सोसायटी आणि पार्किंगचा यक्ष प्रश्न.. - ॲड. रोहित एरंडे ©

सर, आमच्या  सोसायटीमध्ये पार्किंग वरून कमिटी आणि सभासद यांच्यामध्ये वाद वाढत आहेत. काही सभासदांकडे २ पेक्षा अधिक गाड्या आहेत त्यांना कायम जादाचे पार्किंग हवे असते, तर काही सभासदांचे भाडेकरू राहतात त्यांना पार्किंग वापरता येते का ?  एकंदरीतच पार्किंगबाबत काही विशेष नियमावली आहे का ?.

सोसायटी कमिटी, पुणे. 

आपल्यासारखे प्रश्न अनेक सोसायटीमध्ये दिसून येतात.  सोसायटी बायलॉज (उपविधी) क्र. ७८-८४ पार्किंग प्रमाणे पार्किंग बद्दलचे नियम, पार्किंग शुल्क  इत्यादी ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहेत, त्याची  थोडक्यात माहिती आपण घेऊ. 

उपविधी ७८ - वाहने उभी करण्यासाठी जनरल बॉडीमध्ये नियम करता येतील आणि ते नियम सर्वांवर बंधनकारक असतील. त्यामुळे जनरल बॉडी मध्ये  आपापल्या  परिस्थितीचा विचार करून त्यावर निर्णय घ्यावा.  पार्किंगची जागा अलॉट करताना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" ह्या तत्वाचा अंगीकार केला जाईल. मात्र  मिळालेले पार्किंग विकण्याचा किंवा भाड्याने देण्याचा अधिकार सभासदाला असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या पार्किंग जागा सभासदाला कायदेशीरपणे अलॉट झाली असेल  तेवढी जागा सोडून इतर कोणत्याही जागेवर सभासदाला पार्किंग करता येणार नाही.  

उपविधी ७९ - पार्किंगसाठी जागेची आखणी करणे - सोसायटीच्या कॉमन जागेमध्ये किंवा  आधारस्तंभाखालील जागेत  कोणाला अडथळा होणार नाही या  पद्धतीने  पार्किंग स्लॉट पाडून त्यांना क्रमांक देणे हे काम सोसायटीचे आहे. पार्किंग जागेचा वापर पार्किंगसाठीच होतोय ना   हे तपासण्याचे काम सोसायटीचे आहे. 


उपविधी ८० - पार्किंग साठी इमारतीखालील किंवा आवारातील  मोकळी जागा कोणाला मिळू शकते ? - ज्या सभासदाकडे  वाहन आहे असाच सदस्य अश्या मोकळ्या जागेतील पार्किंग मिळण्यासाठी पात्र राहील. शक्यतो एक सभासद एक पार्किंग असेच तत्व पाळले जाईल.   अर्थात सभासदाचे स्वतःच्या मालकीचे वाहन असलेच पाहिजे असे नाही. कंपनीने दिलेले किंवा भागीदारी व्यवसायातील देखील वाहन असू शकते. जादा पार्किंग स्लॉट्स  उरल्यास ते आधी पार्किंग स्लॉट्स मिळालेल्या सभासदांनाही देता येतील. परंतु असे जादाचे पार्किंग हे जास्ती जास्त एक वर्षाकरिताच दिले जाईल आणि ते देताना कोणत्याही सभासदाला एकही  पार्किंग स्लॉट्स मिळणार नाही अशी वेळ येत नाही हेहि बघणे गरजेचे आहे. 


उपविधी ८१- लॉटरी पद्धत -  जर पार्किंग स्लॉट्सची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे असेल, जे बहुतेक सर्वत्र दिसून येते, अश्या वेळी  मॅनेजिंग कमिटीने पारदर्शक पद्धतीने आणि जनरल  बॉडीने ठरविलेल्या पध्दतीप्रमाणे त्याची वाटणी वार्षिक पद्धतीने  करावी. ह्या साठी बहुतेक ठिकाणी लॉटरी पद्धत -चिट्ठ्या टाकून नाव काढणे - अशी पद्धत  वापरली जाते. परंतु  हि सर्वांना न्याय देईलच असे नाही  कारण ह्यात  सभासदांना  पार्किंग मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे रोटेशन पद्धतीने पार्किंग वाटून दिल्यास प्रत्येकाला पार्किंग वापरता येईल. ह्यासाठी सर्व सभासदांनी सामंज्यस दाखविणे ह्याला मात्र पर्याय नाही. 


उपविधी ८२ - पार्किंग मिळविणे - इमारतीखालील किंवा मोकळ्या जागेतील पार्किंग स्लॉट मिळविण्यासाठी सभासदाला योग्य त्या तपशिलासह सेक्रेटरीकडे अर्ज करावा लागेल. उपविधी ६३ अन्वये अश्या अर्जावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. 


उपविधी - ८३ - पार्किंगसाठी शुल्क  घेणे - इमारतीखालील किंवा मोकळ्या जागेतील पार्किंग स्लॉट मिळालेल्या प्रत्येक सभासदाने जनरल बॉडी मध्ये ठरलेल्या दराप्रमाणे पार्किंग साठी  शुल्क देणे अनिवार्य आहे, मग तो सभासद तिथे गाडी लावत असेल किंवा नसेल.  


उपविधी -८४ - इतर वाहने उभे करता येतील ? - ज्या सभासदांकडे (वरील वाहने सोडून) इतर स्कुटर, मोटारसायकल किंवा रिक्षा असेल त्यांना अशी वाहने सोसायटी कमिटीच्या पूर्व परवानगीशिवाय लावता येणार  नाहीत आणि  . तसेच जर वाहन लावायची परवानगी मिळाल्यास जनरल बॉडी मध्ये ठरलेल्या दराप्रमाणे शुल्क देणेहि  अनिवार्य आहे.  

भाडेकरू आणि पार्किंग : 

भाडेकरूला /लायसेन्सीला देखील मूळ मालकाप्रमाणेच पार्किंग वापरयाचा हक्क आहे आणि त्यामध्ये सोसायटीला भेदभाव करता येणार नाही  किंवा तसे नियम देखील आढळून येत नाहीत.  ह्याच आशयाचा निकाल मे. सहकार अपील कोर्ट, मुंबई (श्रीमती काकडे साहेब)  ह्यांनी ३-४ वर्षांपूर्वी  न्यू मिरामार सोसायटीच्या केसमध्ये दिला आहे. अपार्टमेंबद्दल असे वेगळे नियम दिसून येत नाहीत. मात्र डिड ऑफ डिक्लरेशन मध्ये दिलेल्या नियमावली मध्ये कायद्याप्रमाणे दुरुस्त्या करून असे नियम करता येतील. 

पार्किंग आणि वाद या   एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याला परस्पर सामंजस्य हेच विनाखर्चिक उत्तर आहे.   कितीही दिले तरी कमीच पडेल अशी पैश्यानंतर कोणती गोष्ट असेल तर ती सध्या पार्किंग आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आमच्या सोसायटी मध्ये आम्ही 'अतिथी देवो भव' ही संस्कृती जपतो... परंतु आमचेकडे पार्किंग कमी असल्याने, या  देवांनी   त्यांची पुष्पक विमाने कृपया  सोसायटी बाहेर लावावीत" असा विनोद व्हॉट्सॲप वर मध्यंतरी वाचला.  असो.  

ऍड. रोहित एरंडे. 

पुणे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©