प्राणीप्रेमासाठी इतर सभासदांवर अन्याय नको. ऍड. रोहित एरंडे ©

 प्राणीप्रेमासाठी इतर सभासदांवर अन्याय नको.

ऍड. रोहित एरंडे ©


प्रश्न : सर, आम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतो, त्याच्या वरच्या फ्लॅट मधील व्यक्तींनी त्यांच्या गॅलरीमध्ये कबुतरांना खायला घालण्यासाठी मोठा ट्रे उभारला आहे. ह्या ट्रेमध्ये ते रोज कबुतरांना खायला दाणे आणि पाणी ठेवतात. पण त्यामुळे आमच्या खालच्या गॅलरीमध्ये कबुतरांची घाण, पिसे, दाणे असा कचरा होतो. वरील सद्गृहस्थांना सांगितल्यावरही ते थांबत नाहीत आणि उलट पक्षांना दाणे खायला घालणे हे पुण्याचे काम आहे असे सांगतात. सोसायटी देखील हा प्रश्न तुमचा तुम्ही सोडवा असे सांगत आहे. ह्या होणाऱ्या घाणीमुळे आमच्या आरोग्याचाही प्रश्न  निर्माण झाला आहे. तरी ह्याबाबत काय करता येईल ?


त्रस्त सभासद, मुंबई. 


उत्तर : आपल्या प्रश्नाचे उत्तर मा. मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच जिग्नेश ठाकोर विरुद्ध दिलीप शहा , २०१६(६) महा. law जर्नल , पान क्र. ३७४, मा. न्या. आर. एम . सावंत, ह्या निकालात दिले आहे.  ) या निकालात "आपल्या वागणुकीमुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये" ह्या नागरिक शास्त्रातील अतिशय मूलभूत परंतु महत्वाच्या शिकवणुकीवर शिक्का मोर्तब केले आहे आणि हे तत्व सोसायटीमध्ये अनेक ठिकाणी लागू होईल.  कुत्रा -मांजर ह्यांसारखे प्राणि पाळणे ही गोष्ट काही नवीन नाही. परंतु आपले प्राणी प्रेम हे अन्य लोकांसाठी इतके त्रासदायक ठरू नये कि त्यामुळे इतरांना आपल्याविरुद्ध कोर्टात दाद मागावी लागावी आणि नेमके हेच ह्या निकालामध्ये आपल्याला दिसून येईल.

 वरील केसमध्ये देखील तुमच्यासारखेच खाली राहणाऱ्या कुटुंबाला वरच्यांच्या प्राणीप्रेमाचा त्रास होत होता आणि इतर सभासदांना देखील त्रास होत होता. मात्र ह्या केसमध्ये सोसायटीने देखील संबंधित सभासदाला लेखी ताकीद देऊन प्राणीप्रेमाला आवर घालण्याची विनंती केली होती.  

मा. मुंबई  उच्च न्यायालयाने  पुढे नमूद केले कि फक्त तक्रारदारानेच नव्हे तर  सोसायटीने देखील अनेक वेळा प्रतिवादींना लेखी पत्र लिहून त्यांचे वर्तन चुकीचे असल्याचे निदर्शनास आणले होते. या उलट प्रतिवादींनी पात्र पाठवून ह्या गोष्टीचा 'इशू न करता शेजार धर्म पळून थोडा त्रास सहन करावा'  असे शहाजोगपणे  उत्तर दिले होते आणि ह्यावरूनच पक्ष्यांची घाण खाली लोकांच्या अंगावर पडून त्यांना त्रास होतो हि गोष्ट सिद्ध होत असल्याचे उच्च न्यायालयाने  नमूद केले.  जरी कथित प्राणी प्रेमी सलग १० वर्षे पक्ष्यांना खायला प्यायला घालत असले तरीहि सदरील केस मुदतबाह्य होत नाही कारण वादींना  रोज त्रास होत असल्यामुळे  प्रत्येक दिवशीच दावा दाखल करायला कारण घडत आहे असे म्हणून दावा मुदत बाह्य असल्याचा आक्षेपही फेटाळला गेला आणि ह्याचा तुमच्या केसमध्ये हि तुम्हाला फायदा होईल. तसेच  उच्च न्यायालायने पंजाब उच्च न्यायालयाच्या दर्शन राम वि. नजर राम ह्या निकालाचाही आधार घेतला ज्यामध्ये असे धरण्यात आले होते की "कोणीही आपल्या जागेचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होईल अश्या पद्धतीने करू शकत नाही".

थोडक्यात प्राणी पाळण्यास कायदयाने बंदी नाही पण आपल्या प्राणिप्रेमामुळे जर इतरांना मर्यादेबाहेर आणि प्रचंड त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला प्राणी प्रेम बाजूला ठेवावे लागेल, असेच ह्या निकालाचे सार आहे. त्याचप्रमाणे कबुतरांच्या घाणीमुळे अतिशय घातक   असे आजार होऊ शकतात असे तज्ञ्   डॉक्टरांचे मत आहे आणि असे आजार इतरांबरोबरच प्राणीप्रेमींना सुध्दा होऊ शकतात.   तसेच प्राण्यांना खायला घालणे हे जर पुण्याचे काम असेल, तर नियम न पाळणे हेहि मोठे पाप आहे असेच म्हणावे लागेल.    सदरील सभासदाचे वर्तन हे उपविधी ४८ (अ) अन्वये कारवाईस पात्र असून सोसायटीने उपविधी ४८ (बी ) प्रमाणे कारवाई करणे क्रमप्राप्त आहे अन्यथा तुम्हाला कार्यदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा आहेच  

ह्या सर्व प्रकारात प्राणीप्रेमात सुद्धा मर्यादा असावी यासाठी    'मर्यादेविण पाळी सुणे (श्वान), तो एक मूर्ख ' असे म्हणणारे समर्थ रामदास स्वामी किती द्रष्टे होते हे जाणवते.  


ऍड. रोहित एरंडे.

पुणे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©