डोळसपणे निर्णय घेणे गरजेचे असते. काही इमारती ह्या दुरुस्तीच्याही पलीकडे गेलेल्या असतात आणि रिडेव्हलपमेंट मुळे चांगल्या दर्जाचे बांधकाम, वाढीव जागा, नवीन सोयी सुविधा, इ. फायदे होतात आणि हे फायदे प्रत्येक इमारतीप्रमाणे कमी-जास्त होतात. पण त्याचप्रमाणे रिडेव्हलपमेंट झाल्यावर नवीन जागेचा प्रॉपर्टी टॅक्स, मेंटेनन्स इ. खर्चामध्ये 'एका शून्याची' तरी वाढ होते असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. रिडेव्हलपमेंट हा सोसायटी आणि बिल्डर दोघांसाठी "विन-विन" परिस्थिती असणारा असेल तरच करण्यात हशील आहे. त्यातच आपण किती आणि काय सोयी सुविधा मागायच्या, यातही तारतम्य हवे आहे. "अती लोभ त्यास क्षोभ होईल जाणा " हे समर्थ वचन येथेही लागू होते. कुठलाही बिल्डर "चॅरिटी " म्हणून हे काम करीत नाही. "there is no free lunch in the world" हे लक्षात घ्यावे.
विकास का पर्यावरण ?
परंतु आपण विचारल्याप्रमाणे आता हळूहळू का होईना सभासद विकास का पर्यावरण हा मुद्दा विचारात घ्यायला लागले आहेत. कारण उंच उंच इमारतींना परवानगी दिली तरी तेवढी पायाभूत सोयीसुविधा उपल्बध होणार का आणि त्याचा परिणाम शहरांमध्ये बकालपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो असे पर्यावरण आणि नगररचना तज्ज्ञांचे मत आहे, जे काही सभासद आचरणात आणू आगळे आहेत. कारण मोठ्या टॉवरमध्ये सभासद संख्या वाढतेच आणि त्या प्रमाणात पार्किंग, पाणी, ड्रेनेज ह्यांसारख्या सोयी सुविधा विभागल्या जातात आणि त्यात कमर्शिअल आणि रहिवासी असे दोन्ही असेल तर त्यांचे प्रश्न अजून वेगळे असतात . रिडेव्हलपमेंट हा एफएसआय चा खेळ आहे. त्यामुळे समजा १२-१५ मजली इमारत नियमाप्रमाणे बांधता येत असूनही सभासदांनी ६-७ मजली इमारतीचाच आग्रह धरला, तर १२-१५ मजली इमारतीला बिल्डरचा जेवढा फायदा होईल तितका तो ७ मजली इमारतीला होणार नाही आणि पर्यायाने सभासदांचाहि फायदा कमी होऊ शकतो असा हा सोपा हिशोब आहे . दोन्ही गटांची अपेक्षा पूर्ण करणारा बिल्डर नक्कीच मिळेल, पण त्यासाठी सभासदांमध्ये एकमत होणे गरजेचे आहे. पुनर्विकासामुळे होणाऱ्या मतभेदांमुळे ३०-४० वर्षे असलेले जिव्हाळ्याचे संबंध बिघडत चालल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला आहेत तेवढ्या सभासदांसाठी नवीन बांधकाम करायचे असेल आणि नवीन "हिस्सेदार" नको असतील तर सेल्फ-रिडेव्हलपमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. अर्थात त्याचे स्वतःचे फायदे -तोटे आहेतच. त्यासाठी तज्ञांची मदत घ्या.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment