मृत्युपत्र अंमलात येण्याआधी ते करणाऱ्याला बदलता येते. ॲड. रोहित एरंडे.©

माझ्या सासूबाईंनी चार वर्षांपूर्वी एका नोंदणीकृत मृत्यूपत्रामध्ये त्यांचा स्वतःच्या मालकीचा एक फ्लॅट मला आणि माझ्या पत्नीला दिला होता. त्यांनी मला ते मृत्युपत्र स्वतः दाखविले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले , त्यावेळी आम्ही मृत्यूपत्राचा विषय काढल्यावर , माझ्या पत्नीच्या धाकट्या बहिणीने आणि तिच्या पतीने, त्यांच्या दोघांच्या नावे याच फ्लॅटचे सुमारे एक वर्षांपूर्वी सासूबाईंनीच केलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आम्हाला दाखवले आणि फ्लॅटवर त्यांचा हक्क सांगितला . एकतर आमच्या नावाने मृत्यूपत्र केलेले असताना त्यानंतर सासूबाई असे बक्षिसपत्र करू शकतात का ?, त्या विरुध्द कोर्टात जाता येईल का ?

एक वाचक, मुबंई 


मृत्युपत्र हा खूप महत्वाचा विषय आहे, पण त्याच्याबद्दल चे अज्ञान आणि भिती हे मृत्यूपेक्षाही जास्त आहे हे वेळोवेळी दिसून येते. त्याबद्दल कितीही वेळा लिहिले तरीही प्रश्न संपत नाहीत. आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र ह्यांच्या कायदेशीर तरतुदींची परत एकदा थोडक्यात माहिती देतो. आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे, ती कोणाला द्यायची हा ज्याचा त्याचा हक्क असतो. त्यामुळे आपल्या हयातीमध्ये मिळकतीमधील मालकी हक्क खरेदीखत, बक्षीस पत्र , हक्क सोड पत्र ह्या नोंदणी कृत दस्तांनी तबदील करता येतो किंवा मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे होतो किंवा जर मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने तबदील होतो. 


खरेतर ह्या मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र या दोनही दस्तांची जातकुळी बरीचशी वेगळी आहे. मृत्यूपत्रासाठी कोणताही स्टँम्प द्यावा लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही (तरीही प्रॅक्टिकली ते जरूर करावे) , लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही. तर ह्या तीनही गोष्टी बक्षीसपत्रासाठी करणे अनिवार्य आहेत. वैध मृत्यूपत्र करण्यासाठी मृत्युपत्र करणाऱ्याने आणि २ साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्युपत्रावर सही करणे गरजेचे असते, अर्थात मृत्यूपत्राचे लाभार्थी साक्षीदार होऊ शकत नाहीत. मृत्युपत्राला डॉक्टर सर्टीफिकेट जोडणे हे सुद्धा कायद्याने बंधनकारक नाही, परंतु ते सुद्धा प्रॅक्टिकली जरूर घ्यावे. 

मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि    सर्वात शेवटचे मृत्युपत्रच ग्राह्य धरले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याच्यात आपल्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे कि मृत्युपत्र करणारा बोलायचा  थांबला कि मृत्युपत्र  बोलायला लागते म्हणजेच मृत्यूपत्राचा अंमल हा ते करणाऱ्याचा  मृत्यूनंतरच  होतो. त्याचप्रमाणे त्याच्या मृत्यूच्या वेळी जी काही संपत्ती राहिली असेल तेवढीच ती पुढे लाभार्थ्यांना मिळू शकते.   तर बक्षीसपत्राद्वारे मिळकतीमधील हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या  हयातीमध्येच तबदील  होतात. आपल्या केसमध्ये जरी आपल्या नावे रजिस्टर्ड मृत्युपत्र  असले  तरीही तुमच्या  सासूबाईंना त्यांच्या हयातीमध्ये  मृत्यूपत्र बदलण्याचा किंवा  ती मिळकत अन्य कायदेशीर मार्गाने तबदील करण्याचा पूर्ण हक्क होता, जो त्यांनी बक्षीसपत्र त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या आणि जावयांच्या नावे करून बजावला आणि ज्या क्षणी बक्षीसपत्र नोंदविले गेले, त्याक्षणी त्या फ्लॅट मधील  मालकी हि त्या मुलीच्या आणि  तिच्या  पतीच्या नावे तबदील झाली आणि तुमच्या नावे केलेल्या मृत्यूपत्रामधील  तेवढा  भाग आपोआपच रद्दबातल  झाला.     'तेवढाच भाग' एवढ्याकरिता म्हटले कि मृत्युपत्रात  समजा अजून काही मिळकती उदा. दाग -दागिने /एफ.डी, इ.   तुम्हाला किंवा तुमच्या पत्नीला दिले असतील आणि अर्थात ते सासूबाईंनी ठेवले असतील   तर ते तुम्हाला तुमच्या सासूबाईंच्या मृत्यूनंतर  मिळण्याचा अधिकार आहे. तसेच  आपल्या केसमध्ये   मृत्युपत्र हे लाभार्थ्यांना शक्यतो दाखवू नये हा अलिखित संकेतही  पाळला गेल्याचे दिसून येत नाही. 

"सासूबाईंनी एका मुलीच्या नावे मृत्युपत्र करूनही नंतर त्यांच्या हयातीत त्यांना भल्या वाटणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या - जावयाच्या नावे बक्षीस पत्र केले असेल तर बक्षिसपत्रच ग्राह्य ठरेल आणि मृत्युपत्र रद्दबातल होईल.."

पण बक्षीसपत्र एकदा झाले कि ते अत्यंत अपवादात्मक परिस्थिती मध्येच रद्द होऊ शकते. अशी परिस्थिती उदा.  सासूबाईंना  फसवून किंवा धमकावून बक्षिसपत्र करून घेतले अशी तुमच्याकडे सबळ कारणे खरीच असतील तरच  तुम्ही  कोर्टात जायचा जो अधिकार  प्रत्येकाला  असतो तो वापरा , परंतु हे सर्व आरोप  पुराव्यासह  सिध्द करण्याची जबाबदारी तुमच्यावरच  राहील आणि त्यासाठी कोर्टात  लागणारा  वेळ, पैसा  खर्च करण्याची तयारी ठेवा. ह्याचबरोबर  मानसिक शांतताहि खर्च होऊ शकते , जी बाजारात विकत मिळत नाही.  ह्यावरून काय तो योग्य निर्णय घ्या. 


ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©