गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच... ऍड. रोहित एरंडे ©
गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच...
ऍड. रोहित एरंडे ©
"सर, मला अजमेर, राजस्थान येथील कोर्टाची नोटीस आलीय आणि माझ्या विरुध्द ८६ लाख रुपयांचा दावा केलाय".. आमच्या स्वयंपाकाच्या मावशींचा मुलगा काकुळतीने येऊन सांगत होता.. कागद बघितल्यावर मी विचारले "अरे हि तर मोटार अपघात प्राधिकरणाची नोटीस आहे, कि तू गाडी कधी घेतलीस आणि आता विकलीस कधी ? ,, "सर, जरा शो म्हणून थर्ड हॅन्ड घेतली कशी तरी पण नंतर परवडेना म्हणून विकून टाकली".. मी विचारले" विकताना काही कागद केलेस का ? आरटीओ रेकॉर्डला तुझे नाव बदल्लेस का ? यावर अर्थातच उत्तर अपेक्षेप्रमाणे नाही आले... म्हटले तू ज्यांना गाडी विकलीय, त्यांनी ती परत कोणालातरी विकली आणि त्या दुसऱ्या गाडीवाल्याच्या हातून राजस्थान मध्ये अपघात झालाय त्यात १-२ माणसे गेलीत आणि त्याच्या नुकसान भरपाई करण्यासाठी त्यांनी दावा केला आहे आणि आरटीओ रेकॉर्डला गाडीच्या मालक सदरी अजूनही तुझेच नाव असल्यामुळे तुला नोटीस आली आहे !!"
या प्रकरणामुळे परत एकदा गाडी विकताना किती सावधगिरी बाळगायला पाहिजे हे लक्षात आले आणि सुप्रीम कोर्टाच्या महत्वाच्या निकालाची आठवण झाली.
नवीन गाडी घेताना बऱ्याचदा जुनी गाडी एक्सचेंज केली जाते आणि केवळ गाडीचे पैसे दिले-घेतले म्हणजे प्रश्न संपत नाही, तर गाडीची मालकी आर. टी.ओ रेकॉर्डला कायद्याने तबदील म्हणजेच ट्रान्सफर होणे किती महत्वाचे आहे हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने "नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार आणि इतर, (अपील क्र . १४२७/२०१८)" या याचिकेवर दिलेल्या निकालावरून स्पष्ट होईल.
या केसची पार्श्वभूमी वरील प्रसंगासारखीच आहे आणि कदाचित आपल्यापैकी अनेकांबाबत असे घडलेले असू शकते. तर कोण एक विजय कुमार त्यांच्या मालकीची मारुती-८०० गाडी २००७ मध्ये एका व्यक्तीला विकतात आणि अश्याच प्रकारे ३-४ वेळा ती गाडी विकली जाऊन सरते शेवटी ती पिटीशनर - नवीन कुमार हे २००९ साली विकत घेतात. मे-२००९ च्या सुमारास गाडी मागे घेताना अपघात होऊन एका जाईदेवी आणि नितीन या चुलती-पुतण्याला अपघात होतो , ज्यामध्ये जाई-देवी ह्या गंभीर जखमी होतात , तर नितीनचा जागेवरच मृत्यू होतो. कालांतराने नुकसान भरपाईसाठी २ वेगळ्या याचिका दाखल होतात. या याचिकांमध्ये अपघाताची जबाबदार कोणाची असा प्रश्न मोटार अपघात प्राधिकरणापुढे उपस्थित होतो. त्यातच गाडीचा इन्शुरन्स संपलेला असतो. मोटर वाहन कायद्याच्या कलम २(३०) प्रमाणे ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेले असते, तीच व्यक्ती गाडीची मालक समजली जाते. याला अपवाद म्हणजे ती व्यक्ती अज्ञान असेल तर किंवा हायर-पर्चेस कराराने गाडी घेतली असेल तर अनुक्रमे त्या व्यक्तीचा पालक आणि ज्याच्या ताब्यात गाडी असेल ती व्यक्ती मालक समजली जाते.
या केस मध्ये ४-५ वेळा गाडी विकली गेली असली तरी अजूनही आर.टी.ओ. च्या रेकॉर्ड रजिस्टर मध्ये मालक म्हणून विजय कुमार ह्यांचेच नाव असते.* सबब गाडी जरी ४-५ वेळा विकली गेली असली तरी अद्यापही विजय कुमार ह्यांचेच नाव मालक म्हणून रजिस्टरला असल्यामुळे त्यांनीच नुकसान भरपाई द्यावी असा निकाल मोटर अपघात प्राधिकरण देते. त्याविरुद्ध विजय कुमार पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात. ही याचिका मान्य करताना उच्च न्यायालय मा. सर्वोच न्यायालयाच्या काही निकालांचा आधार घेऊन निकाल देते की, जरी आर. टी. ओ मधील रजिस्टर मध्ये मालकाचे नाव बद्दल नसले तरी, सदरील गाडीची मालकि -४ वेळा बदलून शेवटी ती पेटिशनर ह्यांना विकल्याचे पुरावे आहेत, सबब मूळ मालकाला केवळ रजिस्टर मधील नाव बदलेले नाही, म्हणून जबाबदार धरता येणार नाही, उलट शेवटचा मालक म्हणून नवीन कुमार ह्यांनाच जबाबदार धरले पाहिजे.
गाडी मालक म्हणजे कोण ?
शेवटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचते. आपल्या १४ पानी निकालपत्रात सर्वोच्च न्यायालायने एकंदरीतच ह्या प्रश्नाच्या विविध पैलूंचा आणि पूर्वीच्या विविध निकालांचा उहापोह केला आहे. *मा. सर्वोच्च न्यायालायने मोटर अपघात प्राधिकरणाचा निकाल कायम करताना असे प्रतिपादन केले की जरी पैसे दिल्यानंतर आणि गाडीचा ताबा दिल्यानंतर मालकी हक्क बदलत असला तरी, मोटर वाहन कायद्यामधील "मालक" या व्याख्येप्रमाणे रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव असेल, तीच व्यक्ती मालक म्हणून समजली जाईल आणि ह्यात बदल करता येणार नाही.
नुकसान भरपाई मागणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळणे सोपे जावे आणि रजिस्टरला नोंद न झालेल्या वेगवेगळ्या तथाकथीत गाडीमालकांचा शोध घेत त्याला फिरावे लागू नये, हा हेतू ह्या तरतुदीमागे आहे, असेही सर्वोच्च न्यायालायने शेवटी नमूद केले.
नुकत्याच आलेल्या दुसऱ्या एका निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले कि "असे एखादे वाहन लेखी कराराने विकले किंवा बक्षीस दिले आणि त्याची केवळ नोंद आर. टी. ओ रेकॉर्डला झाली नाही तरी तो व्यवहार रद्दबातल ठरत नाही". या केसमध्ये अरुणाचल प्रदेशमधील एका आमदाराने त्याची ३ वाहने वेगवेगळ्या व्यक्तींना विकली होती आणि त्यामुळे इलेक्शन नॉमिनेशन फॉर्म मध्ये "वाहने नाहीत" असे त्याने लिहिले होते. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवाराने आर. टी. ओ रेकॉर्डला अद्याप त्या आमदाराची वाहने असल्याचे निदर्शनास आणले आणि अशी खोटी माहिती दिली म्हणून उमेदवारी रद्द करावी अशी केस केली आणि गुहाहाटी उच्च न्यायालयाने ती मान्य करीत उमेदवारी रध्दीरद्दही केली ! आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचते. मात्र वरील नवीन कुमार हा निकाल अपघात आणि उत्तरदायित्व बाबत असल्याने येथे लागू होत नाही असे कोर्टाने नमूद केले आणि आमदाराला दिलासा दिला. (संदर्भ : कारीहिको क्रि वि. नुने तयांग - सिव्हिल अपील ४६१५/२०२३ - न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. संजय कुमार). असो.
स्थावर मिळकत आणि मालकी हक्क :
मात्र स्थावर मिळकतींबाबत बाबतीत मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच मिळू शकतो आणि एकदा मिळालेला मालकी हक्क हा अश्याच दस्ताने किंवा मृत्युपत्राने तबदील होतो आणि ते केले नसेल नसेल तर वारसाहक्काने तबदील होतो. तसेच ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड यावरून मालकी ठरत नाही . हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे. असो.
तर या निकालाचे महत्व आता लक्षात घ्यावे. "कोणाच्या खांदयावर कोणाचे ओझे" असे वाटले तरी ज्यांनी ज्यांनी गाडी विकली असेल त्यांनी त्वरीत त्यांचे नाव आर टी ओ रजिस्टरला बदलेले आहे की नाही याचा पाठपुरावा करा. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे गाडीचा इन्शुरन्स चालू आहे कि नाही ह्यावर लक्ष ठेवा आणि इन्शुरन्सचे हप्ते वेळेवर भरा . आपल्याला निकाल आवडलाय की नाही याला काही महत्व नाही आणि कागदपत्रांचे रेकॉर्ड नीट ठेवणे याला पर्याय नाही.
ऍड .रोहित एरंडे .
पुणे. ©
Comments
Post a Comment