मुलांचे खेळ आणि नियमावली : ऍड. रोहित एरंडे ©,

 मुलांचे खेळ आणि नियमावली .. 


सर आमच्या सोसायटीत एक  common garden व children play area आहे. तिथे लहान मुलांसाठी घसरगुंडी व झोपाळा आहे. काही झाडे पण तेथे लावली आहेत. सोसायटीत क्रिकेट व फुटबाॅल खेळण्यास बंदी आहे. तरी काही 7 वी 8 वीतील मुले त्याच्या बाजुला असलेल्या drive away किंवा इमारत व  garden च्या मधे फुटबाॅल खेळतात. मध्यंतरी  त्यावरुन वादावादी झाली कारण एका लहान मुलाला बाॅल लागला असता. त्यावर काही सभासदांचे म्हणणे आहे की मधल्या गार्डनच्या जागी झाडे कापुन नेट लावुन तो Area cover करुन मुलांना खेळायला जागा करायची. असे कायद्याने सोसायटी करु शकते का? कारण काही सभासदांचा ह्याला विरोध आहे. 


एक वाचक, पुणे : 



आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने  आदर्श उपविधी १६८ याचा उल्लेख करणे गरजेचे आहे आणि तो सर्वांच्या माहितीकरिता खाली उद्धृत केला आहे. या नियमावर कधी लिहायला लागेल असे वाटले नव्हते. असो. 


१६८ - संस्थेच्या आवारात खेळ खेळण्यावर निर्बंध : संस्थेची इमारत  / इमारती यांचे स्थान  लक्षात घेऊन तसेच इमारतीचा परिसर आणि संस्थेच्या सदस्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना खेळण्यासाठी उपलब्ध असलेली मोकळी जागा लक्षात घेऊन संस्थेची सर्वसाधारण सभा निश्चित करेल अशा वेळी असे खेळ खेळण्यासाठी  परवानगी देईल आणि ते सर्वसाधारण सभा निश्चित करेल अश्या निर्बंधांच्या, आकारणीच्या आणि दंडाच्या अधीन असतील.  


आता 'चेंडू' सर्वसाधारण सभेच्या कोर्टात : 

वरील  नियमाप्रमाणे खेळ खेळता येतील, पण नियमाच्या चौकटीमध्ये. त्यामुळे आता फुटबॉलचा चेंडू तुमच्या सोसायटीच्या सर्वसाधारण  सभा म्हणजेच जनरल बॉडीच्या कोर्टात आला  आहे आणि यासाठी  एक विशेष सभा  बोलवून त्यामध्ये  हे सर्व प्रश्न ठेवून मुलांचे खेळ,  खेळण्याची जागा याची  नियमावली  करून घेणे गरजेचे आहे.   आता प्रश्न आहे झाडे तोडण्याचा तर आदर्श उपविधी १६१ अन्वये सोसायटीमधील झाडे तोडण्यास सभासदांना मनाई करण्यात आली असून झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी "महाराष्ट्र शहरी विभाग वृक्ष  संवर्धन कायदा १९७५" या कायद्याखाली स्थापन करण्यात आलेल्या वृक्ष प्राधिकरणाकडे अलाहिदा अर्ज करावा लागतो आणि  विनापरवानगी झाडे तोडल्यास आता नवीन कायदा दुरुस्तीप्रमाणे ५०,०००/- इतका दंड केला आहे (अपवाद चंदन चोर !). 

त्यामुळे तुमच्या सोसायटीमध्ये आता ज्यांची मुले खेळण्याच्या वयातील नाहीत आणि ज्यांची मुले आहेत असे गट असणारच. On  a  lighter  note , 'चिंटू' या लोकप्रिय कार्टून मधील "काकूंसारखे" मुलांचे चेंडू जप्त करणारे सभासद सगळीकडे असणारच. तरी, 'तुटे वाद, संवाद तो हितकारी' या समर्थ उक्ती प्रमाणे सर्व सभासदांचे नीट म्हणणे ऐकून आणि  चर्चा करून, सभासदांची सुरक्षितता  आणि मुलांचा खेळायचा हक्क याची सांगड घालून मार्ग नक्कीच काढता येईल. यामध्ये उंच नेट लावणे, येण्याजाण्याच्या रस्त्यात न खेळणे असे उपाय योजता येतील.   तसेच सर्वात महत्वाचे या  मुलांना मतदानाचा अधिकार नसला तरी नियमावली करताना त्यांचे   मत  विचारात घेणे गरजेचे आहे असे वाटते. हे सर्व  सांगण्याचे तात्पर्य हेच कि मुलांचे खेळ हा कोर्टाचा विषय होऊ नये. 

  

 या प्रश्नाच्यानिमित्ताने  काही गोष्टींचा उल्लेख करणे गरजेचे आहे असे वाटते.  मुले आणि खेळ हा सध्याच्या मोबाईलच्या जगात खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता जे ४० वर्षे किंवा त्याच्या पुढच्या वयाचे असतील त्यांना आठवत असेल कि ता जरी मुलांच्या खेळाचा त्यांना त्रास झाला तरी  त्यांच्या बालपणी खेळायला जागा शोधणे हा प्रश्नच कुणाला आला नसेल. कारण पूर्वी वाडा  -चाळींमध्ये मोकळी जागा भरपूर असायची आणि आत्ताच्या तुलनेत मोकळी मैदाने देखील खूप होती त्यामुळे  मुले देखील मनोसोक्त खेळायची. अपवाद दुपारी १-४  खेळायला बंदी हा अघोषित नियम सर्वत्र होता आणि वाडा मालक -चाळ मालक यांचेयांचे काही विशेष नियम त्या त्या परिस्थितीप्रमाणे असायचे. पण आता कालौघात वाडे, चाळी जाऊन मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, मैदाने कमी झाली आणि आणि इंटरनेट -मोबाईलच्या जमान्यात मुलांचे बाहेर खेळणेहि कमी झाल्याचे तज्ञ मान्य करतात. त्यामुळे तुमच्या सोसायटीमध्ये मुलांना खेळायला मोकळी जागा आहे, हे भाग्याचे लक्षण आहे यात दुमत नसावे. 


ऍड. रोहित एरंडे, ©,

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©