मृत्युपत्राबद्दल थोडक्यात, पण महत्वाचे . ॲड. रोहित एरंडे ©

 मृत्युपत्राबद्दल थोडक्यात, पण महत्वाचे . 

ॲड. रोहित एरंडे © 

" जिवासवे जन्मे मृत्यु जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत " 

गदिमांनी अतिशय सोप्या आणि भावपूर्ण शब्दांत आपल्याला मृत्यु निश्चित असतो, परंतु त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते हे सांगितले आहे.   आपले आयुष्य एवढे  अनिश्चित असताना आपल्या माघारी आपल्या कष्टाने  मिळविलेल्या  मिळकतीचे विभाजन आपल्या वारसांमध्ये सुकर आणि विना तंटा व्हावे म्हणून मृत्यूपत्रासारखा दुसरा सोपा आणि सोयीस्कर दस्त नाही. मात्र या विषयाबाबत आपल्याकडे, भिती , गैरसमज यांचे इथे घट्ट मिश्रण झाले आहे कि या महत्वाच्या विषयावर कितीही वेळा लिहिले तरी ते कमीच आहे असे जाणवते.  या विषयाचा आवाका खूप मोठा आहे, तरी महत्वाच्या मुद्द्यांची   थोडक्यात माहिती घेवू.

मिळकतीमध्ये मालकी हक्क कसा मिळतो ?

या विषयाकडे वळण्यापूर्वी एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा आपल्या  हयातीमध्ये हवा असेल तर  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच दिला -घेतला जाऊ शकतो. तर   एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र  या योगे  मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते.  


मृत्युपत्र करण्यासाठी  पूर्व तयारी. 

मृत्युपत्र /इच्छापत्र /Will  करण्याआधी काही पूर्वतयारी करणे गरजेचे असते. म्हणजेच आपल्या सर्व स्थावर (immovable)  उदा. घर, जमीन इ. आणि जंगम -(movable) म्हणजेच  एफ डी, रोकड, बँक खाते, शेअर्स, दागिने इ. मिळकतीची यादी करण्यास आम्ही सांगतो आणि हे काम वेळ खावू आहे हे अशी यादी करायला घेतल्यावर आपल्या लक्षात येईल. पण अशी यादी केल्याशिवाय आपल्याला अंदाज येत नाही कि आपली नक्की किती मिळकत आहे आणि तिचे वाटप कसे करायचे. हि माहिती आणि त्याच बरोबर कोणाला काय द्यायचे आणि कोणाला का नाही द्यायचे याच्या स्पष्ट सूचना घेऊन तज्ञ वकीलांकडे जाऊन मृत्युपत्र करून घेणे   श्रेयस्कर असते. अनुभवावरून असे सांगू इच्छितो कि दुसऱ्याचे कॉपी करून / इंटरनेट वरून कॉपी करून मृत्युपत्र करू नये. बऱ्याचदा लोकं वकीलांची फी  वाचवायला असा कॉपी -पेस्ट उद्योग करतात आणि नंतर काही प्रश्न उद्भवले कि  पेक्षा कैक पटीने पैसे  कोर्टात खर्च  शकतात मनस्ताप होतो तो वेगळाच !


मृत्युपत्र कोण करू शकते ?

Indian  succession  Act, १९२५ मध्ये मृत्युपत्रासंदर्भात तरतुदी आढळून येतील. भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान व्यक्तीस  आणि ज्याची मानसिक स्थिती सुदृढ आहे अश्या व्यक्तीस स्वतः च्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भात आणि हिंदू वारसा कायदा कलम ३० अन्वये वडिलोपार्जित मालमत्तेमधील आपल्या  अविभक्त हिश्यासंर्भात  मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजेच WILL करता येते. 

मृत्युपत्र कधी करावे ? 

मृत्यु म्हातारपणीच येतो सबब म्हातारपणीच मृत्यूपत्र करावे या "गैरसमजाला " ह्या  कोरोनामुळे आणि सध्याच्या जीवन शैलीमुळे  धक्का बसला आहे. वेळ काही सांगून येत नाही. त्यामुळे मृत्युपत्र करण्याचा योग्य दिवस "आजच" असे आम्ही सांगतो. त्याला मुहूर्त बघण्याची  गरज नाही.   सबब आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच मृत्यूपत्र करणे इष्ट आहे. कुठल्या दिवशी मृत्यूपत्र करावे या बद्दल काही  कायद्यात तरतूद नाही. बरेचदा एकदा विशिष्ट दिवस  उदा जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस अश्या  दिवशी मृत्यूपत्र करण्याची उदाहरणे आहेत. 

मृत्युपत्र कसे असावे ?

मृत्युपत्र हे लेखी असणे गरजेचे आहे. लेखी म्हणजे हाताने लिहिलेले असले तरी चालते. अर्थात आताच्या काळात व्यवस्थित टाईप करून घेणे कधीही उत्तम, कारण अक्षर समजले नाही इ. कारणे पुढे निर्माण होणार नाहीत. 

  एका केसमध्ये - आईने मृत्युपत्र करताना  "माझे  सोन्याचे दोन  हार आहेत, त्यातील एक माझ्या   मुलीला आणि एक माझ्या सुनेला देत आहे"  असे लिहिले होते. नंतर वाद झाला कि  घ्यायचा कारण एक २ पदरी होता, तर दुसरा ४ पदरी !.. सबब स्पष्टता असणे गरजेचे. 

 फक्त मुस्लिम धर्मीयांमध्ये मृत्युपत्र तोंडी  असले तरी चालते. मृत्युपत्राची  भाषा ही सोपी आणि सुटसुटीत असावी म्हणजेच त्यातून दोन अर्थ निघू नये. प्रत्येक वारसाला   आपल्याला सुखी आणि तेही सारख्या प्रमाणात करता येत नाही आणि प्रत्येकाला सारख्या किंमतीच्या (value ) गोष्टीहि देता येणार नाहीत  हे मृत्युपत्रामध्ये मिळकतीची वाटणी करताना कायम लक्षात घ्यावे आणि त्यासाठी आपली पार्श्वभूमी, कौटुंबिक शिस्त  लक्षात घ्यावी आणि आपल्या मृत्युपश्चात आपली मुले कशी वागतील हे आपल्या हातात नाही आणि सबब त्याचा ताण घेऊ नका.. .  मृत्युपत्र हे तुमचे होम-ग्राउंड आहे असे  लक्षात घ्या आणि सबब  तुमच्या जन्मापासून ते मृत्युपत्र  करेपर्यंतच्या चांगल्या वाईट महत्वाच्या गोष्टी लिहून ,   तुम्ही एखाद्या व्यक्तीला का देताय आणि एखाद्याला का देत नाही आहेत , हे लिहून ठेवता येते, कारण जेव्हा मृत्युपत्र वाचतील  नसाल  ! 

साक्षीदार :

मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. मात्र २ साक्षीदारांनी एकाचवेळी सही केली पाहिजे असे काही नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हे माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही हे कायम लक्षात ठेवावे.  शक्यतो साक्षीदार हे आपल्यापेक्षा कमी वयाचे असल्यास अधिक उत्तम, असा प्रॅक्टिकल सल्ला  इच्छितो.. . 


डॉक्टर सर्टिफिकेट :

मृत्यूपत्र  करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अश्या आशयाचे *डॉक्टर चे सर्टिफिकेट* असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण डॉक्टर सर्टिफिकेट असणे हा आता अलिखित नियम झाला आहे आणि जेणेकरून पुढे आरोप होत नाहीत. सबब प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे केव्हाही चांगले. त्याचप्रमाणे कुठल्याही नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टरचे (Registered  Medical  Practitioner ) चे सर्टिफिकेट चालते, ते ऍलोपॅथी डॉक्टरचेच असले पाहिजे अशी कुठलीही तरतूद 


नोंदणी आणि स्टँम्प ड्युटी :

मृत्यूपत्रास, खरेदी खत, बक्षीस पत्र या दस्तांसारखी कोणतीही  भरमसाठ स्टॅम्प ड्युटी  लागत नाही, मृत्युपत्राची नोंदणी करणेही  कायद्याने बंधनकारक नाही. त्यामुळे  इतर  दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र तुलनेने  कमी खर्चाचा दस्त आहे.  मात्र नोंदणी कायदा, १९०८ मध्ये मृत्यूपत्राबद्दल काही विशेष तरतुदी आहेत. उदा. इतर कुठलेही दस्त हे अंमलात (execute )आणल्यानंतर ४ महिन्यानंतर नोंदवावे लागतात मात्र मृत्यपत्र हे, ते केल्यानंतर कधीही नोंदवता येते. त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ते नोंदवता येते. परंतु आजवरच्या अनुभवावरून असे मुद्दाम नमूद करू इच्छितो कि मृत्युपत्राची नोंदणी केल्यास लाभार्थ्यांना  त्याची अंमलबजावणी करणे सोयीचे जाते आणि सरकारी विभागात /बँका  इ. ठिकाणी अडवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होते. 


मृत्युपत्र कितीही वेळा बदलता येते :

एकदा सोडलेला बाण जसा परत घेता येत नाही तसे खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र इ. दस्त एकदा लिहुन  नोंदणीकृत झाले, कि ते बदलता येत नाहीत.  पण मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्यूपत्र  ग्राह्य धरले जाते. उदा. पहिले मृत्युपत्र नोंदणीकृत असेल आणि दुसरे नोटरी केलेले, तर दुसरे मृत्युपत्रच ग्राह्य धरले जाईल आणि पहिले मृत्यूपत्र आपोआप रद्द होईल. त्याचप्रमाणे मृत्युपत्र करणाऱ्याला मृत्यूपत्र त्याच्या हयातीमध्ये कधीही रद्द करता येते.  बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूपत्रामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे असते. परिस्थितीमध्ये बदल झाल्यास संपूर्ण मृत्यूपत्र  न बदलता पुरवणी-मृत्यूपत्र (codicil ) देखील करता येते आणि त्यास मृत्यूपत्राच्याच सर्व कायदेशीर तरतुदी लागू होतात. 


In terrorem Clause  - Forfeiture Clause -  मृत्युपत्राला आव्हान दिल्यास !

हि एक महत्वाची तरतूद मृत्युपत्रामध्ये करता येते. "जर का लाभार्थ्यांपैकी कोणीही मृत्युपत्राला आव्हान दिले तर आव्हान दिलेल्या लाभार्थ्यास मृत्युपत्रात दिलेली मिळकत मिळणार नाही किंवा अगदी शुल्लक काहीतरी मिळेल"  या आशयाची हि तरतूद आहे. काही केसेसमध्ये मृत्युपत्र करणाऱ्याला जर शंका असेल कि कोणीतरी लाभार्थी भविष्यात मृत्युपत्राला आव्हान देऊ शकतो तेव्हा याचा उपयोग करता येईल. 

महत्वाचे म्हणजे कोणाला   काही द्यायचे  नसेल ,तर  स्पष्टपणे मृत्यूपत्रात लिहून ठेवता येते आणि तसे लिहिणे उत्तम.. 


मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाला तर ?

  मृत्युपत्रासंबंधीच्या   तरतुदी किती सविस्तरपणे केल्या आहे हे भारतीय वारसा कायदा १९२५ पाहिल्यावर लक्षात येईल.  कलम -१०९ प्रमाणे जर का मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याची मिळकत लाभार्थी म्हणून त्याच्या मुला -मुलींना (child ) किंवा रेषीय वंशज (lineal descendant ) म्हणजेच नातू, पणतू इ. यांना दिली असेल आणि जर का मृत्यूपत्र करणाऱ्याच्या हयातीमध्येच अश्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर अशी मिळकत हि त्या मयत व्यक्तीच्या रेषीय वंशजांना मिळेल. इथे पुढे असे नमूद केले आहे कि  अन्य विरुध्द तरतूद केलेली नसेल, तर अशी लाभार्थी व्यक्ती ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या नंतरच मयत झाली असे गृहीत धरले जाईल.  सबब आपल्या मृत्युपश्चात मिळकतीचे विभाजन करताना समजा लाभार्थीच आधी मयत झाला तर अशी मिळकत कोणाला जाईल हेही लिहून ठेवणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून असे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि म्हणूनच तज्ञ व्यक्तींमधून मृत्युपत्र करून घेणे कायमच श्रेयस्कर राहते.

संयुक्त मृत्युपत्र :

Joint Will / Mutual Will   असा कायद्यामध्ये कुठेही उल्लेख नसला तरी सर्वोच्च न्यायालयाने Krishna Kumar Birla Vs. Rajendra Singh Lodha (2008) 4 SCC 300 या केसमध्ये त्याचा उहापोह केला आहे. आपल्याकडे नवरा -बायको एकत्रपणे मृत्युपत्र करत आणि जो राहील त्याला मिळकत मिळेल असे लिहिलेले असते. त्याचबरोबर समजा दोघांचाही एकदम मृत्यू झाला तर कोणाला मिळकत जाईल याचाही उल्लेख करणे गरजेचे असते. अनुभवावरून स्वतंत्र मृत्युपत्र करणे अधिक चांगले असे माझे वैयत्तिक मत आहे. 

मृत्यूपत्र कुठे ठेवावे ?

हा एक प्रमुख प्रश्न लोकांना असतो. मृत्यूपत्र करून झाल्यावर ते एका पाकिटामध्ये ठेवून ते पाकीट सील करून ठेवावे आणि असे पाकीट  सुरक्षित जागी उदा. बँक लॉकर , तिजोरी अश्या ठिकाणी ठेवावे किंवा ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याकडे, व्यवस्थापकाकडे  ठेवावे आणि कोणाकडे ठेवले आहे त्याची पोच घेऊन ठेवावी आणि अन्य विश्वासातील व्यक्तींना देखील याची माहिती करून द्यावी. लॉकर  मध्ये  ठेवले असेल तर लॉकर तुमच्या एकट्याच्या नावावर नाही ना याची खात्री करा नाहीतर वारसांना  लॉकर उघडण्यासाठी आधी वारसाहक्क प्रमाणपत्र आणावे लागेल ! 

मृत्युपत्राची अंमलबजावणी :

मृत्युपत्र करणारा बोलायचा थांबला कि त्याचे मृत्युपत्र बोलायला लागते असे म्हणतात. म्हणजेच मृत्युपत्र करणाऱ्याच्या (testator ) मृत्युनंतर मृत्यूपत्र अंमलात येते, त्याच्या हयातीमध्ये मात्र तो एक कागद एवढेच त्याचे महत्व असे म्हणता येईल. सबब मृत्यूपत्रात काहीही लिहिले असले तरी समजा मृत्युपत्र करणाऱ्याला त्याच्या हयातीमध्ये त्याच्या मिळकतीचा पूर्ण उपभोग घेण्याचा /विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार आहे. 

परदेशातील मिळकतीसंर्भात सुध्दा मृत्युपत्र येथे करता येईल, मात्र त्याची अंमलबजावणी त्या त्या देशातील कायद्याने होईल. तसेच इथल्या मिळकतीसंदर्भात परदेशात मृत्यूपत्र केले असेल तर त्याची अंमलबजावणीकरिता Indian  succession  Act मध्ये विशेष तरतुदी आहेत, 

व्यवस्थापक / Executors

मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीकरता एक किंवा अधिक व्यवस्थापक म्हणजेच executors नेमता येतात. मात्र असे करणे कायद्याने बंधनकारक नाही. लाभार्थी सुध्दा व्यवस्थापक  होऊ शकतो. 

प्रोबेट :

कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट  देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे आणि एकदा का प्रोबेट मिळाले की ते सर्वांवर  बंधनकारक असते. यासाठी २ साक्षीदारांपैकी कोणीही एका साक्षीदाराला कोर्टात तपासणे गरजेचे असते. समजा साक्षीदार मयत असतील तर साक्षीदारांचे हस्ताक्षर /सही ओळखणाऱ्या व्यक्तींना तपासणे  गरजेचे असते. मात्र मृत्युपत्राचे प्रोबेट घेणे हे फक्त मुंबई, चेन्नई  आणि कोलकोता ह्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्येच गरजेचे आहे. इतर ठिकाणी उदा. पुणे इ. शहरांमध्ये  त्याची  सक्ती करता येत  नाही "पुण्यात मृत्यूपत्र केले असल्यास आणि मिळकत देखील पुण्यात असल्यास प्रोबेटची गरज नाही" असे मुंबई उच्च  न्यायालायने  श्री. भगवानजी राठोड विरुद्ध सुरजमल मेहता ( AIR 2003 BOM387 = 2003(5) BOMCR 228 = 2004(1)MHLJ 62 ) ह्या निकालात नमूद केले आहे.  व्यवस्थापक म्हणजेच executors नेमला नसल्यास किंवा तो काम करण्यास असमर्थ असल्यास  कोर्टामधून "लेटर्स  ऑफ ऍडमिन्सट्रेशन " मिळवता येते. 

नॉमिनेशन मुळे मालकी  हक्क मिळत नाही. सबब मृत्युपत्र हे नॉमिनेशन किंवा वारसा कायदा ह्यांच्यापेक्षा वरचढ  असते. त्यामुळे समजा 'अ' व्यक्तीला फ्लॅटचा नॉमिनी म्हणून नेमले असेल पण मृत्यूपत्रामध्ये फ्लॅट  'ब' व्यक्तीला दिला असेल तर तो फ्लॅट 'ब' व्यक्तीलाच मालकी हक्काने मिळेल. 

आता ज्या गोष्टी  आपल्या मृत्यूशी संबंधित आहेत पण ज्यांचा समावेश  पारंपरिक मृत्यूपत्रात करता येत नाही त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. 


लिव्हिंग विल :

लिव्हिंग विल म्हणजेच ज्याला वैद्यकीय भाषेत "advanced  directives" म्हणतात . "Right  to  life  includes  right  to  die  with  dignity" असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.   त्या संदर्भात मागील वर्षी मा. सर्वोच्च न्यायालयाने सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आणि हा एक स्वतंत्र विषय आहे . पण अगदी थोडक्यात . अर्थात बोलायचे तर  याचा अर्थ डॉक्टर आपल्याला काहीतरी गोळी किंवा इंजेक्शन देऊन मृत्युसुखकारक करतील असे नाही, तर जेव्हा आपण अगदी मरणासन्न अवस्थेत पोहचू आणि आजार हा उपचारांपलीकडे  गेला असेल तर अश्या हॉस्पिटल मध्ये खितपत पडण्यापेक्षा  योग्य वेळी वैद्यकीय उपचार थांबविण्याची इच्छा हि "लिव्हिंग विल"  मध्ये आधीच लिहून ठेवता येते, जेणेकरून आपल्या जावबलच्या नातेवाईकांना होणार आर्थिक, शारिरीकी आणि मानसिक त्रास कमी होईल.  अर्थात लिव्हिंग विल हे स्वतंत्र पणे  करावे लागते  आणि ते सुध्दा आता २ साक्षीदारांसमक्ष नोटरी करून ठेवता येते आणि त्याची प्रत एकाद्या जवळच्या नातेवाईकाकडे /गार्डियन व्यक्तीकडे आणि फॅमिली फिजिशयन कडे देऊन ठेवावी. मात्र पुढे याची अमंलबजावणी करण्यासाठी डॉक्टरांची  मोठी भूमिका   राहण्याची आहे. असो. 


देहदान -नेत्रदान : 


 देहदान, नेत्रदान करण्याची इच्छा असल्यास  हॉस्पिटल मध्ये  वेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात त्याचा उपयोग करावा, तसेच मृत्यूपश्चात अंत्यसंस्कार करायचे कि  नाही हे मृत्युपत्रात लिहून उपयोगाचे नाही कारण माणसू गेल्यावर मृत्यूपत्र शोधण्याची ती वेळ नसते. त्यामुळे  या सर्व  गोष्टींची पूर्व कल्पना आपल्या हयातीतच प्रत्येकाने जवळच्यांना द्यावी

आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्वकष्टार्जित मिळकतींसंदर्भात आपल्या वारसांमध्ये  वाद होऊ नयेत म्हणून आपल्या हयातीतीच मृत्यूपत्र करणे श्रेयस्कर असते. मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेला सगळ्यांनी मान द्यावा असे कायद्याला अभिप्रेत आहे.  मात्र यासाठी इंटरनेटवरील अर्धवट माहितीच्या हळकुंडाने पिवळे होण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या मृत्युपत्राची नक्कल करण्यापेक्षा ह्या कामी जाणकार वकीलांचा सल्ला घेणे कधीही इष्टच. 

ॲड. रोहित एरंडे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©