कट-प्रॅक्टिस वर काट - डॉक्टरांना "रेफरल फी' देणे अवैध - इन्कम टॅक्स विभागाचा दणका ॲड. रोहित एरंडे ©

 कट-प्रॅक्टिस वर काट - डॉक्टरांना "रेफरल फी' देणे अवैध  -  इन्कम टॅक्स विभागाचा  दणका

ॲड. रोहित एरंडे ©


कायद्याच्या ऐरणीवर कोणता विषय कधी येईल याचा नेम नाही.  रेफरल फी  ज्यालाच 'सामान्य भाषेत'  कट प्रॅक्टिस असेही काही जण  म्हणतात, तो विषय  इन्कम टॅक्स विभागापुढे नुकताच आला. 

'डॉक्टर आणि नर्सिंग होम्स ह्यांना 'रेफरल फी' नावाखाली दिलेली तब्ब्ल १ कोटी रुपयांची रक्कम हि पुणे येथील एका  डायग्नोस्टिक सेन्टरला  उत्पन्नातून वैध वजावट म्हणून क्लेम करता येणार नाही' असा महत्वपूर्ण निकाल नुकताच पुणे येथील इन्कम टॅक्स अपिलीय ट्रॅब्युनल ने नुकताच दिला. ह्या केसची थोडक्यात हकीकत बघू यात. 

 कंपनी कायद्याखाली नोंदलेल्या पुणे येथील ह्या  कंपनीचा व्यवसाय एक्स-रे, सिटी.स्कॅन अश्या वैद्यकीय निदान ( डायग्नोस्टिक) सेवा देणारा आहे. सदरील कंपनीने २०१५- १६ सालासाठी विवरणपत्र भरताना रु. १,९७,९०,४४१/-  इतक्या रुपयांचा तोटा दाखविला होता. मात्र मूल्यांकन अधिकाऱ्याने रु.९७,४४,७५१/- एवढ्या रकमेची वजावट देण्यास नकार देताना असे नमूद केले कि  हा खर्च   संबंधित कंपनीने डॉक्टर आणि नर्सिंग होम ह्यांना दिलेल्या रेफरल फी पोटी दाखविला होता आणि रेफरल फी देणे हे वैद्यकीय परिषदेच्या तरतुदी (व्यावसायिक आचार, शिष्टाचार आणि नैतिकता) नियमन कायदा, 2002 च्या तरतुदींचे सरळ सरळ उल्लंघन आहे आणि म्हणून हि वजावट देण्याचे अधिकाऱ्यांनी नाकारले. हा निर्णय न पटल्याने सदरील कंपनीने केलेले पहिले अपील देखील फेटाळले गेले आणि म्हणून  प्रस्तुतचे अपील  २ सदस्यीय बेंचपुढे आले.

अपिलेट  बेंचने देखील संबंधित कंपनीचे अपील फेटाळताना नमूद करताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या  २०११ मधील   अपेक्स लेबॉरेटरीज विरुद्व इन्कम टॅक्स अधिकारी, ह्या केसचा आधार घेतला. त्याही केसमध्ये सारखाच प्रश्न उपस्थित झाला होता आणि मा.  सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये नमूद केले कि  'मोफत  भेटवस्तू (फ्रिबीज )आणि रेफरल फी देणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्यापोटी वजावट मिळू शकणार नाही'. अपिलेट बेंचने पुढे असेही नमूद केले कि 'डॉक्टर आणि नर्सिंग होमला रेफरल फी देणे हे कायद्याच्या विरुध्द असल्यामुळे करदात्याच्या  उत्पन्नातून वैध वजावट म्हणून त्यास मान्यता देताच येणार नाही.'

डॉक्टर-पेशंट, दुष्ट चक्रात अडकलेले नाते :

अर्थात सब घोडे बारा टक्के ह्या न्यायाने सर्व डॉक्टरांना किंवा सर्व  डायग्नोस्टिक सेंटर्सला एकाच तराजूमध्ये तोलणे चुकीचे होईल. परंतु ह्या निकालने संबंधितांनि योग्य तो धडा नक्कीच घ्यावा. आधीच डॉक्टर -पेंशट  ह्यांचे नाते दुष्टचक्रात अडकलेले आहे आणि डॉक्टरांविरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणाच्या केसेस मध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसून येते आणि अश्या केसेस मध्ये बऱ्याचदा असे आरोप होतात कि डॉक्टरांनी टेस्ट करायलाच सांगितले नाही आणि समजा टेस्ट्स करायला सांगितल्या आणि त्यामध्ये काहीच निघाले नाही, कि 'रेफरल फीसाठीच'  डॉक्टरांनी  उगाचच वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगितल्या  असेहि  आरोप होत असतात.  'अधिक सजग' (?) झालेले ग्राहक आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या युगात पूर्वी सारखी प्रॅक्टिस राहिली नसल्याचे अनेक डॉक्टर मान्य करतात.  असो. 

You may read the following blog in English on the same subject 

https://advrohiterande.blogspot.com/2022/11/payment-of-referral-fees-to-doctors-and.html


धन्यवाद,

ऍड. रोहित एरंडे.©




Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©