रात्री १० ते सकाळी ६ - शांतता राखा - बांधकाम बंद ! - ऍड. रोहित एरंडे ©

रात्री १० ते सकाळी ६ - शांतता राखा - बांधकाम बंद !

आमच्या भागात  काही बांधकाम प्रकल्प चालू आहेत आणि त्यांचे काम कधीही रात्री बेरात्री चालू असते आणि त्यामुळे होणाऱ्या आवाजामुळे आम्हाला खूप त्रास होतो. त्यांना रात्री काम थांबवा असे सांगितले तरी ते ऐकत नाहीत. तर  असे बांधकाम करण्यावर काही वेळेची बंधने आहेत का ? 

त्रस्त रहिवासी, पुणे.  

आपल्या सारखा ध्वनी प्रदूषणासारखा  अनुभव अनेकांना येत असतो.  सर्वोच्च तसेच विविध उच्च न्यायालयांनी अनेक निकालांमधून ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी निकाल दिलेले आहेत. तसेच    ध्वनी प्रदूषण कायदा कागदावर खूप तगडा आहे पण आज २ तप व्हायला आली तरी अंमलबजावणी म्हणावी तशी होताना दिसत नाही. एकतर आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, हे नागरिकशास्त्रामधील मूलभूत तत्व आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे नागरिकशास्त्राचे महत्व हे १०-१५ मार्कांपुरतेच सिमीत झाल्यामुळे असे प्रकार सर्रास घडतात  कि काय असे खेदाने नमूद करावेसे वाटते.  आपल्याला होणारा त्रास हा नक्कीच गंभीर असून कायदेशीरदृष्ट्या तो ध्वनिप्रदूषण म्हणून गणला जाऊ शकतो.   सर्वप्रथम आधी ह्या 'गोंगाटाचे' रेकॉर्डिंग करून ठेवावे, ज्याचा पुढे पुराव्याकामी  उपयोग होऊ शकतो.  

  "जर एखाद्याला आवाज करण्याचा  अधिकार असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला तो न ऐकण्याचाहि अधिकार आहे.  प्रत्येकाला सन्मानाने , स्वखुशीने  आणि शांत वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि  ह्या अधिकारात किडा - मुंगी सारखे जगणे त्यामुळेच अभिप्रेत नाही" असे मा. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच सांगितले आहे. 

ध्वनी  प्रदुषण (नियम आणि नियंत्रण ) नियम २००० (नियम ५अ ) अन्वये रहिवासी भागात आणि हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, ह्यांसारख्या 'सायलेंट झोन' म्हणून घोषित केलेल्या भागांमध्ये रात्रीच्या वेळात  मोठ्यांदा  हॉर्न वाजविणे, फटाके उडविणे ह्यावर बंदी आहे. त्याच नियमामध्ये पुढे स्पष्टपणे नमूद केले आहे कि रहिवासी आणि सायलेंट झोन भागांमध्ये रात्रीच्या  वेळी, ज्यातून आवाज निर्माण होईल (sound  emitting ), अश्या प्रकारची  बांधकाम उपकरणे /साधनसाहित्य वापरण्यावर बंदी आहे. रात्रीची वेळ म्हणजे रात्री १० ते सकाळी ६  असेही पुढे स्पष्ट केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जर कोणी ह्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याविरुध्द पोलिसांकडे तक्रार करता येते आणि अश्या  गुन्ह्यांसाठी काही लाखांचा दंड तसेच कैद सुध्दा होऊ शकते.  १-२ वर्षांपूर्वी ह्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई मधील काही  प्रतिष्ठित बिल्डर विरुध्द गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. हे नियम बांधकाम व्यावसायिकांनी सुध्दा गंभीरपणे घ्यावेत, कारण  कायद्याचे अज्ञान हा कधीही बचाव होऊ शकत नाही.  बांधकाम म्हंटले कि वेगवगळ्या उपकरणांचा आवाज  आलाच आणि हा आवाज कमी करण्याचे तंत्र अजून कोणी शोधून काढलेले नाही.  पण हाच आवाज जर रात्रीच्या वेळी असेल तर नक्कीच जास्त त्रासदायक ठरते. 

"एखाद्याचा आवाज हा दुसऱ्यासाठी गोंगाट ठरू शकतो" असेहि सर्वोच्च  न्यायालयाने पुढे म्हटले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे निकाल सार्वजनिक अथवा खासगी अश्या कुठल्याही ठिकाणी होणाऱ्या 'ध्वनी प्रदूषणाला' लागू होतात. ध्वनी हा "डेसिबल" ह्या एककामध्ये ( युनिटमध्ये) मोजतात. वरील नियमांप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी  डेसिबल मर्यादा हि  दिवसा  ७५ , तर रात्री ७० आहे , तर हिच मर्यादा  रहिवासी क्षेत्रासाठी अनुक्रमे ५५ आणि  ४५ इतकेच आहे. 

ध्वनिप्रदूषणाला 'सायलेंट किलर' म्हणतात कारण त्यामुळे  शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते, आणि हो, प्रदूषण करणाऱ्याचेही बिघडत असते. असो.  आपण आपल्या होणाऱ्या त्रासाविरुद्ध जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये  लेखी तक्रार करू शकता. 

ऍड. रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©