चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यास सर्वोच्च संरक्षण .. पण ...

अभिव्यक्ती स्वातंत्र्यास सर्वोच्च संरक्षण .. 

"पद्मावती", "दशक्रिया", "न्यूड", "सेक्सी दुर्गा" या चित्रपटांवरून सध्या सर्व प्रकारच्या मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध धार्मिक, सामाजिक भावना ह्यावर  रणकंदन माजलेले आहे. ह्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी दिलेला निकाल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणारा आणि महत्वपूर्ण आहे. 
नचिकेत वाल्हेकर नामक याचिकाकर्त्याने अरविंद केजीरवाल यांच्या जीवनावर देशभर  प्रदर्शित होत असणाऱ्या  "an  इनसिग्निफिकन्ट मॅन " ह्या चित्रपटावर बंदी घालावी ह्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयातच याचिका दाखल केली. 
याचिकाकर्त्याने पूर्वी केजरीवाल, प्रशांत भूषण आणि मनीष सिसोदिया यांच्यावर मा. अण्णा हजारेंची तसेच जनतेची दिशाभूल केली म्हणून शाई फेकायचा प्रयत्न केला होता अशी बातमी व्हायरल झाली होती. 
याचिकाकर्त्यांचे कथन होते कि ह्या चित्रपटात  त्याच्या संदर्भात जी एक व्हिडीओ क्लिप दाखवली आहे, ती पूर्वी मीडिया मध्ये दाखवली गेली होती, मात्र त्या विरुद्ध दिल्ली येथील पतियाळा कोर्टात तक्रार अर्ज दाखल केल्यामुळे त्या  क्लिपचे  प्रदर्शन थांबवले गेले  आणि त्या क्लिपचा याचिकाकर्त्या  विरुद्ध केस मध्ये पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो आणि सबब प्रतिवादी - सेंट्रल बोर्ड ऑफ  फिल्म  सर्टिफिकेशन यांनी त्यास प्रमाणपत्र देण्याचीच गरज नव्हती. ह्या चित्रपटामुळे  त्याच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येत असल्याचेही याचिकार्त्याचे म्हणणे होते. 

मा. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, मा. न्या. अजय खानविलकर आणि मा. न्या. धनंजय चंद्रचूड ह्यांच्या खंडपीठाने सदरील याचिका पूर्णपणे फेटाळून लावताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय याचा उहापोह केला आहे. 

कोर्टाने नमूद केले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य  आणि विचार स्वातंत्र्य हे घटनादत्त अधिकार अतिशय पवित्र (सॅक्रोसाँक्ट ) असून सहजासहजी त्यात ढवळा ढवळ करता येणार नाही. चित्रपट असो वा  नाटक वा एखादे पुस्तक, हे कलाकाराच्या प्रतिभेतून निर्माण झालेले असते. आणि जो पर्यंत असे सृजन कार्य कुठल्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही, त्या कार्यालस सुळावर चढवण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि कोर्टांनी  देखील अश्या प्रकारच्या केसेस मध्ये अतिशय सावधपणे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्येच मनाई हुकूम दिले पाहिजेत, असे  ही सर्वोच्च न्यायालयाने पुढे नमूद केले. इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत कि लेखक, कवी, ह्यांनी त्यांच्या प्रतिभेप्रमाणे लिखाण केले आहे आणि सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडची पात्र उभी करण्याची ताकद अश्या प्रतिभेमध्ये असते. एखादा  विचार प्रवृत्त करणारा चित्रपट हा उपदेशाचे दोष पाजणारच हवा असे काही नाही. उलटपक्षी तो प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा असू शकतो. अश्या चित्रपटांवर बंधने हि केवळ आणि केवळ कायद्याच्या चौकटीतच घालता येवू शकतात, असे शेवटी कोर्टने नमूद केले.

 कोर्टाने शेवटी नमूद केले कि सदरची क्लिप हि पुरावा म्हणून वापरली जाईल किंवा कसे हे ठरविण्याचा अधिकार केवळ ट्रायल कोर्टालाच आहे आणि आत्ता त्यावर भाष्य करता येणार नाही. 

चित्रपट आणि वाद हे समीकरण जुनेच आहे, परंतु सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात ते जास्त ठळकपणे दिसून येत आहे. दशक्रिया चित्रपटाविरुद्धची याचिका  देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच फेटाळून लावली. देहदान करायचे का नाही आणि अंत्यसंस्कारानंतर दशक्रिया विधी करायचे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कायदा ह्या बाबत कुठलीच सक्ती करत नाही. आपल्या  राज्यघटनेमधील नागरिकांची जी कर्तव्ये सांगितली आहेत, ती काही इन्फॉरसीएबल नाहीत. उदा.  वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे, पण ते  कर्तव्य पाळले  नाही म्हणून कोणावर केस  करता येणार नाही. 
बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या वेळी देखील पेशवेपत्नी काशीबाई आणि मस्तानी ह्यांना एकत्र नाचताना दाखवून भन्साळीने टीका ओढवून घेतली होती पण ती करणीसेने एवढी जहाल खचितच नव्हती. खरे तर ऐतिहासिक / धार्मिक  चित्रपट बनवताना अधिक सावध असणे गरजेचे आहे कारण ह्या बाबतीत लोकांच्या भावना ह्या तीव्र असतात. अभिव्यती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य हे  एकत्रच नांदत  असतात. त्यामुळेच सेक्सी दुर्गा हे नाव जरी नंतर बदलून एस दुर्गा ठेवले तरी सेक्सी नावानंतर अन्य धर्मियांच्या धार्मिक / श्रद्धा स्थानांची नावे  ठेवाल का, ह्या आंदोलन कर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे  निर्मात्यांकडे उतरणार नव्हते.

चित्रपटास कायद्याच्या चौकटीत विरोध करणे ह्यास कोणाचीही हरकत असणार नाही.  विचारांची लढाई हि विचारांनीच केली पाहिजे हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात ते उतरत नाही असेच दिसून येते आणि मग दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळीच्या मस्तकांवर इनाम लावले जाते. पद्ममावती ही सत्यकथा आहे का आख्यायिका , एवढे टोकाचे वाद चालू असताना रााजस्थानमधील  महिलांच्या  सबलीरणासाठी  होणाऱ्या प्रयत्नांवर देखील चर्चा होणे जास्त गरजेचे आहे असे काही चिित्रपट समर्थकांचे मत विचार करण्यासारखे आहे.

आता चित्रपटकर्ते सध्या तरी 4 पाऊले मागे गेले असले तरी  असे म्हणावेसे वाटते की  आपल्या सगळ्यांपुढे चित्रपटांवर वाद घालण्यापेक्षाही अजून महत्वाचे मूलभूत प्रश्न उभे आहेत आणि त्यांची उकल होणे जास्त गरजेचे आहे.

http://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/shared/ShowArticle.aspx?doc=MTPUN%2F2017%2F11%2F24&entity=Ar01304&sk=A72BEFCC&mode=image

Adv. रोहित एरंडे . ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©