पाणी गळती - सोसायटीचे उत्तरदायित्व काय ? - ऍड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या मालकाच्या हातून चुकून पाण्याचा नळ चालू राहिला त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये पाणी गळती होऊन फर्निचर इ. चे खूप नुकसान झाले आहे. तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटच्या मालकाचं असं म्हणणं आहे की, तुम्ही त्यांना नोटीस काढा आणि आमचं नुकसान भरून द्या आज त्यांनी तक्रारी अर्ज सुद्धा सोसायटीमध्ये दिलेला आहे याबाबतीत सोसायटी काय करू शकते किंवा सोसायटीला कोणते अधिकार कायद्यानुसार प्राप्त आहेत. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
श्री. अविनाश बवरे, चेअरमन कासा ब्लांका को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, पुणे.
आपल्या सारखे प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये येत असतात. तरी याबद्दलची कायदेशीर माहिती थोडक्यात बघू या.
खर्चाला सोसायटी कधी जबाबदार ?
सोसायटीच्या दुरुस्त उपविधी १५९ प्रमाणे सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामायिक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या याचा खर्च तसेच पावसामुळे गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, हा खर्च सोसायटीने करणे गरजेचे आहे. थोडक्यात अश्या सामायिक जागांमधून होणाऱ्या गळती थांबविण्याचा खर्च करण्याची जबाबदारी सोसायटीवर आहे
खर्चाला फ्लॅटधारक कधी जबाबदार ?
उपविधी ६८ (ब) आणि १५९ (ब ) मध्ये स्पष्टपणे हे नमूद केले आहे कि अनुक्रमे उपनियम ६८ आणि १५९ (अ ) मध्ये ज्या दुरुस्त्यांचा अंतर्भाव नाही, अश्या दुरुस्त्या सदस्यांनीच स्वखर्चाने केल्या पाहिजेत आणि पुढे विशेष करून असे नमूद केले आहे कि "शौचालय /सिंकमुळे होणारी अंतर्गत गळती संबंधित सदनिकाधारकणारे स्वखर्चाने थांबविली पाहिजे आणि त्याबद्दलची माहिती त्याने संस्थेला दिली पाहिजे पाहिजे.
त्यामुळे आपल्या प्रश्नाप्रमाणे पाणीगळती अंतर्गत असल्याने त्याच्या खर्चाची जबाबदारी हि सोसायटीवर नसून ती जबाबदारी सदरील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटधाकराची आहे आणि त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग संबंधित त्रस्त सभासदाला आहे.
दुरुस्ती करण्यासाठी प्रक्रिया :
खर्च कोणी करायचा हे आपण बघितले. पण एखाद्या सभासदाने अश्या स्वरूपाची तक्रार सोसायटीकडे केल्यावर उपविधी ४७ प्रमाणे संबंधित सभासदाला सोसायटी नोटीस देऊन त्याच्या खर्चाने सदरील दुरुस्ती करण्यास सांगू शकते अन्यथा स्वतः दुरुस्ती करून घेऊन घेऊन त्याचा खर्च संबंधित सभासदाकडून वसुल करता येतो. याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुरुस्तीचा खर्च सोसायटीने करायचा असो व सभासदाने स्वखर्चाने , दोन्ही प्रकारात सभासद दुरुस्तीसाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांना अथवा त्यांचे मार्फत नेमलेल्या आर्किटेक्ट / कामगार ह्यांना फ्लॅटमध्ये प्रवेश नाकारू शकत नाही. मात्र सभासदाच्या वैयत्तिक मालमत्तेची नुकसानभरपाई भरून देण्याची जबाबदारी सोसायटीवर नसून त्यासाठी संबंधित सभासदाने कोर्टात दाद मागावी. तसेच सोसायटीकडून कारवाईसाठी वेळ लागतोय असे वाटल्यास त्रस्त सभासदाला स्वतः देखील दुरुस्ती करून घेण्यासाठी कोर्टात दावा दाखल करता येईल.
तसेच ज्याच्यामुळे पाणी गळती झाली आहे अश्या सभासदाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ अन्वये कलम १८३-१८४ अन्वये महानगरपालिकेकडे त्रस्त सभासदाला तक्रार दाखल करता येईल आणि महानगरपालिकेतर्फे तपासणी होऊन जर अशी गळती आढळून आली तर संबंधित सभासदाविरुद्ध कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो.
अर्थात असे वाद सामंजस्याने सोडविल्यास ते सुटू शकतात आणि कोर्टात खर्च होणारा वेळ आणि पैसा वाचू शकतो. असो. तसेच भविष्यात अश्या प्रकारे पाणी वाया जाऊ नये म्हणून बाहेरून देखील प्रत्येक फ्लॅटचा पाणीपुरवठा बंद करता येतो अशी सिस्टीम बसवता येते किंवा कसे याचीही उपाययोजना करावी.
ऍड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment