लिफ्ट वापरा अगर नाही, सभासदांना लिफ्ट दुरुस्तीचे पैसे देणे क्रमप्राप्तच. - ॲड. रोहित एरंडे ©

 लिफ्ट वापरा अगर  नाही, सभासदांना लिफ्ट दुरुस्तीचे पैसे देणे क्रमप्राप्तच. 

ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या बिल्डिंग मध्ये लिफ्टच्या दुरुस्तीवरून सध्या वाद चालू आहे. तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील सभासद म्हणतात कि आम्ही लिफ्ट वापरत नाही म्हणून लिफ्टच्या दुरुस्तीचे पैसे देणार नाही आणि वरच्या मजल्यावरच्या सभासदांना त्याचा बोजा टाकावा असे त्यांचे म्हणणे आहे. तरी कृपया या बद्दल मार्गदर्शन करावे. 

सोसायटी सेक्रेटरी -  मुंबई


मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य दाखविणारे असे वाद अजूनही चालू आहेत हे वाचून आश्चर्य वाटले.  काही ठिकाणी तर ज्यांनी लिफ्ट दुरुस्तीचे पैसे दिले आहेत, तेवढ्याच मजल्यावर लिफ्ट थांबेल असेही प्रकार बघितले आहेत. तसेच एखादा  सभासद लिफ्ट वापरत आहे कि नाही ह्याचा मग कोण ठेवणार ?  आणि अश्या प्रकारे अजून काही खर्च दुसरे सभासद देण्यास नकार द्यायला लागतील. असो.  दुरुस्त आदर्श उपविधी क्र. ६५ ते ७१ मध्ये संस्थेची शुल्क आकारणी कशी करावी याची साद्यंत माहिती दिली आहे. उपविधी ६५ मध्ये   सेवा-शुल्क म्हणजेच ज्याला बोली भाषेत मेंटेनन्स म्हणून संबोधले जाते त्यामध्ये कोणते खर्च अंतर्भूत येतात याची सविस्तर माहिती दिली आहे आणि हे सेवा शुल्क  फ्लॅट आहे कि दुकान किंवा  क्षेत्रफळ किती आहे असा भेद न करता शुल्क सगळ्यांना समान असावा  हा कायदा आता स्पष्ट झाला आहे आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल देखील आहेत.  हे सांगण्याचे कारण म्हणजे  उपविधी ६५ मध्ये   लिफ्ट (उदवहन) याची देखभाल आणि दुरुस्ती याचा खर्च देखील अंतर्भूत केला आहे. एवढेच  नव्हे तर पुढे जाऊन उपविधी ६७ अ (४) मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे कि लिफ्टच्या  देखभाल दुरुस्तीचा खर्च  हा ज्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या बिल्डिंगमधील सर्व सदस्यांना सारख्या प्रमाणातच द्यावा लागेल. तसेच उपविधी ६७ अ  मध्ये सेवाशुल्काखेरिज जे खर्च उदा. मालमत्ता कर, इमारत दुरुस्ती - देखभाल खर्च, सिंकिंग फंड  इ. क्षेत्रफळाप्रमाणे आकारले जातात त्याचीही यादी दिली आहे


अपार्टमेंट साठी  देखील हेच तत्व लागू होते आणि आम्ही एखादी सामायिक सोयी-सुविधा  वापरत नाहीत म्हणून त्याचे पैसे देणार नाही असे अपार्टमेंट धारकाला करता येणार नाही अश्या आशयाची  तरतूद अपार्टमेंट ऍक्टच्या कलम १७ मध्ये दिली आहे. 

त्यामुळे आपल्या बिल्डिंगमधील तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील  सभासदांना देखील हाच नियम लागू होईल. एकतर लिफ्ट असणे हि एक गरजेची गोष्ट आहे आणि सभासदांना, मग ते कुठल्याही मजल्यावर राहत असले तरी,  कोणत्याहि वेळी लिफ्टची गरज पडू शकते.   त्यामुळे अश्या वादात न पडता  लिफ्टच्या दुरुस्तीचा खर्च त्या इमारतीमधील सर्व सभासदांना  देणे क्रमप्राप्त आहे. 

ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©