सोसायटीमध्ये जागा उपलब्ध असल्यास ती सोलर पॅनेलसाठी देणे सोसायटीवर बंधनकारक. - ऍड. रोहित एरंडे ©

  सोसायटीमध्ये  जागा उपलब्ध असल्यास ती सोलर पॅनेलसाठी   देणे सोसायटीवर बंधनकारक. 


ऍड. रोहित एरंडे ©


आमच्या बिल्डिंगच्या कॉमन टेरेसवरती  मला  गरम पाण्यासाठी तसेच विजेसाठी  सोलर पॅनल बसवायचे आहे. कारण मी सोसायटीला विनंती केली होती कि आपण सर्वांसाठी असे पॅनल बसवून घेऊ त्याचा सगळ्यांना फायदा होईल , पण त्याला सोसायटी मान्यता देत नाही. तर मी स्वतःसाठी असे सोलर  पॅनल सामायिक गच्चीवर बसवू शकतो का ?


एक सभासद, पुणे. 



सौर ऊर्जा प्रणाली म्हणजेच सोलर सिस्टीम हि आता बहुतेक ठिकाणी विशेष करून गरम पाण्यासाठी  वापरली जाते आणि काही मोठ्या सोसायट्यांमध्ये वीज-निर्मितीसाठीही तिचा वापर होतो. 


आदर्श उपविधी मध्ये सौर ऊर्जा प्रणाली साठी स्वतंत्र नियम आहे. नियम १७० प्रमाणे एक किंवा अनेक सभासदांना सौर ऊर्जेची उपकरणे गच्चीवर इतकेच नव्हे तर इमारतीच्या अन्य भागावर बसवायची असतील आणि त्यासाठी जागा उपलब्ध असेल तर संबंधित सदस्यास अशी उपकरणे बसवायची परवानगी समिती देऊ शकते. ह्याच नियमामध्ये पुढे जाऊन सौर ऊर्जा यंत्रणा म्हणजे काय हे नमूद करताना त्यामध्ये सोलर कलेक्टर स्टँड , गरम आणि थंड पाण्याची टाकी, टाकीचा स्टॅन्ड, गरम पाण्याची पाईपलाईन ह्यांचा समावेश होतो. तसेच सोलर विद्युतीकरण पॅनल, बॅटरी, इनव्हर्टर चार्ज कंट्रोलर, केबल इ. चा समावेश होतो. 


पुढे जाऊन असेही नमूद केले आहे कि या संदर्भात जागा उपलब्ध करण्याकरिता समितीकडे सभासदाने विचारणा केल्यावर तशी जागा उपलब्ध असल्यास ती संबंधित सभासदास उपलब्ध करून देणे समितीवर बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्या केसमध्ये जर टेरेसवर किंवा अन्य ठिकाणी सुध्दा जर  जागा उपलब्ध असेल तर तशी जागा सोसायटीने आपल्याला उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. तसा  लेखी अर्ज आपण सोसायटीकडे करावा. अर्थात जागा उपलब्ध आहे कि नाही हाच   कळीचा बानू शकतो. त्यातून सौहार्दपूर्ण तोडगा काढल्यास कोर्टाची पायरी चढायची वेळ येणार नाही. 


खरेतर सोलर म्हणजेच सौर ऊर्जा हि एक अक्षय आणि शाश्वत अश्या पर्यायी उर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे आणि आपल्यासारख्या देशात ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अश्या सौर उर्जेपासून वीजनिर्मिती करताना कोणत्याही इंधनाचे ज्वलन होत नाही आणि त्यामुळे प्रदूषण होत नाही, त्यामुळे तुमच्या सोसायटीने सर्वांसाठी ह्याचा वापर केल्यास फायदा सर्वांनाच होईल आणि उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर होऊ शकेल .  अर्थात वीज निर्मितीसाठी सौर उपकरणे  बसविण्याचा  खर्च तुलनेने जास्त असू शकतो. त्यामुळे   आपली  (एकट्याची)  गरज आणि होणार खर्च ह्याचा ब्रेक-इव्हन -पॉईंट (समआयव्ययांक) याचा विचार आपण  तज्ञ् व्यक्तींचा सल्ला घेऊन  केला असेलच असे गृहीत धरतो. 




ऍड. रोहित एरंडे 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©