वृक्ष तोडणी कायदेशीर पद्धतीनेच आणि फेडरल सोसायटी आणि रस्त्यांची अंतर्गत मालकी

प्रश्न १ : मी डोंबिवली येथे एका सोसायटीमध्ये नुकताच फ्लॅट खरेदी केलेला आहे. या फ्लॅटसोबत एक स्टिल्ट पार्किंगदेखील मला मिळालेले आहे. सदर स्टिल्ट पार्किंग बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आहे आणि तिथे कार पार्क  करण्यासाठी  नेण्याच्या रस्त्यात दोन झाडांचा अडसर येतो आहे. मी ही बाब सोसायटीच्या लक्षात आणून दिली, तरीही त्यांनी ती दोन झाडे महापालिकेकडे परवानगी काढून तोडण्यास बाकी सदस्य नकार देत आहेत.

जुन्या मालकाकडे कार नसल्यामुळे त्याने सदर स्टिल्ट अलोटेड पार्किंग कार पार्कसाठी वापरले नव्हते. त्यामुळे त्याला कधीही कार तिथपर्यंत नेण्याचा प्रश्न आला नव्हता. आता मात्र मला ते माझे पार्किंग माझी कार पार्क करण्यासाठी वापरावे लागणार आहे. पण तिथपर्यंत कार जायला दोन झाडांचा मोठा अडसर ठरत आहे. मला अशा परिस्थितीत काय करता येऊ शकते?. कृपया मार्गदर्शन करा.

- ललित भोळे

उत्तर :वृक्ष तोडणी हा विषय "महाराष्ट्र शहरी विभाग वृक्ष  संवर्धन कायदा १९७५" अंतर्गत येतो .  ह्या कायद्यान्वये  विनापरवाना झाडे तोडण्यास मनाई करण्यात आली आहे आणि असे वर्तन शिक्षेस पात्र ठरते.  ह्या कायद्याखाली ट्री ऑथॉरिटी  म्हणजेच वृक्ष प्राधिकरण यांची स्थापना  प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका येथे  करण्यात आली असून  , ज्यांच्याकडे    झाडे तोडण्यासाठीची परवानगी  विहित नमुन्यामधील अर्ज भरून करता येते. तसेच जर एखाद्या व्यक्तीस झाडे तोडण्यावर आक्षेप असेल तर अश्या व्यक्तीस प्राधिकरणाकडे हरकत नोंदविता येते आणि सर्व बाजूंचा विचार करून प्राधिकरण त्यावर निकाल देते. त्यामुळे आपण देखील आपल्या भागातील वृक्ष प्राधिकरणाकडे अलाहिदा अर्ज करावा.   त्यामुळे झाडे  तोडायची  का नाही, कोणा   सभासदाच्या मर्जीवर अवलंबून नसून वृक्ष प्राधिकरणाच्या अखत्यारीतील हा विषय आहे. तसेच ह्या कायद्यामधील नवीन दुरुस्ती प्रमाणे जितकी झाडे तोडण्याची परवानगी दिली असेल त्याच्या ठराविक प्रमाणात नवीन झाडे लावण्यास  किंवा काही पैसे भरपाई म्हणून भरण्यास  सांगितले जाऊ शकते.  . तसेच, आदर्श उपविधी १६१ अन्वये सोसायटीमधील झाडे तोडण्यास सभासदांना मनाई करण्यात आली असली तरी  ह्या विषयासाठी वरील स्वतंत्र कायदा असल्याने आणि उपविधींपेक्षा कायमच  कायदा श्रेष्ठ असल्याने त्याचा अडसर होणार नाही. शक्य असल्यास  काही मध्यम   मार्ग   निघेल का याचाही विचार सर्वांनी   करण्यास हरकत नाही


प्रश्न २ : आमचे येथे एकूण चार मजली पाच इमारती आहेत व काही ओपन स्पेसेस तसेच अंतर्गत रस्ते आहेत. प्रत्येक इमारतीची एक अशा एकूण पाच सोसायट्या बिल्डरने बनवून दिल्यात. प्रत्येक सोसायटीच्या कन्व्हेयन्समध्ये त्या सोसायटीच्या खालची जमीन नावावर केली आहे, तसेच ओपन स्पेसेस आणि रस्ते हे फक्त वापरासाठी असून त्यांचे विकास हक्क बिल्डरकडे राहतील आणि त्याला प्रत्येक सोसायटीची हरकत नाही असेही कन्व्हेयन्समध्ये लिहून घेतले आहे. पाच सोसायट्यांची मिळून एक शीर्ष (अपेक्स) सोसायटी आहे. ओपन स्पेसेस आणि रस्ते हे अपेक्स सोसायटीच्या नावावर करता येतील का?

- एक वाचक

उत्तर :  जागा नावावर करणे म्हणजे त्यातील मालकी हक्क तबदील करणे आणि तो योग्य ती स्टँम्प ड्युटी भरून खरेदीखत, बक्षिस पत्र , हक्क सोडपत्र अश्या रजिस्टर्ड दस्तांनी किंवा वारसा हक्क किंवा मृत्यूपत्र ह्यांनीच तबदील होतो. ओपन स्पेसेस आणि रस्ते वापरण्याचा हक्क सोसायट्यांना आहे ह्यात काही दुमत नाही. मात्र  आपण म्हणल्याप्रमाणे जर का प्रत्येक सोसायटीच्या कन्व्हेयन्समध्ये ओपन स्पेसेस आणि रस्ते ह्यांचे हक्क जर का बिल्डरने स्वतः कडे ठेवले असतील आणि सोसायटीने देखील त्यास मान्यता दिली असल्याने  आता ते अपेक्स सोसायटीच्या नावावर करणे किंवा कसे हे ठरविण्याचा  हक्क बिल्डरकडेच  आहे.

ऍड. रोहित एरंडे 


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©