"(सोसायट्यांमधील )अतिरेकी प्राणीप्रेमाला चाप " :- ऍड. रोहित एरंडे. पुणे. ©

 "(सोसायट्यांमधील )अतिरेकी प्राणीप्रेमाला चाप "

ऍड. रोहित एरंडे
पुणे  ©

मा. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका निकालात "आपल्या वागणुकीमुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये ह्या नागरिक शास्त्रातील अतिशय मूलभूत परंतु महत्वाच्या शिकवणुकीवर शिक्का मोर्तब केले आहे.
पूर्वीची चाळ -वाडा संस्कृती संपून आता बरीच वर्ष झाली आहेत आणि बहुतांश जनता आता फ्लॅट मध्ये राहते. त्यामुळे प्राप्त झालेल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांचे पालन करण्याची जबाबदारी फ्लॅट संस्कृतीमध्येही आपोआपच येते हेच ह्या निकालाने अधोरेखित झाले आहे. कुत्रा -मांजर ह्यांसारखे प्राणि पाळणे ही गोष्ट काही नवीन नाही. परंतु आपले प्राणी प्रेम हे अन्य लोकांसाठी इतके त्रासदायक ठरू नये कि त्यामुळे इतरांना आपल्याविरुद्ध कोर्टात दाद मागावी लागावी आणि नेमके हेच ह्या निकालामध्ये आपल्याला दिसून येईल.(जिग्नेश ठाकोर विरुद्ध दिलीप शहा , २०१६(६) महा. law जर्नल , पान क्र. ३७४, मा. न्या. आर. एम . सावंत ).
 फक्त ह्या केस मध्ये पक्ष्यांना दाणा -पाणी घालण्याच्या सवयीमुळे इतरांना होणारा त्रास थांबवता येऊ शकतो का असा प्रश्न उच्च न्यायालयापुढे उपस्तिथ झाला आणि अर्थातच ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर न्यायालायने का दिले हे आपण पुढेबघू. मुंबई येथील एका सोसायटी मध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय जोडप्याने हा दावा २०११ साली दाखल केला.ह्यातील वादी क्र. १ चे वडील तर ९६ वर्षांचे होते. वादींचे थोडक्यात म्हणणे असे होते की वादींच्या वर राहत असलेल्या प्रतिवादींनी त्यांच्या बाल्कनीमध्ये पक्ष्यांना दाणा -पाणी देण्यासाठी गैरकायदा लोखंडी ट्रे वजा प्लॅटफॉर्म उभा केला आहे आणि त्यांचे हे पक्षी प्रेम सकाळी ६. ३० वाजल्यापासूनच सुरु होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात कबुतरांसारखे अनेक पक्षी तिथे जमा होतात आणि पर्यायाने पक्ष्यांची विष्टा, पिसे, अन्न कण ई. गोष्टी वादींच्या बाल्कनीमध्ये पडतात. फक्त वादींनाच नवे, तर अजूनही इतर रहिवाश्यांना देखील ह्याचा त्रास होतो आणि ह्या संबंधि त्यांनी अनेक वेळा प्रतिवादींना लेखी कळवून सामपोचारांनी प्रश्न सोडवण्याची विनंतीही केली होती. त्याच प्रमाणे सोसायटीने देखील लेखी पत्राने प्रतिवादींना हा प्रकार थांबण्याची विनंती केली होती. वादींचे असेही म्हणणे होते की अश्या घाणीमुळे वादींच्या आरोग्यास देखील धोका उत्पन्न झाला आहे आणि ह्या त्रासाला कंटाळून वादीने रुपये खर्च करून बाल्कनीमध्ये दुरुस्ती देखील करून घ्यावी लागली आणि त्यामुळे नाईलाजाने वादींनी दिवाणी कोर्टात दावा दाखल करून प्रतिवादींनी पक्ष्यांना दाणा -पाणी देऊ नये आणि वादींना त्रास होईल असे वर्तन करु नये ह्या करीता दावा दाखल केला.

 प्रतिवादींनी त्यांच्या बचाव सादर करताना हे मान्य केले कि गेले १० वर्षांपासून ते पक्ष्यांना खायला-प्यायला घालतात आणि त्याच बरोबर रोज सकाळी ९ वाजता आणि दुपारी १ वाजता कावळ्यांना सुद्धा खिडकीमधून फरसाण खायला घालतात. मात्र त्यांच्या ह्या कृत्त्यामुळे कोणालाही त्रास होत नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मात्र कनिष्ट कोर्टाने वादींचा तूर्तातूर्त मनाईचा अर्ज मान्य करताना प्रतिवादींच्या कृत्यानमुळे वादींना त्रास होत असल्याचे मान्य करून प्रतिवादींना पक्ष्यांना खायला-प्यायला घालण्यास मनाई केली आणि म्हणून प्रतिवादींनी त्या विरुद्ध उच्च न्यायालयात सदरचे अपील दाखल केले. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि , फोटोग्राफ्स ,लेखी पुराव्यांचा विचार करून उच्च न्यायालयाने कनिष्ट कोर्टाचा निर्णय मान्य केला. मात्र प्रतिवादींनी कनिष्ट न्यायालयात "दिवाणी कोर्टाला" सदरचा दावा चालवायचा अधिकार नसून तो फक्त सहकार कोर्टालाच आहे असा प्राथमिक मुद्दा उपस्तिथ केला होता , पण कनिष्ट न्यालयाने तो फेटाळून लावताना असे नमूद केले होते की वादी त्यांच्या "नागरी "हक्कांसाठी लढत आहे आणि म्हणून दिवाणी कोर्टालाच अधिकार आहे. मात्र त्या विरुद्धही प्रतिवादींनी रिट अर्ज दाखल केला आहे आणि त्या रिट अर्जाचा निकाल जर प्रतिवादींच्या बाजूनी लागला तर आपोआपच मनाई हुकूम रद्द होईल असेही उच्च न्यायालयाने शेवटी नमूद केले आहे.
हा प्रश्न अगदी मूलभूत आहे , पण असे असले तरी कोर्टाच्या निकालाचे महत्व कमी होत नाही. उच्च न्यालयानी पुढे नमूद केले कि फक्त वादीनीच नवे तर सोसायटी ने देखील अनेक वेळा प्रतिवादींना लेखी पत्र लिहून त्यांचे वर्तन चुकीचे असल्याचे निदर्शनास आणले होते. या उलट प्रतिवादींनी पात्र पाठवून ह्या गोष्टीचा इशू ना करता शेजार धर्म पळून थोडा त्रास सहन करावा असे उत्तर दिले होते. ह्यावरूनच पक्ष्यांची घाण खाली लोकांच्या अंगावर पडून त्यांना त्रास होतो हि गोष्ट सिद्ध होत असल्याचे उच्च न्यालयानी नमूद केले. प्रतिवादींनीं असेही नमूद केले होते की वादिचा दावाच मुदत बाह्य आहे कारण ते गेली १० वर्ष पक्ष्यांना खायला-पयायला घालतात. मात्र कोर्टानी हा बचाव फेटाळताना नमूद केले कि पक्ष्यांना खायला-प्यायला घालण्याचा प्रकार १० वर्षे रोज चालू आहे सबब प्रत्येक दिवशीच दावा दाखल करायला कारण घडत आहे .
 एका प्राणीमित्र एनजिओशी वादींचा आर्थिक व्यवसाय आहे आणि त्या मध्ये प्रतिवादींचा अडथळा होत असल्यामुळेच वादींनी हा खोटा दावा दाखल केला आहे, हा बचाव देखील कुठलाही पुरावा नसल्याने उच्च न्यायालायने फेटाळून लावला.
उच्च न्यायालायने पंजाब उच्च न्यायालयाच्या दर्शन राम वि. नजर राम ह्या निकालाचाही आधार घेतला ज्यामध्ये असे धरण्यात आले होते की "कोणीही आपल्या जागेचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होईल अश्या पद्धतीने करू शकत नाही".

थोडक्यात प्राणी पाळण्यास कायदयाने बंदी नाही पण आपल्या प्राणिप्रेमामुळे जर इतरांना मर्यादेबाहेर आणि प्रचंड त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला प्राणी प्रेम बाजूला ठेवावे लागेल, असेच ह्या निकालाचे सार आहे.
अर्थात, सर्व लोकांना एकाच तराजूने तोलणे चुकीचे ठरेल. खूपसे   लोक सर्व दक्षता घेवून कुत्रे पाळतात, दुसऱ्यांना त्रास होणार नाही ह्या साठी पूर्ण काळजी घेतात. त्यांना अश्या निकालाचा काही त्रास होणार नाही.
शेवटी,ह्या निमित्ताने आठवण झाली ती रामदास स्वामींनी   मुर्खांची लक्षणे सांगताना  लक्षणे ' मर्यादेविण पाळी सुणे, तो एक मूर्ख ' असे म्हणले आहे ह्याची. 
' सुणे ' म्हणजे श्वान. 

हया वरून सगळ्यांनी योग्य तो बोध घ्यावा.

ऍड. रोहित एरंडे.
पुणे. ©

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©