"सासू-सासरे" कुटुंबाच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे त्यांना ना-वापर शुल्क द्यावे लागेल. - ऍड. रोहित एरंडे

 आमच्या बिल्डिंगचे रिडेव्हलपमेन्ट चालू असल्याने  मी  आणि माझे यजमान आमच्या जावयांच्या फ्लॅट मध्ये रितसर भाडे करार करून राहत आहोत. मुलगी आणि जावई कामानिमीत्त परगावी असतात. परंतु जावयाचा फ्लॅट असून सुध्दा सोसायटी आमच्याकडून ना वापर शुल्क   (नॉन ऑक्युपेशन चार्जेस) मागत आहे, तसे सोसायटी आकारू शकते काय?

- एक वाचक, पुणे .


प्रत्येक सभासदाला मेंटेनन्स हा द्यावाच लागतो, पण  "ना-वापर" शुल्क हे   द्यायचे कि नाही हे  जागेचा वापर कोणती व्यक्ती  करते यावर  अवलंबून आहे', ह्या सोप्या सूत्रात आपल्या प्रश्नाचे उत्तर  देता येईल. 

ना-वापर शुल्क कधी आणि किती  घेता येते ?


एखाद्या  सभासदाने  स्वतः जागा न वापरता त्याने ती जागा  तिऱ्हाईत व्यक्तीस  भाड्याने दिली असेल, तर अश्या सभासदास   Non Occupancy Charges म्हणजेच ना-वापर शुल्क द्यावे लागते. पण  नुसती जागा कुलूप बंद ठेवली असेल तर त्या सभासदाकडून ना वापर शुल्क घेता येणार नाही, पण सभासदाला मेंटेनन्स मात्र द्यावाच लागेल.  महाराष्ट्र सरकारने सहकार कायद्याच्या कलम ७९-अ अन्वये ०१/०८/२००१ रोजी अध्यादेश काढून ना-वापर शुल्क हे देखभाल खर्चाच्या (maintenance charges) जास्तीत जास्त १० टक्केच आकारता  येईल असे स्पष्ट केले आणि जनरल बॉडीकडे कितीही बहुमत असले तरीही ह्यात वाढ करता येत नाही हेहि लक्षात घ्यावे. 

  हा अध्यादेश  घटनात्मक दृष्ट्या  वैध असल्याचा आणि सभासदाने त्याचे घर भाड्याने दिल्यास सोसायटीचे काहीच नुकसान होत नाही आणि स्वतःचे घर भाड्याने देऊन  उत्पन्न घेण्याचा अधिकार घरमालकाला आहे हा सरकारचा युक्तिवाद मान्य करून  मा. मुंबई उच्च न्यायालायच्या २ सदस्यीय खंडपीठाने सोसायटीविरुद्ध निकाल  माँब्ला सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार - २००७ (४) Mh .L .J ५९५ या याचिकेच्या निमित्ताने दिला आहे . 


ना-वापर शुल्काचे अपवाद :


काही वेळा सभासदाने स्वतः जागा न वापरता दुसऱ्याला जागा वापरायला दिली असेल तरीही  ना-वापर शुल्क  घेता येत नाही. सभासदाचे कौटुंबिक सदस्य, विवाहित मुलगी, नातवंडे हे जागा वापरत असतील तर ना-वापर शुल्क आकारता  येत नाही. मात्र सरकारने सून, जावई, मेव्हणा-मेव्हणी यांचा हि समावेश कौटुंबिक सभासदाच्या व्याख्येत केला होता, तो उच्च न्यायालयाने मान्य केला नाही. मात्र नवीन बाय लॉज मध्ये कुटुंबाच्या  व्याख्येमध्ये सून, जावई, मेहुणा (बायकोचा भाऊ) -मेहुणी (पत्नीची बहीण) यांचाही समावेश केलेला दिसून येतो. मात्र सभासदाच्या सासू-सासऱ्यांचा  समावेश "कुटुंबाच्या" व्याख्येत केलेला दिसून येत नाही त्यामुळे   जरी फ्लॅट जावयाचा असला तरी तुम्हाला किंबहुना सभासदाला प्रचलित कायद्याने सध्या तरी ना- वापर शुल्क देणे क्रमप्राप्त आहे. पण जेथे मेहुणा-मेहुणी यांचा समावेश कुटुंबाच्या  व्याख्येमध्ये केला आहे तिथे सासू-सासरे  यांचा समावेश का केलेला  नाही हे कळून येत नाही. हाच फ्लॅट जर समजा तुमच्या मुलीच्या नावावरही  असता, तर तुम्ही  तर तुम्ही आई-वडील या नात्याने कुटुंबाच्या व्याख्येत बसून तुम्हाला अशी सवलत मिळाली असती. तसा हा काही फार मोठा विषय नाही. पण  तरी एकदा तुमच्या मुलीचेही नाव करारनाम्यामध्ये आहे का हे तपासून बघा. असो. या निमित्ताने  हेही सांगावेसे  कि अपार्टमेंट कायद्यात कुठेही ना-वापर शुल्काची तरतूद केलेली आढळून येत  नाही. 


ऍड.  रोहित एरंडे 


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©