घरात गळती, जबाबदारी कोणाची ? - ॲड. रोहित एरंडे ©

 सर, जर वरच्या मजल्यावरील फ्लॅट मधून खालच्या फ्लॅटमध्ये  गळती होत असेल तर  लिकेज दुरुस्तीची जबाबदारी कोणत्या सभासदाची आहे ? का सोसायटीची ?

एक वाचक, पिंपरी चिंचवड.


उत्तर - आपण विचारलेला प्रश्न हा कमी अधिक फरकाने अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येतो. पाणी गळती कुठे होत आहे त्यावर सोसायटी जबाबदार का सभासद जबाबदार हे ठरते. 

सोसायटीची जबाबदारी :

 सोसायटीच्या दुरुस्त उपनियम १५९ प्रमाणे  सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या ह्यांचा देखील समावेश होतो याचा खर्च तसेच पावसामुळे  गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, हे दुरुस्त काणे आणि त्याचा  खर्च  करण्याची जबाबदारी सोसायटीवर आहे. 

 

या संदर्भात  २००६ साली  मा. मुंबई उच्च न्यायालयाने    'हंबल को.ऑप. सोसायटी विरुद्ध शाम आणि लता बलानी' ह्या केसमध्ये दिलेला निकाल महत्वाचा आहे.  लता बलानी ह्यांच्या फ्लॅटमध्ये टॉप टेरेस मधून होत असलेल्या पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी  सोसायटीला जबाबदार धरले. तसेच 'पाम बीच सोसायटी, नवी मुंबई विरुद्ध सलील बोस' २०१७  ह्या केस मध्ये महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने 'बिल्डिंग सुयोग्य स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी सोसायटीची असल्यामुळे  सामाईक गच्चीवरील  वॉटरप्रूफिंगचा  खर्च करण्यास सोसायटी  बांधील आहे" असा निकाल दिला. 


सभासदाची जबाबदारी :

 आपण विचारलेला प्रश्न हा अंतर्गत पाणीगळती संदर्भातील आहे आणि ह्या संदर्भातील  एक महत्वाची तरतूद (उपनियम  ६८ (ब) आणि १५९ (ब ) ) मध्ये दिली आहे अशी आहे की एखाद्या  फ्लॅटमध्ये ,वरील फ्लॅटमधील शौचालय /सिंकमुळे अंतर्गत पाणी गळती होत  असेल तर अशी गळती ज्याच्या फ्लॅटमधून गळती होत आहे त्याने स्वखर्चाने थांबविली पाहिजे. ज्यांच्या  घरात अशी पाणी गळती होत असते त्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो तसेच आरोग्याचाही प्रश्न उपथित होतो. त्यामुळे असा त्रास न थांबल्यास संबंधित सभासदाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ अन्वये कलम १८३-१८४ अन्वये महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करता येते आणि महानगरपालिकेतर्फे तपासणी होऊन जर अशी गळती आढळून आली तर संबंधित सभासदाविरुद्ध कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. 


येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये हे तत्व कायदेशीर आहे आणि नैतिक देखील आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने सुध्दा ह्याकडे बघितले पाहिजे. बऱ्याचदा ज्याच्या घरात गळती होते तोच सगळं खर्च देखील करायला तयार असतो कारण कोर्टात जाऊन लागणार वेळ आणि पैसे खर्च करण्याची तयारी कोणाची नसते. पण अश्या कोणाच्या परिस्थितीचा फायदा उठवणे गैर आहे. लक्षात तेव्हा, अशी वेळ कोणावरही येऊ शकते. 


धन्यवाद 


ऍड. रोहित एरंडे 


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©